अ‍ॅपशहर

काँग्रेसचा फार्स

दलितांच्या शोषणाच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशभर पुकारलेल्या उपोषणाच्या आधी काही नेत्यांनी छोले भटुऱ्यावर ताव मारत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने, पक्षाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील उपोषणस्थळी उशिरा पोहोचल्याने आणि कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यातच अधिक मग्न झाल्याने या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला

Maharashtra Times 11 Apr 2018, 5:00 am
दलितांच्या शोषणाच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशभर पुकारलेल्या उपोषणाच्या आधी काही नेत्यांनी छोले भटुऱ्यावर ताव मारत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने, पक्षाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील उपोषणस्थळी उशिरा पोहोचल्याने आणि कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यातच अधिक मग्न झाल्याने या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला. काँग्रेसचे उपोषण लाक्षणिक असले, तरी ते पुरत्या गांभीर्याने करायला हवे होते. मात्र, या देशव्यापी आंदोलनात गांभीर्याचा पूर्णपणे अभाव होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cong-fast


सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची राजवट दलितांच्या प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप करून त्याचा निषेध करण्यासाठी केलेल्या या आंदोलनात काँग्रेसने आपल्या असंवेदनशीलतेचेही प्रदर्शन केले. केवळ दिल्लीतच नव्हे, तर मुंबईसह अनेक ठिकाणच्या आंदोलनांतून ही असंवेदनशीलता दिसली. काँग्रेसच्या दहा वर्षांच्या राजवटीतील या असंवेदनशीलतेला आणि त्याच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना कंटाळून मतदारांनी तिला २०१४मध्ये सत्तेवरून खाली खेचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'अच्छे दिना'चे स्वप्न दाखविणाऱ्या प्रचार मोहिमेचाही त्यात मोठा वाटा होता. मात्र, मोदी सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण होत असले, तरी अद्याप 'अच्छे दिन'चा पत्ता नाही.

स्वयंघोषित गोरक्षकांकडून होत असलेला हिंसाचार, दलितांच्या विरोधात वाढत असलेले अत्याचार, हिंदुत्ववादी आणि भाजपच्या काही नेत्यांकडून राज्यघटना बदलण्याची झालेली भाषा, धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न यांमुळे देशभरात उन्मादी वातावरण निर्माण झाले आहे. नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी (जीएसटी) यांचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, घटत चाललेले रोजगार आणि वाढती महागाई यांमुळे भाजपच्या विरोधातील नाराजी वाढती आहे. अशा स्थितीत एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जनसामान्यांचा विश्वास संपादण्यासाठी काँग्रेसने गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज