अ‍ॅपशहर

पेटवून दिलेली माणुसकी

अवैध सावकारीविरुद्ध कायदा असला तरी त्याचा धाक आहे की नाही, असा जाब विचारण्यास भाग पाडणारी घटना परवा चंद्रपुरात घडली. उन्हाने होरपळून निघालेल्या या शहरातील मने अवैध सावकाराच्या कृतीने पोळून निघाली. या सावकाराने कर्जदार युवक आणि त्याच्या आईवडिलांना त्यांच्याच घरी पेट्रोल टाकून पेटविले.

MT 9 May 2019, 5:46 am
अवैध सावकारीविरुद्ध कायदा असला तरी त्याचा धाक आहे की नाही, असा जाब विचारण्यास भाग पाडणारी घटना परवा चंद्रपुरात घडली. उन्हाने होरपळून निघालेल्या या शहरातील मने अवैध सावकाराच्या कृतीने पोळून निघाली. या सावकाराने कर्जदार युवक आणि त्याच्या आईवडिलांना त्यांच्याच घरी पेट्रोल टाकून पेटविले. यात तिघेही भाजले. आईची प्रकृती चिंताजनक आहे. व्याज नियमित देत नाही म्हणून या सावकारने कायदा हातात घेतला. ही हिंमत गुन्हेगारांमध्ये येते कुठून हा प्रश्न कितीदा विचारावा आणि कितीदा काळजी व्यक्त करावी! काही महिन्यांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या शेतकरी कुटुंबाने बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्याच्या विवंचनेत ते असता, त्यांच्या या परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला. कर्ज घेणारी व्यक्ती ही कायम पिळवणूक करण्यासाठीच असते, असा दंडकच जणू सावकारीच्या व्यवहारात रुळला आहे. अवैध सावकारीचे जाळे तर राज्यभर कर्करोगासारखे पसरले आहे. त्यात अडकून कित्येकांचे जीव गेले. कित्येकांची अब्रू गेली. कित्येकदा शेतकऱ्यांभोवती हा फास आवळला गेला. त्यातून अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. या घटनांचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर कायदा कठोर झाला. मात्र, हवी तशी जरब दिसत नाहीच. उलट पोलिस-महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांकडून जीवघेणे हल्ले होण्याची मालिकाच चालू आहे. निगरगट्टपणा वाढला आहे. काही दिवसांपूर्वी वाळूमाफियांनी नागपूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. पुरावे आहेत. पोलिसांना आरोपी मात्र सापडत नाही. कायद्याचा धाक हवा आणि सुव्यवस्थेबद्दलचा विश्वास. घरात जाऊन अंगावर पेट्रोल टाकणाऱ्यांना त्वरित अटक व्हायला हवी. कायदा रु‌ळत नाही तिथे बेफिकिरी भिनते. राज्यात सरकारचे राज्य आहे की सावकारांचे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज