अ‍ॅपशहर

वाघोबांकडून शुभवर्तमान!

सरकारी यंत्रणेची आस्था तसेच वन्यप्रेमी व संवर्धकांच्या प्रयत्नांना स्थानिक गावकऱ्यांचीही साथ लाभल्याने देशाच्या शिरपेचात सर्वाधिक व्याघ्रसंख्येचा तुरा खोवला गेला.

Maharashtra Times 13 Apr 2016, 1:24 am
देशात दुष्काळाचे सावट असतानाच आणि सर्व स्तरांतून निराशेचे सूर उमटत असताना वाघांच्या वाढलेल्या संख्येचे शुभवर्तमान कानी आले आहे. व्याघ्र संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘वर्ल्ड वाइल्ड लाइफ फोरम’ व ‘ग्लोबल टायगर फोरम’च्या दाव्यानुसार आज जगात तीन हजार ८९० वाघ आहेत. मागील सहा वर्षांत वाघांची संख्या ६९० ने वाढल्याचेही अहवालात नमूद केले आहे. वाघांची सर्वाधिक शिकार होणाऱ्या भारतातच सर्वाधिक म्हणजे दोन हजार २२६ वाघ आहेत. महाराष्ट्रातही १९० वाघ आहेत. त्यात विदर्भाचा वाटा १६७ वाघांचा आहे. उर्वरित २३ वाघ पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री प्रकल्पात आहेत. सरकारी यंत्रणेची आस्था तसेच वन्यप्रेमी व संवर्धकांच्या प्रयत्नांना स्थानिक गावकऱ्यांचीही साथ लाभल्याने देशाच्या शिरपेचात सर्वाधिक व्याघ्रसंख्येचा तुरा खोवला गेला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tiger
वाघोबांकडून शुभवर्तमान!


वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तसेच, तो भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. हडप्पा संस्कृती आणि त्याआधीच्या काळापासूनही भारतातील वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात. घनदाट जंगल, अनुकूल हवामान, पाण्याची मुबलकता आणि शिकारींसाठी प्राण्यांच्या उपलब्धतेमुळे देशातील १७ राज्ये वाघांसाठी नंदनवन ठरत आहेत. सुंदरबनमधील पांढरा पट्टेरी वाघ तर आपले भूषणच! भारतात १९७३ रोजी व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. तेव्हा वाघांची संख्या केवळ एक हजार ८२७ होती. आज देशभरात ४० पेक्षा अधिक व्याघ्र अभयारण्ये आहेत. पंगू कायद्यांमुळे १९७०-८० च्या दशकात अवयव तस्करीसाठी भारतासह काही देशांत वाघांच्या शिकारी वाढल्या. १९९० च्या सुमारास जंगलतोड व शिकारींमुळे वाघांचा अधिवास धोक्यात आला. चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांत नखे, दात, हाडे, कातडी व इतर अवयवांना सर्वाधिक मागणी असल्याचे अनेकदा पुराव्यांसह सिद्ध झाले आहे. इंडोनेशियातही वाघांच्या अवयवांची तस्करी करणारे रॅकेट सापडले आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये अवघे काही वाघ उरले आहेत, ही खेदजनक बाब आहे. हे दोन्ही देश व्याघ्र संवर्धन चळवळीत नावापुरते आहेत. सध्या वाघ वाचविण्यासाठी दिल्लीत चाललेल्या आशियाई परिषदेत आश्वासक पावले टाकली जातील, अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे जागतिक उद्दिष्टे साधेल आणि भारताचाही `सर्वाधिक वाघांचा देश` हा मान टिकून राहील!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज