अ‍ॅपशहर

पाकची खोटी माणुसकी

हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावले गेलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालवून देण्याची पाकिस्तानची कृती म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा प्रकार होता

Maharashtra Times 27 Dec 2017, 4:07 am
हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावले गेलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालवून देण्याची पाकिस्तानची कृती म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा प्रकार होता. पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांच्या जन्मदिनी मानवतावादी भूमिकेतून जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नी यांच्याशी भेट घालून देण्यात आल्याचा दावा इस्लामाबादकडून केला जात असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकची जनसंपर्क मोहीम एवढाच त्यामागचा हेतू होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jadhav meeting lacked credibility pak peddling false narrative
पाकची खोटी माणुसकी


पाकिस्तानची मानवतावादी भूमिका खरी असती, तर जाधव आणि त्यांची आई व पत्नी यांच्यात बंद काचेचा अडसर राहिला नसता. भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंह यांना या भेटीपासून दूर ठेवले गेले नसते आणि जाधव यांना राजनैतिक मदत (कन्सुलर अॅक्सेस) नाकारलीही गेली नसती. जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची ही शेवटची भेट नाही, असे सांगत पाकिस्तानने पुन्हा भेट होऊ देण्याची शक्यता वर्तविली आहे. तथापि, त्याचे स्वरूप पहिल्या भेटीसारखेच असल्यास त्यातून पाकच्या मानवतावादी देखाव्यापलीकडे अन्य काही साध्य होण्याची शक्यता नाही. जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीची केलेली नेपथ्यरचना पाहता पाकिस्तानच्या मानवतेच्या दाव्यातील पोकळपणा स्पष्ट होतो. जाधव यांच्या आई अवंती आणि पत्नी चेतनकुल या दोघींना भेटीच्या आधी कपडे बदलायला लावणे, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या काढून घेणे, कपाळावरील टिकली काढायला लावणे यांतून पाकचा छळवाद उघड होतो. कोणत्या परिस्थितीला आणि कशा प्रकारच्या वातावरणाला जाधव सामोरे जात असतील याची कल्पना यातून येते. भारतीय महिलांची मंगळसूत्र, टिकली, बांगड्या यांबाबत असलेली संवेदनशीलता आणि भारतीय संस्कृती यांबाबत पाकिस्तान अनभिज्ञ असणे शक्य नाही. तरीही त्या देशाने जाधव कुटुंबीयांकडून या गोष्टी काढून घेतल्या. जाधव यांची मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे आई आणि पत्नी यांनी त्यांच्याशी मराठीतून संवाद साधणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांना मराठीतून बोलण्यास पाकने मनाई केली. शिवाय त्यांच्या चाळीस मिनिटांच्या संभाषणात सतत अडथळे आणले.

पाकिस्तानच्या कोठडीत छळवाद सहन करीत असलेल्या जाधव यांना त्यांच्या जिवाभावाच्या व्यक्तींशी बोलण्याची संधी देण्यामागे इस्लामाबादचा कोणताही मानवतावादी दृष्टिकोन नव्हता. जाधव हे आपल्या देशात सुस्थितीत असून, अत्यंत ‘उदारपणे’ आपण त्यांची त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट घालून दिली आहे, याचा गवगवा पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर करायचा होता. हा हेतू साध्य करण्यासाठी पाकने ही भेट घडवून आणली. खुद्द जाधव आणि त्यांचे कुटुंबीय कमालीच्या मानसिक तणावातून जात असणार. अशा स्थितीत खऱ्याखुऱ्या माणुसकीच्या भावनेने त्यांच्याशी वर्तन करायला हवे होते. हेरगिरी प्रकरणी लष्करी न्यायालयामार्फत एकतर्फी खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावून आपल्या न्यायव्यवस्थेचे दर्शन जगाला घडविणाऱ्या पाकने या भेटीद्वारे आपल्या ‘मानवते’चा खरा चेहराही जगाला दाखविला. या प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात उघडे पाडल्याने पुढील खटल्याच्या वेळी काहीतरी युक्तिवाद करता यावा, यासाठी पाकने हा प्रकार केला. पाकिस्तानच्या खोट्या माणुसकीचा बुरखा फाडत जाधव यांना मायदेशी परत आणण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज