अ‍ॅपशहर

‘कासवाची’ शर्यत

‘कासव’ या चित्रपटाला सुवर्णकमळ जाहीर होणे, ही मराठी जनांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. चित्रपटातून मनोरंजनाबरोबर काही गोष्टी साधता येतात आणि त्या साधायला हव्यात, हेही या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.

Maharashtra Times 10 Apr 2017, 12:53 am
‘कासव’ या चित्रपटाला सुवर्णकमळ जाहीर होणे, ही मराठी जनांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. चित्रपटातून मनोरंजनाबरोबर काही गोष्टी साधता येतात आणि त्या साधायला हव्यात, हेही या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. या पुरस्कारांद्वारे समाजात चित्रपट या माध्यमाबद्दल जागरुकता निर्माण करण्याची संधी मिळते, ती साधायला हवी. सुवर्णकमळाबरोबर मराठी चित्रपटांचे सुवर्णयुग पुन्हा एकदा अवतरावे असे वाटत असेल, तर चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक यांविषयी वेगळा विचार करायला हवा. ही शर्यत कासवाप्रमाणेच नेट लावून खेळावी लागेल. या पूर्वी ‘श्यामची आई’, ‘श्वास’, ‘देऊळ’ आणि ‘कोर्ट’ यांना सुवर्णकमळ मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kasav wins highest national award
‘कासवाची’ शर्यत


सुवर्णकमळ मिळविणाऱ्या मराठी चित्रपटांनी वेगळे विषय हाताळले आहेत. ते लोकांच्या भावनांशी संबंधित आणि लोकमानसाला दिशा देणारे आहेत. यंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’साठी जाहीर झाला. ‘रुस्तम’मधील भूमिकेसाठी अक्षयकुमार, तर ‘नीरजा’मधील भूमिकेसाठी सोनम कपूरनं बाजी मारली. अक्षयकुमार आता वेगळ्या भूमिका विचारपूर्वक साकारतो आहे. ‘नीरजा’द्वारे सोनम कपूरनं पठडीच्या बाहेर पाऊल टाकले होते. ‘दशक्रिया’ हा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्याखेरीज तांत्रिक बाजूच्या पुरस्कारांतही मराठीने बाजी मारली आहे. हे सारे मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे. मराठीमध्ये नायक किंवा नायिकांपेक्षा कथा हीच महत्त्वाची असते, हेच पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आले आहे. हे असले, तरी दोन महत्त्वाच्या गोष्टींविषयी आताच बोलायला हवे. पहिली म्हणजे पुरस्कार विजेत्या आणि एकूणच वेगळा आशय मांडणाऱ्या चित्रपटांचे व्यावसायिक यश आणि दुसरी म्हणजे चित्रपटांची मोठी संख्या. ‘देऊळ’ हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्‍या यशस्वी झाला; परंतु ‘कोर्ट’ निवडक प्रेक्षकांनी पाहिला.

आपला विषय मनोरंजनातून गोळीबंद पद्धतीने मांडता आला, तर प्रेक्षक त्याकडे वळण्याची शक्यता असते; परंतु प्रत्येक विषयाचा आपला असा सूर असतो आणि तो त्याच सुरात लागायला हवा. सारेच केवळ मनोरंजनासाठी नसते. कला नावाची एक गोष्ट असते आणि ती महत्त्वाची असते, हे आता समजायला हवे. ‘कासव’च्या निमित्ताने प्रेक्षकांमध्ये ही जाण रुजविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रेक्षकांना समजत नाही, त्यांच्यासाठी हे नाहीच, महोत्सवांतच दाखवू, असा त्रागा करूनही चालणार नाही. ही जाणच अभिरुची निर्माण करेल आणि प्रेक्षक पातळीवरही मराठी चित्रपट जिंकेल. दुसरी बाब आहे निर्मितीच्या संख्येची आणि मूल्यांची. चित्रपट काढावा असे वाटणे वेगळे आणि हे माध्यम हाताळणे वेगळे. काही वेळा निर्मिती आणि प्रदर्शनाबाबतीच्या गोष्टी माहीत नसल्यामुळे एखादा निर्माता त्यात उतरून अडकत जातो. एक चित्रपट करून थांबणाऱ्या किंवा मध्यातच बंद करणाऱ्या निर्मात्यांची संख्या मोठी आहे. सध्या काही ठिकाणी निर्मात्यांसाठी कार्यशाळा होत आहे. हे प्रयत्न वाढायला हवे. चित्रपट हाच व्यवसाय म्हणून पाहणारा निर्माता उभा राहिला, तर तो प्रत्येक निर्मिती कलाकृती म्हणून गांभीर्याने बघेल. मराठी चित्रपटांचा परीघ विस्तारायचा असेल, तर प्रेक्षकांबरोबर निर्मितीच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन वाटचाल करायला हवी. सुवर्णकमळाचा आनंद आहेच. त्याबरोबर या गोष्टी मनात ठेवून वाटचाल केल्यास व्यावसायिक दृष्टीनेदेखील सुवर्णकाळ निर्माण होईल, यात शंका नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज