अ‍ॅपशहर

स्त्रीची कुचंबणा मांडणारी कविता

कोरड्या मातीचे ओलेपण’ हा कवयित्री माधवी यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. स्त्री-भावजीवनाच्या विविध छटा उलगडून दाखवणारी आणि सामाजिक संवेदनांचे अनेक चित्र रेखाटणारी ही कविता आहे. स्त्री म्हणून जगत असताना वाट्याला येणाऱ्या असंख्य उलथापालथी कवयित्री खूप धीट आणि निर्भीडपणे मांडते. दैनंदिन जगण्याच्या आणि अनुभवाच्या मुशीतून प्रकटणारी ही कविता खूप मुक्तपणे बोलते. मुळात या कवितेचा अंत:स्वर आत्मनिष्ठ असला तरी सामाजिक जाणिवांचे असंख्य पदर या आविष्काराला लगडून आहेत.

Maharashtra Times 28 Jan 2018, 1:13 pm
कोरड्या मातीचे ओलेपण’ हा कवयित्री माधवी यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. स्त्री-भावजीवनाच्या विविध छटा उलगडून दाखवणारी आणि सामाजिक संवेदनांचे अनेक चित्र रेखाटणारी ही कविता आहे. स्त्री म्हणून जगत असताना वाट्याला येणाऱ्या असंख्य उलथापालथी कवयित्री खूप धीट आणि निर्भीडपणे मांडते. दैनंदिन जगण्याच्या आणि अनुभवाच्या मुशीतून प्रकटणारी ही कविता खूप मुक्तपणे बोलते. मुळात या कवितेचा अंत:स्वर आत्मनिष्ठ असला तरी सामाजिक जाणिवांचे असंख्य पदर या आविष्काराला लगडून आहेत. स्वतःला- म्हणजे स्त्री प्रतिमेला केंद्रस्थानी ठेवून ही कविता सुख दुःखाच्या अनेकविध स्वरूपाचा शोध घेऊ पाहते. मूल्यात्मक विचाराचा आविष्कार करू पाहते. दुःख, वैफल्य, अपेक्षाभंग अशा अनेक मिती स्त्री-जगण्याला व्यापून असतात. याविषयी माधवी यांची कविता बोलते. हे बोलणे उपरोधिक असले तरी एकूणच वास्तवावरची ही प्रतिक्रिया असल्यामुळे हे व्यक्त होणे अर्थपूर्ण वाटते. भिन्न भिन्न स्वरूपाच्या नात्यांचा शोध घेणारी आणि एकूणच आयुष्याबद्दलचे चिंतन प्रकट करणारी कवयित्री स्त्री-पुरुषातल्या नातेसंबंधांची टोकदार चिकित्सा करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कविता कोणतेही सांसारिक तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत नाही. किंवा स्त्रीची दुबळी व्यक्तिरेखाही साकारत नाही. मात्र इतिहास पुराणापासून स्त्रीविषयीचा जो एक परंपरागत दृष्टिकोन समजात रूढ आहे त्याला काही अंशी छेद देण्याचा प्रयत्न ही कविता करते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम collection of poems
स्त्रीची कुचंबणा मांडणारी कविता


परंपरा आणि आधुनिकतेच्या सीमारेषेवरील जे स्त्रीचे जगणे असते त्याचा उच्चार ही कविता करते. मुलगी, प्रेयसी, पत्नी, आई अशा अनेक भूमिकांमध्ये जगत असताना तिची जी एक मानसिक, भावनिक घुसमट होते त्या घुसमटीचे हे कथन आहे. या कथनाला स्त्रीत्वाच्या अनेक पैलूंचे पदर आहेत. कधी मुक्तसंवादातून तर कधी प्रतीकात्मक काव्यभाषेतून व्यक्त होणारी ही कविता मानवी वृत्ती-प्रवृत्तीतील अनेक कंगोरे समोर ठेवते. समकालीन वास्तवातील अनेक गोष्टींचे अधोरेखन करते. आधी म्हटल्याप्रमाणे ही आत्मनिष्ठ अभिव्यक्ती असली तरी तिला खूप सारे सामाजिक संदर्भ व्यापून आहेत. दु:ख आणि नैतिकतेचा अव्याहत संघर्ष सुरु असतो, या संघर्षामुळे संवेदनशील मन व्यथित होते. या कवितेतला अनुभव विषय आणि एकूणच अवकाश आपल्या नेहमीच्या परिचयाचा जरी असला तरी कवयित्री काही विशिष्ट प्रतिमा वापरून या अभिव्यक्तीला एक नवी झळाळी देते. ‘बुजरा बेगडी निर्लज्जपणा’ किंवा ‘सुख दुःखाचं मॅन्युफॅक्चरिंग’ यांसारख्या प्रतिमा या कवितेला भाषिकदृष्ट्या समृध्द बनवतात. अर्थात अशी उदाहरणे फारच कमी असली तरीही या ‘सांगण्याला’ विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतोच.

या कवितेच्या आत अनेक प्रश्न-उपप्रश्न आहेत जे स्त्रियांच्या अस्मितेशी आणि लिंगभावाशी जोडलेले आहेत. या सगळ्या बाबींकडे कवयित्री माधवी सहानुभूतीने पाहत नाही; तर तिचा यासंदर्भात स्वतंत्र दृष्टिकोन आहे. अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याची भावना तिच्या मनात आहे. आधुनिक स्त्रीची बहुस्तरीय कुचंबना मांडणारी ही कविता म्हणूनच महत्त्वाची आहे.
...
कोरड्या मातीचे ओलेपण (कवितासंग्रह)
कवयित्री : माधवी
प्रकाशक : गोदा प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठं : ११२
किंमत : १५० रु.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज