अ‍ॅपशहर

द सेलाउट

बुकर पुरस्काराचा मानकरी ‘पॉल बीटी’ हा नेहमीच अमेरिकेतल्या सर्वात चलाख, विनोदी आणि धाडसी लेखकांमधे गणला गेला होता. वर्णद्वेषाच्या प्रश्नाला थेट भिडणाऱ्या ‘द सेलाउट’ या त्याच्या नव्या कादंबरीत त्याने तुफान औपरोधिक पद्धतीने, अमेरिकन समाजाला त्यांच्या संस्कृतीची थट्टामस्करी करत डिवचले आहे.

Maharashtra Times 18 Feb 2017, 12:16 am
बुकर पुरस्काराचा मानकरी ‘पॉल बीटी’ हा नेहमीच अमेरिकेतल्या सर्वात चलाख, विनोदी आणि धाडसी लेखकांमधे गणला गेला होता. वर्णद्वेषाच्या प्रश्नाला थेट भिडणाऱ्या ‘द सेलाउट’ या त्याच्या नव्या कादंबरीत त्याने तुफान औपरोधिक पद्धतीने, अमेरिकन समाजाला त्यांच्या संस्कृतीची थट्टामस्करी करत डिवचले आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच निवेदक म्हणतो, ‘एखाद्या काळ्या माणसाने सांगितलं तर खोटं वाटेल. पण खरंच मी आयुष्यात कधी चोरी किंवा लबाडी केली नाही.’ काळ्या आणि गोऱ्या दोन्ही समाजांची विडंबनात्मक पद्धतीने रेवडी उडवताना त्याने केलेले गंभीर सामाजिक भाष्य वाचकांच्या मनावर आघात करून जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम english book the sellout
द सेलाउट


ही कथा घडते काळ्यांचे बहुमत असलेल्या डिकन्स नावाच्या, लॉस एंजेलिसजवळच्या एका काल्पनिक उपनगरात. बॉनबॉन नावाचा कथानायक आणि निवेदक त्याच्या वडलांच्या मृत्यूनंतर काही काळ गावातल्या काळ्या लोकांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. मात्र त्या लोकांच्या उद्ध्वस्त आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नातली निरर्थकता त्याच्या लवकरच लक्षात येते. गावातल्या विचारवंत म्हणवून घेणाऱ्या इतर लोकांशी मतभेद झाल्यामुळे त्याला ते ‘सेल-आउट’ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तत्वांना तिलांजली देणारा म्हणून ओळखतात.

त्याच्या काही कल्पना अचाट असतात. आपल्या डिकन्स गावाला नकाशावर पुन्हा स्थान मिळवून देण्यासाठी गुलामी आणि काळ्या-गोऱ्यांचे सामाजिक विभक्तीकरण या प्रथांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंदोलन उभे करायचा प्रयत्न करतो. हे करताना अमेरिकन घटनेच्या तेराव्या आणि चौदाव्या कलमाचा भंग झाल्यामुळे त्याच्यावर थेट सर्वोच्च न्यायालयात खटला उभा रहातो. कोर्टाच्या ‘अपराधी की निरपराधी?’ या प्रश्नाला, ‘मी मानव आहे’ असे उत्तर तो देतो.

असे काही घडणे हे विचित्र, अतर्क्य, अवास्तव आणि अतिवास्तव यांच्या मधले आहे. कथानायकाच्या कृत्याचा उद्देश अजूनही अस्तित्वात असलेल्या वर्णद्वेषाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे हा असतो. लेखकाचाही तोच उद्देश आहे. पण हे करताना तो क्रूर विडंबनात्मक शैली वापरून उद्याच्या चांगल्या, उदारमतवादी, न्याय्य समाजाच्या स्वप्नाची आणि आशावादाची टर उडवतो. अध्यक्ष ओबामा यांच्या संदर्भात तो म्हणतो, की आठ वर्षे एका सुटाबुटातल्या काळ्या राष्ट्राध्यक्षाला राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पाहिल्यावरसुद्धा तुम्हाला चौकोनी कलिंगड ही कल्पना पचनी पडत नाही.

जनगणना फॉर्मवर ‘वंश’ या सदरात तो नेहमी ‘कॅलिफोर्नियन’ असे लिहितो आणि अधिकाऱ्याने फटकारल्यावर त्याची माफी मागून ‘काळा, आफ्रिकन-अमेरिकन, निग्रो, भेकड - वंश’ असे लिहिलेल्या जागी सही करतो. अॅलबॅमा राज्यातल्या एका बसमधे रोजा पार्क्स नावाच्या काळ्या महिलेने एका गोऱ्या माणसासाठी जागा खाली करायला नकार दिला आणि त्यातून पुढे समान नागरी अधिकारांची चळवळ सुरू झाली असे मानतात. उपरोधाची परिसीमा गाठत लेखक म्हणतो, की कदाचित त्यात वर्णाचा किंवा वंशाचा काही संबंध नसावा. तिला माहीत असावे, की तो माणूस पादरा होता किंवा अनाहूत आणि कंटाळवाणी बडबड करणारा होता.

लेखकाने असंख्य मुद्दे त्याच्या तिरकस शैलीत उपस्थित केले आहेत. इथे रहायची कोणाचीही इच्छा नाही. पण अमेरिकेत जन्म घेण्यापेक्षा आफ्रिकेत जन्म घेतला असता तर अधिक बरे झाले असते असे कोणी काळा म्हणू शकणार नाही. बहुतेक गुलामांचे आयुष्य मारझोड, बलात्कार आणि घाणीच्या नरकातच गेले. त्यापैकी कोणालाही, भविष्यात आपल्या खापर-खापर-खापर पणतवाला ‘वाय-फाय’चा कमजोर सिग्नल मिळाला, तरी पिढ्यानपिढ्या होणाऱ्या असह्य यातनांचे चीज होईल असे वाटले असेल, याविषयी तो शंका व्यक्त करतो. या खटल्यातून आपण ‘काळे-गोरे हे विभक्त असताना खऱ्या अर्थाने समान होते का?’ असा प्रश्न न विचारता ‘विभक्त आणि खऱ्या अर्थाने समान नाहीत, पण पूर्वीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात चांगले’ असे असू शकते का, असा अवघड प्रश्न लेखकाने विचारला आहे.

-विवेक गोविलकर

.....................................................................................................................

द सेलाउट, लेः पॉल बीटी, प्रकाशकः पॅन मॅकमिलन, पानेः ३०४, किंमतः ३१० रु., किंडलः २५७.४५ रु.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज