अ‍ॅपशहर

‘अकृत्रिम’ इंदिरा गांधी!

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. एकीकडे त्यांची प्रशंसा करणारे तर दुसरीकडे त्यांच्या कारभारावर आणि धोरणांवर टीका करणारे साहित्य प्रकाशित होत आहे.

Maharashtra Times 29 Jul 2017, 4:00 am
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. एकीकडे त्यांची प्रशंसा करणारे तर दुसरीकडे त्यांच्या कारभारावर आणि धोरणांवर टीका करणारे साहित्य प्रकाशित होत आहे. तथापि या टोकाच्या भूमिकांपासून दूर राहून माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी गांधी यांच्या व्यक्तित्वातील आणि कारकीर्दीतील अनोख्या पैलूंचा मागोवा घेतला आहे. ‘इंदिरा गांधीः अ लाइफ इन नेचर’ या पुस्तकात त्यांनी त्या निसर्गप्रेमी कशा होत्या, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देण्याचा त्यांचा निग्रह कसा होता आणि एकूणच पर्यावरण धोरणांची मुहूर्तमेढ रचण्याचे श्रेय त्यांच्याकडे कसे जाते याचे विस्ताराने वर्णन केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indira gandhi
‘अकृत्रिम’ इंदिरा गांधी!


निसर्गप्रेमाचा वारसा इंदिरा गांधी यांना पित्याकडून मिळाला आणि परस्परांना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडते. या विषयाला वाहिलेली अनेक पुस्तके पं. नेहरू इंदिरा यांना वाचण्यासाठी सुचवत आणि इंदिरा यांच्या संग्रहात कित्येक पुस्तकांची मग भर पडे. कमला नेहरू यांची प्रकृती ठीक नसे आणि त्यांना अनेकदा थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम करावा लागे..महाबळेश्वर, पांचगणीपासून मसुरीपर्यंत. त्यांच्याबरोबर इंदिरा असत आणि ते निसर्गाचे संस्कारही त्यांच्यावर झाले. पक्षिनिरीक्षणाचा छंद लागला. लेखकाने त्यांच्या निसर्गाच्या जवळिकीचे अनेक संदर्भ दिले आहेत. त्याबरोबरच नेहरू पंतप्रधान असल्याने पर्यावरण, वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन असे विषय त्यांच्याकडे येत आणि त्यामुळेही इंदिरा यांना त्या विषयांच्या गांभीर्याची ओळख झाली. पंतप्रधान म्हणून पर्यावरणाच्या रक्षणाची भूमिका त्यांनी घेतली त्यास अशी पार्श्वभूमी होती.

विकासाची किंमत पर्यावरणाचा नाश ही नसावी, असा इंदिरा यांचा आग्रह होता. भारतीय वनसेवेची सुरुवात तर त्या १९६६मध्ये पंतप्रधान झाल्यावर सहा महिन्यांतच झाली. ‘प्रोजेक्ट टायगर’च्या निधीतून जेव्हा करणसिंह यांच्या इच्छेने या प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी विमान घेण्याचे ठरले तेव्हा हा वायफळ खर्च आहे आणि आपले प्राधान्यक्रम चुकत आहेत अशी समज त्यांनी दिली. काझीरंगामधून काही एकशिंगी गेंड्यांना दुधवा राष्ट्रीय उद्यानात नेण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी धाडसाने घेतला तो गेंड्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी. आसामच्या अस्मितेशी काझीरंगा जोडले गेले असताना आणि १९८३ मध्ये आसाम पेटलेले असतानाही राजकीय लाभ-तोट्याच्या पलीकडे जाऊन हा निर्णय त्यांनी घेतला. केरळातील सायलेंट व्हॅली जलविद्युत प्रकल्पाला तेथील डावे आणि काँग्रेस नेत्यांचे समर्थन असूनही तेथील पर्यावरणाच्या संभाव्य हानीच्या पार्श्वभूमीवर त्याला घाईने मंजुरी दिली नाही. सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन असो, की भरतपूर पक्षी अभयारण्याचे संरक्षण, जो जो विषय पर्यावरणाचा होता तेथे इंदिरा गांधी यांची कशी संवेदनशील भूमिका होती याचे मनोहारी दर्शन पुस्तकात घडते. मगरी, सिंह, हरीण आणि अन्य नष्टप्राय पशूंच्या संरक्षणासाठी गांधी यांनी धोरणे आखली आणि वन्यजीव संरक्षण (१९७२) कायदा असो, की हवेचे प्रदूषण नियंत्रण कायदा (१९८०) असो किंवा पर्यावरण आणि वातावरणाचे संरक्षण करणारे अन्य कायदे असोत, ते इंदिरा गांधी यांच्या काळात आले याकडे लेखक लक्ष वेधतो.

काही ठिकाणी लेखक आश्चर्यही व्यक्त करतो. उदाहरणार्थ ताजमहालला प्रदूषणापासून धोका असूनही मथुरा रिफायनरीची कोनशिला इंदिरा गांधी यांनी कशी बसवली याविषयी लेखक अचंबा व्यक्त करतो. अशा टिपण्यांमुळे पुस्तक समतोल झाले. सलीम अली, माधव गाडगीळ यांच्यासह अनेकांशी यांचा कसा संवाद होता याचेही दाखले लेखकाने दिले आहेत.

इंदिरा गांधी यांनी १९५८ मध्ये लिहिलेल्या लेखाचा उल्लेख लेखकाने केला आहे; ज्यात कुलूमधील निसर्गाचे संरक्षण करण्याचे आणि विकासासाठी पर्यावरणाशी तडजोड न करण्याचे प्रतिपादन होते. एका अर्थाने तीच निसर्ग आणि पर्यावरणाबाबत इंदिरा गांधी यांची अकृत्रिम आणि राजकरणातीत भूमिका राहिली.

-राहुल गोखले

.................................

इंदिरा गांधीः अ लाइफ इ नेचर, लेः‍ जयराम रमेश, प्रकाशक‍ः सायमन अँड शूस्टर, पानेः ४३७, किंमतः७९९रु.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज