अ‍ॅपशहर

चतुरस्र आणि संवेदनशील: नीला सत्यनारायण

‘स्थानिक स्वराज्य संस्थां’मधील निर्वाचित महिलांच्या प्रशिक्षणासाठी सुरू केलेले ‘क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान’ हे त्यांचे योगदान कायमचे लक्षात राहील.

महाराष्ट्र टाइम्स 17 Jul 2020, 5:24 am
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे निधन, हा करोनाचा नवा धक्का. कार्यक्षम आयएएस अधिकारी, लेखिका, कवयित्री, संगीतकार, वक्त्या अशा विविध नात्यांनी समाजाशी नाते जोडलेल्या नीला सत्यनारायण सध्या अत्यंत अस्वस्थ होत्या. ही अस्वस्थता त्यांच्या कवितांमधूनही उमटली. ‘भय वाटतं, आजूबाजूला मिटत जाणाऱ्या जगाचं..’ असे त्यांनी नुकतेच लिहिले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neela-satyanarayan


शेवटच्या आजारातही त्यांना काळजीची घरघर लागली होती, ती त्यांच्या गतिमंद आणि घरात अडकून पडलेल्या मुलाची. या दु:खाने कोळपून न जाता, त्यांनी या शोकातूनही सर्जन केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या नीला या पोलिस अधिकारी असणारे वडील वासुदेव आबाजी मांडके यांच्या आग्रहामुळे सनदी सेवेत आल्या. प्रशासनात विविध पदे सांभाळताना नवनवे प्रयोग केले. आज धारावीमधून जगभर होणाऱ्या चामड्याच्या वस्तूंच्या निर्यातीमागे नीला सत्यनारायण यांचे प्रयत्न होते. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्याच; पण ‘स्थानिक स्वराज्य संस्थां’मधील निर्वाचित महिलांच्या प्रशिक्षणासाठी सुरू केलेले ‘क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान’ हे त्यांचे योगदान कायमचे लक्षात राहील. निवृत्तीनंतर त्यांनी मराठी मुलामुलींना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे यासाठी जे उपक्रम केले, त्यांत ‘महाराष्ट्र टाइम्स’चाही सहभाग होता. चिरंतन भारतीय मूल्ये आणि आधुनिकता यांचा समन्वय घडवून महिलांसाठी वाढता अवकाश कोरणाऱ्या स्वातंत्र्योत्तर पिढीच्या त्या लखलखीत प्रतिनिधी होत्या. नीला सत्यनारायण यांना श्रद्धांजली!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज