अ‍ॅपशहर

टॅटू, केस आणि यॉर्कर

'मी गोलंदाजीचे शूज काढून ठेवले आहेत,' असे सांगत लसिथ मलिंगाने 'टी-ट्वेंटी'चा निरोप घेतला. वर्ल्ड कप 'टी-ट्वेंटी' खेळून निरोप घेण्याचे त्याचे स्वप्न होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 16 Sep 2021, 7:52 am
नोंद : लसिथ मलिंगा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lasith-malinga


'मी गोलंदाजीचे शूज काढून ठेवले आहेत,' असे सांगत लसिथ मलिंगाने 'टी-ट्वेंटी'चा निरोप घेतला. वर्ल्ड कप 'टी-ट्वेंटी' खेळून निरोप घेण्याचे त्याचे स्वप्न होते. या स्पर्धेसाठी निवड तर सोडाच; पण निवड चाचणीसाठीही बोलावले नाही, हे त्याला सलत होते. कदाचित त्यामुळेच त्याने श्रीलंका क्रिकेट मंडळासह व्यावसायिक लीगमधील संघांचेही आभार मानले असावेत. मलिंगा क्रिकेट रसिकांचा लाडका होता; पण ते श्रीलंकेबाहेर. 'आयपीएल'मध्ये चमकणारा; पण राष्ट्रीय संघाकडून अपयशी ठरणारा मलिंगा एकमेव श्रीलंकन नव्हता; पण पैशाच्या मागे लागलेल्या खेळाडूंचा तो चेहरा झाला होता.

प्रतिथयश खेळाडू असूनही तो श्रीलंकेतील अन्य नावाजलेल्या खेळाडूंप्रमाणे सत्ताकेंद्राच्या जवळपासही नाही; किंबहुना त्याला जवळ येऊ दिले जात नाही. त्याच्या यॉर्करपेक्षा त्याच्या टॅटू, स्पोर्टस् कार, केसांच्या रंगाची जास्त चर्चा असे. तो टीकाकारांसाठी सॉफ्ट टार्गेट होता. मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने २०१४मध्ये 'टी-ट्वेंटी' विश्वकरंडक जिंकला; पण चर्चेत राहल्या त्या २०१२च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात त्याने दिलेल्या ५४ धावा. चेंडूचे चुंबन घेऊन रन-अप सुरू करणाऱ्या मलिंगाचा यॉर्कर, हळूवार चेंडू कसोटीत हमखास यश देत असे. अचानक वेगात टाकला जाणारा चेंडू, हळूवार यॉर्कर, उसळता चेंडू आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चेंडूचा टप्पा टाकून तो रिव्हर्स स्विंग करण्यावरील हुकूमत हे सर्व एका षटकात करणे, ही त्याची खासियत होती. तो षटकात दोन फलंदाज बाद करू शकत असे; तसेच प्रसंगी भरपूर धावाही तो लुटू देई. तो सामन्याला नाट्यमय कलाटणी मात्र देऊ शके. असेच नाट्य त्याच्या आयुष्यातही होते. खेळात झोकून देण्याची त्याची वृत्ती, प्रतिस्पर्ध्यांवर कायम दडपण ठेवता येईल असा त्याचा दबदबा, उपजत नेतृत्वगुण, या सर्वांच्या जोरावर त्याने अनेक संघांना शरण येण्यास भाग पाडले; पण या खेळाडूची कारकीर्द लीगमध्येच गाजली. तो त्याच्या राष्ट्रीय संघाला नकोसा झाला आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळून निरोप घेण्याचा बहुमान त्याला लाभला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज