अ‍ॅपशहर

नीरज चोप्रा

आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्या मोजक्या खेळाडूंकडून सुवर्णपदकांच्या अपेक्षा होत्या, त्यातील एक म्हणजे आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा. केवळ भारताचे आशास्थान म्हणून नव्हे तर गेल्या काही स्पर्धांत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत या खेळावर पकड निर्माण केली आहे. ज्युनियर विश्वविजेता असलेल्या नीरजने याआधी गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2018, 1:03 am
आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्या मोजक्या खेळाडूंकडून सुवर्णपदकांच्या अपेक्षा होत्या, त्यातील एक म्हणजे आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा. केवळ भारताचे आशास्थान म्हणून नव्हे तर गेल्या काही स्पर्धांत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत या खेळावर पकड निर्माण केली आहे. ज्युनियर विश्वविजेता असलेल्या नीरजने याआधी गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. पण तेवढे करून तो शांत बसला नाही. आशियाई स्पर्धेत त्याने आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकत ८८.०६ मीटर इतकी भालाफेक करून भारताला अपेक्षित सुवर्ण जिंकून दिले आहे. ही त्याची कामगिरी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील ब्राँझपदकाच्या ताकदीची कामगिरी आहे, हे विशेष. त्यामुळे २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी नीरजकडून निश्चितच अपेक्षा वाढल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neeraj chopra
नीरज चोप्रा


वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तब्बल ऐंशी किलो वजन असलेल्या नीरजने आपली ही बेढब प्रकृती महत्प्रयासाने बदलली. घराजवळ असलेल्या पानिपत स्टेडियममध्ये जाऊन तो धावू लागला आणि व्यायाम करू लागला. एकदा त्याने जयवीर चौधरी यांना भालाफेक करताना पाहिले आणि हा खेळ शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने लगेचच तो आत्मसातही केला. ज्या पद्धतीने भाला फेकला पाहिजे, ती शैली त्याच्याकडे उपजतच होती. सुरुवातीला राष्ट्रीय स्तरावर त्याने चमक दाखविली, पण आंतरराष्ट्रीय यश काही मिळत नव्हते. २०१३मध्ये तो जागतिक युवा क्रीडा स्पर्धात खेळला, पण अंतिम फेरीपर्यंत त्याला पोहोचता आले नाही. २०१६मध्ये गॅरी कॅल्व्हर्ट यांना भालाफेक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर नीरजच्या कामगिरीत सुधारणा होत गेली. पोलंडमध्ये वीस वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरजची ही प्रगती त्याच्या भालाफेकीप्रमाणेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत चालली आहे. आता प्रतीक्षा आहे टोकियोची!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज