अ‍ॅपशहर

प्रभुकृपेची आस!

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या चढाओढीत अव्वल ठरतील, असा अनेकांचा कयास आहे.

Maharashtra Times 2 Jul 2016, 8:34 am
कोणी किती काम केले याचा लेखाजोखा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच केंद्रीय मंत्र्यांचा खास वर्ग घेतला. आम्ही काय काम केले याचा ताळेबंद निवडणुकांना समोरे जाण्याआधी जनतेपुढे मांडू अशी हमी पंतप्रधानांनी यापूर्वीच मतदारांना दिली आहे. स्वतःला ‘मजदूर नंबर वन’ म्हणविणाऱ्या मोदींनी सर्वच मंत्र्यांना कामाला जुंपले आहे. सात रेसकोर्सवर झालेल्या बैठकीत अनेकांना झाडाझडतीला सामोरे जावे लागले. अर्थसंकल्पातील अडीचशेपैकी दीडशे घोषणांची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आल्याचे कळते. वचनपूर्ततेतील पहिला टप्पा म्हणून या वर्गाकडे बघितले जात आहे. संध्याकाळी चारला सुरू झालेली बैठक रात्री अकरापर्यंत सुरू होती. दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांनी आपआपल्या खात्याचे सादरीकरण केले. काही केंद्रीय मंत्र्यांमध्ये कामाची सकारात्मक स्पर्धा सुरू व्हावी, हे शुभसंकेत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या चढाओढीत अव्वल ठरतील, असा अनेकांचा कयास आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ministers reshuffle prabhu gadkari irani
प्रभुकृपेची आस!


लवकरच उत्तर प्रदेशच्या निवडणुका असल्याने त्या दृष्टीने मंत्रिमंडळात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. वाराणसी हा पंतप्रधानांचा मतदारसंघ लक्षात घेऊन सुधारणांची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची कामगिरी जोखण्याचा उपक्रम पुरेशा गंभीरपणे घेण्यात आला. अरुण जेटली, राजनाथसिंग, नितीन गडकरी, सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्या कामगिरीविषयी पंतप्रधानांच्या मनात शंका नसावी. मोदींच्या मर्जीतील मंत्री असा प्रभू यांचा लौकिक आहे. अडथळ्यांच्या शर्यतीत रेल्वेला गती देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. रेल्वेखात्यात क्रांतिकारक सुधारणांची अपेक्षा असलेले प्रभू आणि रस्ते विकासाच्या बाबतीत कमालीचे सतर्क असलेले गडकरी यांच्यापैकी एखाद्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरेल असा अंदाज आहे. मी ड्रायव्हिंग सीटवर असलो तरी देशाची जनता माझ्यासोबत प्रवास करते आहे, अशी नेमकी प्रतिक्रिया रेल्वेमंत्र्यांनी दिली होती. टी-ट्वेंटीसारख्या फलंदाजासारखे खेळून तीन वर्षांत विकास साधेन, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. विकासाची खरी स्पर्धा तिथे दिसते आहे. साध्या एसएमएसवर तात्काळ कारवाई करण्यापासून एकूण प्रवासात दर्जायुक्त सुधारणा करण्यावर सुरेश प्रभूंचा भर आहे. या दोघांच्या तुलनेत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्याविषयीची नाराजी जनतेने लपवून ठेवलेली नाही. प्रेम आणि व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात देशभर टीकेचा सूर उमटला होता. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या पदवीचा विषय विरोधकांनी पेटविला असला, तरी त्यांच्यात संयमाची कमतरता असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले. त्या तुलनेत परराष्ट्र खात्यावर मोदींचा वरचष्मा ठळकपणे जाणवला असतानाही सुषमा स्वराज यांनी मात्र अत्यंत संयत भूमिका निभावली आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या राज्यात निवडणुका होत असल्याने त्यांच्यावर आता नाराज होण्याचा अधिकार साक्षात मोदींनाही नाही. प्रत्येक विस्तारात स्वतःहून शर्यतीत उतरणाऱ्या रामदास आठवलेंच्या पारड्यात एवढ्यात दिलासा टाकला जाईल अशी चिन्हे नाहीत. मंत्र्यांच्या वर्गातील निकाल तसाही बाहेर येणार नाहीच. शेवटी मंत्रिमंडळाच्या ‘प्रभूं’ची कृपा कोणावर होईल याची आस अनेकांना लागली आहे. अवकृपेचा फटका कोणाला बसतो, हेदेखील लवकरच कळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज