अ‍ॅपशहर

​ युद्धखोरीचा महाबॉम्ब

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील डोंगराळ भागांत लपलेल्या ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) दहशतवादी आणि ते लपून बसलेले बोगदे यांच्यावर निशाणा साधत अमेरिकेने तब्बल ९८०० किलो वजनाचा महाबॉम्ब टाकून अमेरिकेने आपल्या हवाई प्रहार क्षमतेचे दर्शन घडविले आहे.

Maharashtra Times 15 Apr 2017, 1:00 am
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील डोंगराळ भागांत लपलेल्या ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) दहशतवादी आणि ते लपून बसलेले बोगदे यांच्यावर निशाणा साधत अमेरिकेने तब्बल ९८०० किलो वजनाचा महाबॉम्ब टाकून अमेरिकेने आपल्या हवाई प्रहार क्षमतेचे दर्शन घडविले आहे. मात्र, आपली संहारक क्षमता दाखवून प्रतिस्पर्ध्याला नमविता येत असल्याचा भ्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झाला असेल, तर तो चुकीचा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mother of all bombs by usa
​ युद्धखोरीचा महाबॉम्ब


व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने तब्बल सत्तर टन स्फोटके विमानातून डागली होती; तरीही अमेरिकेला युद्ध काही जिंकता आले नव्हते. सीरिया आणि इराकमध्ये ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेला जेरीला आणले आहे. सीरियामध्ये क्षेपणास्त्रांचा वापर केल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात महाबॉम्बचा वापर केला आहे. हा महाबॉम्ब डागून नेमके काय साध्य केले याचे उत्तर त्यांनी जगाला नसले, तरी किमान अमेरिकी नागरिकांना द्यायला हवे. ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असे वर्णन केलेल्या या अस्त्राचा वापर करून झाल्यानंतर पुढे काय, याचेही उत्तर त्यांनी द्यायला हवे. आपल्याला युद्ध आवडते, युद्धात भाग घ्यायलाही आवडते, असे निवडणुकीच्या प्रचारात सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी महाबॉम्ब टाकून आपली युद्धखोरी दाखविल्याने जगातील अनिश्चितता नक्कीच वाढली आहे. ‘आयएस’ने पश्चिम आशियातील इराक, सीरिया यांची सीमा केव्हाच ओलांडली असून, अफगाणिस्तानात आणि युरोपातही ती पोहोचली आहे. अमेरिकेवरील ९/११च्या दहशतवादी आक्रमणाला जबाबदार असलेल्या अल् कायदा आणि ओसामा बिन लादेन यांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने त्यावेळी सुरू केलेले ‘दहशतवादाच्या विरोधातील’ युद्ध अजूनही संपलेले नाही. पाकिस्तानात लपलेल्या ओसामा बिन लादेनला शोधून त्याचा खात्मा करण्यात आला, तरी अफगाणिस्तानातील तालिबानी, अल् कायदा आणि आता आयएस यांचे आव्हान संपलेले नाही. किंबहुना ते वाढतेच आहे.

लादेनला मारल्यानंतर अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्याची घोषणा अमेरिकेने केली असली, तरी आजही तिथे सुमारे साडेआठ हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. त्यामुळे, अफगाणिस्तातून सहजपणे बाहेर पडणे अमेरिकेला शक्य झालेले नाही. ९/११च्या आक्रमणानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानंतर इराकवरही रासायनिक अस्त्रांचे निमित्त करून हल्ला केला होता. त्यावेळी इराकवर डागण्यासाठी म्हणून हा महाबॉम्ब तयार करण्यात आला होता. मात्र, तेव्हा त्याचा वापर केला गेला नाही. तो गुरुवारी करण्यात आला. निरपराध नागरिकांना कोणतीही इजा होणार नाही, याची दक्षता घेऊन हल्ला करण्यात आल्याचा दावा अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्यप्रमुख जनरल जॉन निकोल्सन यांनी केला असला, तरी आणि या बाँबफेकीत सर्वसामान्यांचा बळी गेला नसल्याचे पत्रक अफगाणिस्ताननेही प्रसिद्ध केले असले, तरी काही निरपराधांचा मृत्यू झाल्याचा आणि अनेकजण जखमी झाल्याचे तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी सांगत आहेत. दीड कोटी डॉलरहून अधिक किमतीच्या या महाबॉम्बद्वारे अमेरिकेने आयएसच्या ३६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामुळे ‘आयएस’वर कितपत जरब बसेल, याबद्दल शंका आहे. इराक, सीरिया, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया या देशांतील युद्धखोरी वाढणे, अमेरिका आणि रशिया या देशांनी त्यात भाग घेणे जागतिक शांततेच्या दृष्टीने घातक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे सुरू असले, तरी ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामुळे युद्धखोरीला धोक्याचे वळण मिळाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज