अ‍ॅपशहर

पाहती पक्वान्न क्षेत्रींचे ते…...

महाराष्ट्रदेशी सांप्रत जी तुंबळ पळापळ उडून राहिली आहे, तशी तर ती गेल्या कित्येक दशकांत उडाली नसेल. या पळापळीने जी प्रचंड धूळ अवकाशात उडाली आहे, ती सामान्य व पापभीरू नागरिकांच्या डोळ्यांत जाऊन त्यांना समोरचे काही दिसेनासे झाले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 16 Sep 2019, 10:09 am
महाराष्ट्रदेशी सांप्रत जी तुंबळ पळापळ उडून राहिली आहे, तशी तर ती गेल्या कित्येक दशकांत उडाली नसेल. या पळापळीने जी प्रचंड धूळ अवकाशात उडाली आहे, ती सामान्य व पापभीरू नागरिकांच्या डोळ्यांत जाऊन त्यांना समोरचे काही दिसेनासे झाले आहे. या पळापळ करणाऱ्या अतिरथी, महारथी आणि अर्धरथ्यांना महाराष्ट्राचे मंगल भवितव्य अचानकच दिसू लागल्याने त्यांची ही धांदल उडालेली दिसते. मात्र, गरीब बिचाऱ्या मतदाराला रस्त्यावरचे खड्डे दिसत आहेत. महापुरात वाहून गेलेली घरे दिसत आहेत. आभाळाला भिडणारा सालाबादी महाग कांदा दिसत आहे. प्यायलाच नाही; तर विसर्जनाला पाणी कुठून येणार, अशा हजारो उत्सवान्त गणेशमूर्तींचे लातुरातले संमेलन दिसत आहे. संकटातला वाहन उद्योग आणि घसरता रोजगार दिसत आहे. पण त्याची दृष्टीच कोती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम politics


सातारचे महाराज उदयनराजे भोसले तीन-चार महिन्यांपूर्वी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठवून 'राष्ट्रवादी'चे खासदार झाले. मात्र, 'कमळा'ने त्यांचा 'भुंगा' केलाच. त्यांच्या दिव्यदृष्टीला आता कमळाच्या आतूनच प्रगत महाराष्ट्र दिसू लागला आहे. बारामतीकरांचे शेजारी इंदापुरी हर्षवर्धन पाटील यांच्याइतका तरबेज सत्ताकुक्कुट तर शोधून सापडणार नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष-काँग्रेस-भाजप अशी कोणतीही शय्या त्यांना चालते. कोकणी भास्कर जाधवांना 'राष्ट्रवादी'ने प्रदेशाध्यक्ष केले तेव्हा शरद पवारांच्या कृतज्ञतेपोटी त्यांचा गळा (जाहीर) दाटून आला होता. आज त्यांचा तोच गळा 'मातोश्री'वर भरून येतो आहे. महाराष्ट्राला पाठीत खंजीर खुपसण्याची थोर परंपरा आहेच. पण आज खंजीर बनविणारे कारागीर अहोरात्र मेहनत करीत असूनही पुरवठा कमीच पडतो आहे. सामान्यांना वाटते की, हे 'मतमतांचा गल्बला, कोणी पुसेना कोणाला..' असे चालले आहे की काय? पण ते तसे नाही. कोणाला, कुठे जाऊन आणि कसे पुसायचे आणि पदरात काय पाडून घ्यायचे, याचे नेमके भान सर्वांना आहे. लाचारांच्या, लाळघोट्यांच्या आणि लबाडांच्या फौजा जमवून भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्रात दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा रामराज्य आणायचे आहे. संसदीय लोकशाहीची इतकी क्रूर थट्टा, आख्खा विधिमंडळ पक्ष दुसऱ्या दावणीला नेऊन बांधणाऱ्या भजनलाल किंवा वसंतदादा पाटील यांचे आघाडी सरकार उलथवणाऱ्या दगलबाजांनीही केली नसेल.

काही दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांचे बोलभांड नेते 'आमचे दरवाजे येईल त्याला खुले नाहीत. आम्ही माणसे पारखूनच घेणार आहोत..' असा नैतिकतेचा टेंभा मिरवत फिरत होते. आणि आता एकेक ओवाळून टाकावीत, अशी नररत्ने युतीच्या तंबूत दिवसरात्र घुसत आहेत. युतीच्या रत्नपारख्यांची नजर आता अधू झाली की, त्यांच्यावर कुणी नजरबंदीचा खेळ केला, हे कळायला मार्ग नाही. सामान्य नागरिक या साऱ्याला किती वैतागला आहे, याचे प्रतिबिंब 'सोशल मिडिया'त न पडते तरच नवल. अशाच मेसेजमध्ये 'वाटले तर तुम्ही नाणेफेक करून आमदार ठरवा, पण आमच्या गावातले खड्डे बुजवा…' असे म्हटले होते. कुणाचीही सत्ता आली तर आपल्या नशिबी कोणते भोग लिहून ठेवले आहेत, याची ही प्रातिनिधिक उद्विग्नता होती. सगळेच नाही पण अनेक नेते नेमके का पक्षांतर करीत आहेत, हे उघड गुपित आहे. काही दिवसांपूर्वी सुरेश जैन व इतरांना जळगावच्या कुख्यात घरकुल प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठवली. त्यावर ज्येष्ठ भाजपनेते एकनाथ खडसे यांनी 'कारवाई होऊ नये आणि घोटाळे दडपले जावेत, यासाठी सुरेश जैन यांनी अनेक पक्षांतरे केली खरी, पण अखेर त्यांचा न्याय झाला..' अशी सडेतोड प्रतिक्रिया दिली. खडसे यांनी दिलेले हे घरचे उदाहरण ऐकण्याच्या मनस्थितीत भाजप आणि शिवसेनेचे दिग्गज बहुधा नसावेत. नाहीतर, जत्रेतल्या कुस्त्यांच्या फडासारखे रोजच्या रोज गावोगाव 'मेगाभरती'चे संकोचशून्य फड त्यांनी भरवले नसते. मुळात बांधेसूद राजकीय तत्त्वज्ञान, त्यावर आधारित विचारसरणी आणि या दोन्हींच्या अनुषंगाने आखलेली कार्यक्रमपत्रिका अशी कोणत्याही पक्षाची रचना हवी. कार्यकर्ते, नेत्यांना हे तीनही घटक अवगत व मान्य हवेत. मात्र, हा उच्चारही हास्यास्पद ठरावा, इतकी लज्जास्पद अवनीती महाराष्ट्राच्या राजकारणाने गाठून दाखवली आहे. तुकोबांनी 'लावोनिया मुद्रा, बांधोनिया कंठी; हिंडे पोटासाठी देशोदेशी..' असे धर्मदांभिकांना टोकले. त्यांची नजर..'नेसोनि कोपीन, शुभ्रवर्ण जाण; पाहाती पक्वान्न क्षेत्रींचे ते..' अशी असते, हे सांगितले. असल्या ढोंग्यांपाशी 'गोविंद नाही नाही..' असा इशाराही दिला. मग आता सत्तेसाठी दारोदार फिरणारे व त्यांना तुकडे टाकून चुचकारणारे, यांच्या अंगणातही निरभ्र लोकशाहीचा 'गोविंद' कधीतरी खेळेल काय?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज