अ‍ॅपशहर

हास्यास्पद आणि अनुचित

काँग्रेस स्थापन झाल्यापासून विक्रमी काळ अध्यक्षपद सांभाळलेल्या व प्रकृती तितकीशी ठीक नसलेल्या सोनियांना पक्षाचा ताबा मुलाकडे देण्याचा अद्याप धीर का होत नसावा? या अनेकांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर स्वतः राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात दिले.

Maharashtra Times 25 Sep 2017, 12:56 am
राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा ४० वर्षांचे होते. आजी इंदिरा गांधी १९५९ मध्ये पक्षाध्यक्ष झाल्या तेव्हा ४२ वर्षांच्या होत्या. वडील राजीव १९८४ मध्ये अचानक पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान झाले तेव्हा ते केवळ ४० वर्षांचे होते. राहुल १९ जूनला ४७ वर्षांचे झाले. नेहरू-गांधी घराण्यातली मोठी जबाबदारी सांभाळण्याची वयाची सरासरी काढली तर राहुल ती ओलांडून बरेच पुढे आले आहेत. तरीही, काँग्रेस स्थापन झाल्यापासून विक्रमी काळ अध्यक्षपद सांभाळलेल्या व प्रकृती तितकीशी ठीक नसलेल्या सोनियांना पक्षाचा ताबा मुलाकडे देण्याचा अद्याप धीर का होत नसावा? या अनेकांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर स्वतः राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi at times square
हास्यास्पद आणि अनुचित


न्यूयॉर्कच्या प्रख्यात टाइम्स स्क्वेअरमध्ये निवडक श्रोत्यांच्या टाळ्या जिंकण्यासाठी राहुल यांनी अनेक राष्ट्रीय नेत्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने जे अनिवासी भारतीयत्व बहाल केले, ते धक्कादायक होते. उद्या जो नेता सर्वांत जुन्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आणि त्यामुळे भविष्यात पंतप्रधानही होऊ शकतो, त्याने महात्मा गांधींपासून सरदार पटेलांपर्यंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून पंडित नेहरू यांच्यापर्यंत साऱ्यांना ‘एनआरआय’ म्हणावे, हे लाजिरवाणे होते. एनआरआय मंडळींचे मन जिंकण्यासाठी राहुल यांनी हा खटाटोप केला असणार, हे टाळ्यांच्या आवाजावरून कळतच होते. पण श्रोत्यांचा अनुनय करताना वस्तुस्थितीला सोड​चिठ्ठी दिली तर आपल्याही विश्वासार्हतेला धक्का बसू शकतो, याचे भान राहुल यांनी बाळगणे आवश्यक होते.

राहुल कुठे काय बोलणार, याचा अदमास सहकाऱ्यांनी घ्यायला हवा होता आणि योग्य तो सल्लाही त्यांना द्यायला हवा होता. राहुल यांनी नावे घेतलेल्या नेत्यांपैकी गांधीजी वगळता सारे आपापले उच्च शिक्षण संपवून भारतात परतले होते. म्हणूनच सध्याच्या एनआरआयचे कौतुक करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची सारी फळी ‘अनिवासी भारतीय’ ठरविणे अनैतिहासिक तसेच अनुचित होते. भारताच्या स्वातंत्र्याचे आणि नवसर्जनाचे जे स्वप्न या दिग्गज नेत्यांनी पाहिले, ती सारी स्वप्ने ते परदेशांत असताना त्यांच्या हृदयात पेरली गेली, असे राहुल सूचित करत होते.

काँग्रेस स्थापनेनंतरची पहिली काही वर्षे वगळता उदार भारतीय राष्ट्रवादाची जी मांडणी काँग्रेस नेत्यांनी सातत्याने केली; ती काही केवळ तिथे टिपून इथे पेरण्याइतकी परभृत नव्हती. महात्मा गांधींच्या जीवनाचा धावता आढावा घेतला तरी हे चटकन् लक्षात येईल. खरेतर राहुल यांचा हा दौरा चांगला चालला होता. पण त्यांनी इतिहासाचा आवाका न पेलता ही घोडचूक करून ठेवली. त्यांनी आजवर जाहीरपणे बोलताना बऱ्याच गफलती केल्या आहेत. पण ही त्या सर्वांवरची कडी होती. त्यांच्या चुकांची जाहीर चर्चा होणार, याचे कारण एका ऐतिहासिक पक्षाचे नेतृत्व त्यांच्या हाती जाणार आहे. त्यामुळे, त्यांच्या या हास्यास्पद विधानांची ‘बौद्धिक व्यवस्था’ लावणाऱ्या भाट-चारणांनी एका व्यक्तीपेक्षा पक्षाच्या भवितव्याचा विचार करायला हवा. काँग्रेस हा आजही सर्वाधिक रुजलेला पक्ष आहे आणि द्विदल सांसदीय लोकशाही चालायची तर तो मजबूत असायलाच हवा. पण काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भवितव्याचा व्यापक विचार केला नाही तर त्यांनाही एक दिवस इथे राहूनही ‘एनआरआय’ झाल्यासारखे वाटू लागेल!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज