अ‍ॅपशहर

रानं झालं आबादानी...

विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच पर्जन्यराजाने संपूर्ण राज्यावरच मनमुराद बरसात करून एकाअर्थाने दुष्काळाचे विघ्नहरण केले आहे.

Maharashtra Times 22 Aug 2017, 2:00 am
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच पर्जन्यराजाने संपूर्ण राज्यावरच मनमुराद बरसात करून एकाअर्थाने दुष्काळाचे विघ्नहरण केले आहे. गेला किमान सव्वा महिना पावसाने दडी मारली होती. देशभर विशेषत: ईशान्येकडील राज्यांमध्ये महापुराचे संकट गहिरे झाले असताना महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खान्देश पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात होता. विदर्भातील पावसाची तूट तर थेट ३२ टक्क्यांवर पोहोचली होती. मराठवाड्यातील स्थितीही गंभीर बनली होती. खरीपाच्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. ऐन पावसाळ्यातील पाणीटंचाईने दुष्काळाच्या भीषण संकटाची चाहूल लागली होती. राज्यातील २३ जिल्हे रेड झोनमध्ये होते. हंगामातील ७७ पैकी फक्त २९ दिवसच पाऊस पडला होता. रिमझिम पावसासाठी ओळखला जाणाऱ्या श्रावणात तर चक्क भाद्रपदाच्या उन्हाचा तडाखा बसला होता. निराशेच ढग असे दाटून आले असताना गणरायाच्या आगमनाची दुदुंभी वाजली आणि पर्जन्यराजा जणू त्याच्या स्वागतालाच मन:पूत धावून आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rains have returned
रानं झालं आबादानी...


शुक्रवार रात्रीपासून पुनरागमन केलेल्या पर्जन्यराजाने नंतर सारा महाराष्ट्र व्यापून संततधारेची कृपावृष्टी चालू ठेवली आहे. मराठवाड्याच्या काही भागात तर अतिवृष्टी झाली आहे. खरीपाची काही पिके वाचण्याची शक्यता या पावसाने जरूर वाढली असून, रब्बी हंगामाला तर मोठा हातभार लागणार आहे. जुलैच्या मध्यात गायब झालेल्या पर्जन्यराजाने दीर्घ विश्रांतीनंतर हजेरी लावल्याचा आनंद अवर्णनीय असला तरी आजही विदर्भाच्या अनेक भागात त्याने केवळ ढगांची सावलीच धरली आहे. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर तेथील जनता कशीबशी तग धरून आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तूटच एवढी मोठी आहे की पुढच्या नक्षत्रातही चांगला पाऊस झाला तरच खऱ्या अर्थाने शेती तसेच शेतकरी वाचू शकतील. दुष्काळाच्या केवळ भीतीपोटी ३४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली यावरून टंचाईच्या झळांची तीव्रता कळावी. सध्याचा पाऊस किमान अशा शेतकऱ्यांना दिलासा आणि उभारी तर निश्चितच देऊ शकणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर, धान या खरीप पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. लहानमोठी धरणेही भरण्याच्या स्थितीत असल्याने पुढे दमदार पाऊस झाला नाही तरी निराशेचे मळभ मात्र दूर झाले असे म्हणता येते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात त्यामानाने उत्तम स्थिती असली तरी त्यातील काही तालुके पर्जन्यछायेत येत असल्याने दुष्काळाचे संकट होतेच. आता संततधारेमुळे जमिनीत पाणी मुरेल आणि भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. त्याचा पुढील काही महिने तर हमखास लाभ मिळेल. पावसाच्या प्रमाणावर एकुणातच अर्थकारण अवलंबून असते. नुकत्याच दिलेल्या कर्जमाफीमुळे आर्थिक आघाडीवर काहीशा हतबल झालेल्या राज्य सरकारलाही हा पाऊस एखाद्या आधारवडासारखा आहे. कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नसतानाच दुष्काळाच्या मागणीने जोर धरला होता. पाऊस आणखी लांबला असता तर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांना आयतीच संधी मिळाली असती. सुदैवाने किमान दुष्काळाचे संकट तरी सध्या टळले असून, चिंब पावसानं रानं झालं आबादानी अशी आनंदाची भावना सरकारी पातळीवर तसेच समाजातही व्यक्त होईल, यात शंका नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज