अ‍ॅपशहर

वातावरणनिर्मितीचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरू झाले आहेत. मराठवाड्यासह अर्ध्याहून अधिक राज्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. पुढचे आठ महिने कसे जाणार? याची चिंता आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेली काँग्रेस या दुष्काळात प्रथमच विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे.

Maharashtra Times 21 Oct 2018, 5:46 am
- मकरंद कुलकर्णी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम attempts to create an environment
वातावरणनिर्मितीचा प्रयत्न


Makarand.Kulkarni@timesgroup.com

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरू झाले आहेत. मराठवाड्यासह अर्ध्याहून अधिक राज्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. पुढचे आठ महिने कसे जाणार? याची चिंता आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेली काँग्रेस या दुष्काळात प्रथमच विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. निवडणुका आणि दुष्काळ या दोन्ही पातळ्यांवर राज्यातील काँग्रेस सक्षम ठरणार की नाही, हे काळच दाखवून देणार आहे. मात्र नेत्यांनी दौरे, आंदोलनांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न सुरू केला आहे. तो पुढे कसा टिकतो यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

काँग्रेसने २०१४ मध्ये केंद्र आणि राज्यातील सत्ता गमावली. सुरुवातीचे दोन वर्षे विरोधी पक्षात असताना कसे काम करायचे? हेच काँग्रेस नेत्यांना माहित नव्हते. इंधन दरवाढ, शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी अनुदान यावर जनता नाखूष असल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेसने हल्लाबोल सुरू केला. नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन यात्रा काढली. गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेसने मात्र केंद्रावर थेट निशाणा साधणे सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते विविध आंदोलने, मोर्चांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. राफेल मुद्दा असो की अर्थकारण बिघडल्याचा प्रश्न असो. जाहीर व्याख्यानांमधून सरकारची खेळी कशी चुकली हे काँग्रेस नेते दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठवाडा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवसेनेने पाय रोवल्यानंतर काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने जिंकलेल्या दोन जागा मराठवाड्यानेच दिल्या. त्याचाच परिपाक म्हणून की काय श्रेष्ठींनी प्रदेशाची जबाबदारी अशोक चव्हाणांकडेच कायम ठेवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी मध्यंतरी हे पद मिळविण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या होत्या पण त्याला दिल्ली दरबारी दाद मिळाली नाही.

मराठवाड्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. ऑक्टोबर महिना अर्धा संपतानाच जलसाठे कोरडे पडले आहेत. पुढचे आठ महिने कसे जाणार असा प्रश्न आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. दुष्काळ जेव्हा जाहीर व्हायचा तेव्हा होईल पण त्याआधीच राज्य सरकारने काही गोष्टी जाहीर करणे अपेक्षित होते. पण अजून तसे झालेले नाही. या अनुषंगाने काँग्रेस नेत्यांनी औरंगाबादेत दुष्काळ आढावा चिंतन बैठक घेतली. बैठकीत आठही जिल्ह्यांच्या नेत्यांकडून परिस्थिती विचारली गेली आणि शेवटी नेत्यांची भाषणे झाली. बैठकीत नेमके काय चिंतन झाले हे काँग्रेस नेत्यांचा ठावूक. सत्तेत वर्षानवुर्षे राहून अनुभव असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून दुष्काळी मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी एखादा ठोस कार्यक्रम जाहीर करणे अपेक्षित होते. सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही तर रस्त्यावर उतरू असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेस सत्तेवर असताना भाजप नेते याच पद्धतीने जाब विचारत होते. आता फक्त पक्ष बदलले. मराठवाड्याची परिस्थिती तीच आहे. बैठका घेऊन जर प्रश्न सुटले असते तर आतापर्यंत अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असते. हे काँग्रेस सोयीस्करपणे विसरली आहे. के‌वळ शब्दांमधील आक्रमकपणा दाखवून चालणार नाही. जनतेला दिलासा देण्याजोगी कृती काँग्रेस नेत्यांकडून झाली पाहिजे. महागाई, इंधन दरवाढ, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या मनात पुन्हा घर घरायचे असेल तर काँग्रेसला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला. आता मराठवाड्यात ही यात्रा फिरणार आहे. केवळ हायवेवरील गावांमधून न जाता खेड्यापाड्यांमध्ये जनतेचे सुरू असलेले हाल काँग्रेस नेत्यांनी अनुभवण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुका काही महिन्यात होतील. सत्तेत परतण्याचे सूतोवाच काँग्रेसची नेतेमंडळी करत आहेत. पण त्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणावत संघटन करावे लागणार आहे. गटतटांचे राजकारण अजूनही काँग्रेसमधून संपलेले नाही. सत्ता नसतानाही आपापले गड सांभाळण्यातच धन्यता मानली जात आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या भिंती तोडून टाकू असे म्हटले होते. त्याची अंमलबजावणी मात्र कुठेच होताना दिसत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी कठीण जाणार यात शंका नाही.

दुसऱ्या फळीची गरज

काँग्रेसमध्ये खासदार राजीव सातव, आमदार प्रणिती शिंदे, सत्यजित तांबे, अमित देशमुख, विश्वजित कदम, आशिष देशमुख, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ हे तरुण नेते आहेत. आगामी निवडणुकांमध्ये या यंग ब्रिगेडला काँग्रेसने राज्यभर प्रचारासाठी फिरवण्याची गरज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज