अ‍ॅपशहर

भयमुक्त ‘मुक्तिधाम’!

मनुष्याच्या जीवनाची अखेर जिथं होते, त्या स्मशानभूमीत जाण्याच्या विचारानंही काहींच्या हृदयात धस्स होतं. इथं स्मशानभूमी आहे, असं कळलं तरी तिच्या आजूबाजूची वाट न धरता अगदी वळसा घालून जाणारे शेकडोंच्या संख्येनं सापडतील. शेजारील गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यात मात्र याबाबत काहीसं वेगळंच चित्र आहे. इथल्या स्मशानभूमीनं भीतीच्या या धारणेला सपशेल छेद दिला आहे. इथं लोकांचा सतत राबता असतो. यामागचं कारणही तसंच अनोखं आहे...

Authored byलहू सरफरे | महाराष्ट्र टाइम्स 26 Mar 2023, 9:48 am
भल्यामोठ्या ज्वाळा बाहेर फेकणाऱ्या सरणाच्या आगीशी हळूहळू एकरूप होत असलेलं पार्थिव, त्याभोवती उभा असलेला शोकाकुल जनसमुदाय, शेजारीच मृतदेहावरून ओवाळून तोडूनमोडून टाकलेली तिरडी, सरणाभोवती फेऱ्या मारल्यानंतर पाठीमागं फेकलेल्या मडक्याच्या इतस्तत: विखुरलेल्या खापऱ्या, जवळच कुठल्यातरी एक कोपऱ्यात असलेला दुसऱ्या कुणाच्या तरी मृतदेहाच्या राखेचा ढिगारा…... ‘स्मशान’ हा शब्द कानी पडला तरी हे असं काहीसं दृष्य उभं राहतं! शहरी भागात आता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून सरणावरती शेड, पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह किंवा पुढील दहाव्या, बाराव्याच्या कार्यक्रमाची सूचना देण्यासाठी व इहलोकी गेलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रशस्त शेड उभारण्यात आल्याचे दिसते. परंतु ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी आजही खुल्या आभाळाखालीच अंत्यविधी उरकावा लागतो. अर्थात, शहर असो वा गाव, स्मशानभूमीबाबत एक बाब मात्र समान आहे; ती म्हणजे या ठिकाणाबाबत असलेली भीती!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gujrat smashan
भयमुक्त ‘मुक्तिधाम’!


इथं स्मशानभूमी आहे, असं कळलं तरी तिच्या आजूबाजूची वाट न धरता अगदी वळसा घालून जाणारे शेकडोंच्या संख्येनं सापडतील. या ठिकाणी जणू भुताटकी दिवस-रात्र वास करते, असं वातावरण पूर्वीपासूनच तयार करण्यात आलेलं आहे. अगदी आपलं धारिष्ट्य सिद्ध करण्यासाठी अमावास्येच्या रात्री चक्क स्मशानभूमीत खुंटी ठोकून येण्याच्या पैजा लावल्या गेल्याच्या गोष्टी आपल्याकडं रसभरीत वर्णानानं ऐकवल्या जातात. परिणामी मनुष्याच्या जीवनाची अखेर जिथं होते, त्या जागी जाण्याच्या विचारानंही काहींच्या हृदयात धस्स होतं. हे सगळं असं असलं तरी शेजारील गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यात मात्र काहीसं वेगळंच चित्र आहे. इथल्या स्मशानभूमीनं भीतीच्या या धारणेला सपशेल छेद दिला आहे. इथं जायला लोक अजिबात घाबरत नाहीत. उलट इथं पिकनिक, प्री-वेडिंग फोटोशूट किंवा वाढदिवस साजरा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढतच आहे.

बनासकांठामधील डीसा या पालिका क्षेत्रातील ही स्मशानभूमी सध्या कुतूहल आणि आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. बनास नदीकाठी वसलेलं डीसा हे छोटंसं शहर ब्रिटिश काळात प्रशासकीय उपविभाग (प्रांत) असलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या पालनपूर एजन्सीच्या अखत्यारित येत असे. सन १९४७मध्ये स्वातंत्र्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीची बॉम्बे राज्यात पुनर्रचना झाली. पुढं १९६०मध्ये बॉम्बे राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरातची भाषावार विभागणी झाली तेव्हा डीसा गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात आलं. अगदी दीड लाख लोकसंख्याही नसलेलं हे शहर बटाटे आणि इतर कृषी उत्पादनाचा व्यवसाय वाढल्यानं अलिकडच्या काळात बरंच विस्तारलं आहे. गोहिल, राठोड, राजा, गालसर आदी अनेक राजपूत राजस्थानातून स्थलांतरानंतर आता इथंच स्थिरावले आहेत. हे शहर इथल्या अनोख्या स्मशानभूमीमुळे सध्या चर्चेत आलं आहे. कारण या स्मशानानं आपल्या सौंदर्य आणि सुविधांच्या जोरावर स्मशानभूमीबद्दलची उदास, निराशाजनक आणि भीतीदायक ठिकाण ही वर्षानुवर्षांची ओळख पुसून टाकत लोकांना त्यांची पावलं आपल्याकडं वळवण्यास भाग पाडलं आहे.

१४ बिघा अर्थात सुमारे १२ हजार चौ. फुटांमध्ये पसरलेली ही स्मशानभूमी खरोखरच अनोख्या पद्धतीनं साकारण्यात आली आहे. तिचं प्रवेशद्वारच एखाद्या रिसॉर्टसारखं किंवा मोठे उत्सव आयोजित होणाऱ्या ठिकाणासारखं भव्य आहे. यातील घुमटासारखी सिमेंटची इमारत अंत्यसंस्कारासाठी वापरली जाते. विशेष म्हणजे यात मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. इथं केवळ एका रुपयात अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यविधीचा खर्च न परवडणाऱ्यांसाठी याहून मोठा दिलासा काय असू शकतो?

स्मशानाव्यतिरिक्त इथं प्रार्थनागृह, वृद्धांसाठी एक ग्रंथालय, एक मोठी बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, एक स्मारक संकुल, स्नानगृहं, शौचालयं आणि इतर सुविधा अगदी सढळहस्ते उभारण्यात आल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या स्मशानभूमीच्या रचनाकारांनी ग्रामीण जीवनाकडं दुर्लक्ष न करता त्याला यात विशेष स्थान दिलं आहे. या संकुलात ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणारी चित्रं रेखाटण्यात आली आहेत. हिंदू धर्माशी संबंधित भिंतीचित्रंही इथलं खास आकर्षण आहेत. शिवाय एक विहीर आणि पावसाचं पाणी साठवण्यासाठी सुविधाही यात समाविष्ट आहे.

मुक्ती मिळालेल्या व्यक्तीला शांत चित्तानं अखेरचा निरोप देण्याच्या मुख्य उद्देशानं उभारण्यात आलेली ही स्मशानभूमी तिचं अप्रतिम सौंदर्यीकरण, विविध सुविधा आणि शांततेमुळं आनंदोत्सव साजरे करू इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा एक लोकप्रिय ठिकाण बनत आहे. एकूणच या ठिकाणानं स्मशानभूमी ही संकल्पनाच पूर्णपणे बदलून टाकली आहे. जिथं जायला लोकं घाबरतात, टाळतात; त्या जागेबाबत अशी वेगळी ओळख निर्माण करून लोकांना तिथं यायला भाग पाडणारी ही कल्पना निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. महत्त्वाचं म्हणजे, सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या या स्मशानभूमीचं ८० टक्के कामच सध्या पूर्ण झालं आहे. तरी ती आजूबाजूच्या परिसरात लोकप्रिय ठरली आहे. काम १०० टक्के पूर्ण होईल, तेव्हा लोकांची इथं रांगच लागेल बहुदा!

गुजरात हे राज्य विकासाच्या बाबतीत नेहमीच देशासाठी ‘रोल मॉडेल’ राहिलं आहे. साबरमती नदीचं सुशोभीकरण असो वा अलिकडचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, गुजरात कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. अर्थात, हे काही एका रात्रीत झालेलं नाही. यासाठी अनेक वर्षं सातत्यानं मेहनत घेतली जात आहे. पायाभूत सुविधांसोबतच इथं सौंदर्यीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. पायाभूत सुविधा विकास कायद्याला मान्यता देणारं गुजरात हे देशातील पहिलं राज्य आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील गुंतवणुकीला पाठिंबा देण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं होतं. १९९५मध्ये या कायद्याच्या आधारे गुजरात पायाभूत सुविधा विकास मंडळाची (जीआयडीबी) स्थापना करण्यात आली. अशा सगळ्याच प्रयत्नांचं प्रतिबिंब आता खोलवर दिसत आहे. डीसामधील स्मशानभूमी हे याचं एक सर्वोत्तम उदाहरण ठरावं!
लेखकाबद्दल
लहू सरफरे
लहू सरफरे हे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीमध्ये 'प्रिन्सिपल डिजिटल कंटेण्ट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. मागील दोन दशके ते पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. सुरुवातीची सुमारे सहा वर्षे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर आजतागायत ते संपादकीय विभागात कार्यरत आहेत. सरफरे यांनी मुंबईतील विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. मनोरंजनासह 'खाद्यसंस्कृती' हा त्यांचा स्वारस्याचा विषय आहे. याशिवाय देश-विदेशातील वर्तमान घडामोडी व सामाजिक विषयांवरही ते सातत्याने लिखाण करत असतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज