अ‍ॅपशहर

बालपणीचा स्मरणगंध

सगुणाचा ऐलतीर, निर्गुणाचा पैलतीर अन‍् या दोन्ही मधल्या काल सागरातील जलक्रीडा; या जलक्रीडेतील जीवन क्रीडेचा पूर्वार्ध म्हणजे डॉ. इरेश स्वामी लिखित ‘भीमा आणि चंद्रभागा’.

Maharashtra Times 20 Aug 2017, 4:00 am
डॉ. कमल ठकार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम book by iresh swami
बालपणीचा स्मरणगंध


बालपणीचा स्मरणगंध

संत परंपरेची भक्तिज्ञानगंगा अन् टाळ-मृदुंगाच्या साथीने निनादणाऱ्या स्वरगंगेचा मिलाफ चंद्रभागेच्या तीरी झाला. सगुणाचा ऐलतीर, निर्गुणाचा पैलतीर अन‍् या दोन्ही मधल्या काल सागरातील जलक्रीडा; या जलक्रीडेतील जीवन क्रीडेचा पूर्वार्ध म्हणजे डॉ. इरेश स्वामी लिखित ‘भीमा आणि चंद्रभागा’.

भीमा आणि चंद्रभागेच्या तीर्थात न्हाऊन निघालेल्या सश्रद्ध, पण डोळस मनाने एकाच वेळी विभिन्न पातळीवरून जीवनाचा वेध घेतला आहे. विपरीत वास्तव. अवनत वास्तव कटू वास्तव, जीवघेणं दा‌रिद्र्य, दुःख, वेदना, छिलून गेलेलं आयुष्य, उदास जीवन, चिमणीने दाणे टिपावे. इतक्या सहजतेने बाळपणीने क्षण टिपले आहेत. कटू अनुभवाने कडवटपणा निर्माण केला नाही. अभावग्रस्त जीवनाने नकारात्मकता पेरली नाही. दारिद्र्याने सूडबुद्धी निर्माण झाली नाही; तर दारिद्र्याच्या दलदलीतून सर्जनाच्या वाटा निर्माण केल्या. सौजन्याच्या ओंजळीत कण्हेरी इतकीच बकुळफुलं वेचली. बाळपणीच्या स्वप्नांना धुळीत मिसळू न देता ओंजळीतल्या सांजवातीत परावर्तित केलं.

जसं जीवन पाहिलं, भोगलं, अनुभवलं, वेचलं त्याचंच दर्शन साध्या, सरळ अभिनिवेशाशिवाय स्वतःची सतत दखल न घेता, त्या जीवनाचं दर्शन घडवलं आहे. सत्याचा अभिनय, अभिनिवेश असत नाही. सत्य प्रतिष्ठित करायला लेखणीची फार मोठी ताकद असावी लागते. डॉ. इरेश स्वामी यांच्या भावनाप्रधान व संस्कारसंपन्न लेखणीने सचेतन अस्तित्वांचं दर्शन घडवलं आहे.

‘भीमा आणि चंद्रभागा’ चिंतनशील वाचकाची जाणीव व भावभूमी समृद्ध करणारी आहे. हे पुस्तक खरंतर बाळपणीच्या स्मरणाला केलेलं अभिवादन आहे. जीवन जाणिवा जागवणारी समृद्ध करणारी, जीवन संवेदना सचेत करणारी लेखणी आहे. प्रयत्नापासून पूर्तीपर्यंतचा प्रवास ज्या जिद्दीने आणि जीवाच्या आकांताने कसा केला जातो, याचं दर्शन ‘भीमा आणि चंद्रभागा’त घडतं. जीवनाची गुंतागुंत, जीवनाची जडणघडण, आयुष्य विंचरून काढण्याचा प्रयत्न, जीवन समजावून घेणं आणि समाजावून देणं, कमरेत न खचता येणारी आव्हानं पेलणं, माणूस वाचणं, माणूस स्वतःच एक प्रश्नांकित समस्या, या माणूस नावाच्या समस्येची उकल करण्याच्या प्रयत्नाचा वस्तूपाठ म्हणजे ‘भीमा आणि चंद्रभागा’. बहुआयामी आणि बहुप्रसवा प्रज्ञा आपल्या अंतरंगात न्हाऊन निघावी लागते. तेव्हाच सखोल जाणीवेतून. जीवन प्रयोजनातून नव नि‌र्मिती घडत असते. जीवनाच्या निरंतर साधनेतून सघन साहित्स निर्मिती होत असते.

‘भीमा आणि चंद्रभागा’ची अभिव्यक्ती सहज, अर्थपूर्ण आणि भावप्रधान आहे. आध्यात्मिक अधिष्ठानातून सरस्वतीच्या आशीर्वादाने समाधी प्रज्ञा निर्माण होते. जे जसं आहे, अगदी तसंच, सत्याच दर्शन घडविणारे सत्याचा अभिनय आणि अभिनिवेश असत नाही. त्या सत्याला प्रतिष्ठित करण्याचं काम भीमा आणि चंद्रभागाने केलं आहे. डॉ. इरेश स्वामीनी दुःख, वेदना पचविल्या आहेत. दुःख पचविलेल्या व्यक्तिमत्त्वाची स्वतःची भाषा असते.

स्वयंभू प्रज्ञेला अनुकरणाची गरज नसते. निजरंगातली अन्तस्थ प्रज्ञा जेव्हा आत्मरंगात रंगते तेव्हा चेतनेला घुमारे फुटतात आणि भीमा-चंद्रभागेच्या तीरी आनंदकंद फुलतात. लेखकाने आई-वडिलाचे चित्र साकारताना गुण-दोषांसकट चित्रित केले आहे. पण कुठेही श्रद्धा उणी झालेली दिसत नाही. तसा श्रद्धेचा बाजारही नाही.

दुःख मिळण्यापेक्षा सहन करणं अवघड असते. मात्र, लेखकाने प्रखर वास्तवातून जीवनक्षण टिपले आहेत. स्मरण गंधाने वेढलेल्या स्वतःचा जीवन परडीत भळभळत्या जखमांची अर्थ फुले गंधीत झाली आहेत. भीमा आणि चंद्रभागेतला स्मरण गंध सावळ्या सांजेला अलगद भरून आला आहे. नामदेव, पाटलीणबाई, जहागीरदार, आजी, काकू, काका, आई-वडिल, मामी अशी व्यक्तिचित्र म्हणजे रूपवेध. चंद्रभागेच्या सांज प्रवाहात ती प्रतिबिंबीत झाली आहेत. ‌‌बिंबापेक्षा प्रतिबिंब उत्कट असते. याच न्यायाने भीमा आणि चंद्रभागा हे ललित स्वतः लेखकाने वाटरबॉय, कापूर विकून चार-सहा आणे मिळवले. सारचं वर्णन अस्वस्थ करणारं आहे; पण लेखकाच्या शांत, संयमी आणि अनाक्रोशी लेखणीतून पचविलेल्या जीवनाचं अमृतदर्शन ‘भीमा आणि चंद्रभागा’त घडवलं आहे.

भीमा आणि चंद्रभागा

लेखक : डॉ. इरेश स्वामी

प्रकाशक : सुविद्या प्रकाशन, सोलापूर

पृष्ठं : १०८

किंमत : १०० रु.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज