अ‍ॅपशहर

थंडीच्या स्वभावे,सावध व्हावे

थंडीचा कालावधी पुढेमागे होणं, ही आता केवळ गमतीची बाब उरलेली नाही, तर मानवी आरोग्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेपर्यंत विविध क्षेत्रांवर थंडीतले चढउतार फार मोठे परिणाम करत आहेत... त्याचा घेतलेला वेध.

Maharashtra Times 19 Nov 2018, 3:14 pm
अभिजित घोरपडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम winter1


थंडीचा कालावधी पुढेमागे होणं, ही आता केवळ गमतीची बाब उरलेली नाही, तर मानवी आरोग्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेपर्यंत विविध क्षेत्रांवर थंडीतले चढउतार फार मोठे परिणाम करत आहेत... त्याचा घेतलेला वेध.

या वर्षीच्या कोजागरी पौर्णिमेला संपूर्ण चंद्राचे दर्शन झाले. त्या वेळी आश्चर्य वाटले आणि यंदा थंडीचा हंगाम वेळेवर सुरू होईल, असेही वाटून गेले. कारण गेली सलग सहा-सात वर्षे कोजागरीला पूर्ण चंद्र पाहायलाच मिळाला नाही. कधी ढगांचे मळभ दाटून आलेले, तर कधी पावसाच्या सरीसुद्धा. निदान पुण्याचा आणि राज्याच्या बऱ्याचशा भागाचा हाच अनुभव आहे. या वर्षी कोजागरीला पूर्ण चंद्र दिसला, तरी पुढे दिवाळीत मात्र ऋतुमानाने ते बदलले असल्याचे सिद्ध केलेच. ऐन दिवाळीत ढगाळ हवामान होते, काही ठिकाणी तर पावसाच्या सरीसुद्धा पडल्या. अर्थातच, दिवाळीत थंडी नव्हतीच. पण आता यात विशेष वाटावे असे काही उरले नाही, कारण गेली काही वर्षे थंडी आणि दिवाळी यांचे, एकेकाळी पहायला मिळायचे तसे नाते पाहायला मिळतच नाही. कडाक्याची थंडी ही तर लांबचीच गोष्ट. त्यामुळे आधीच्या पिढ्यांसाठी दिवाळी हा थंडीच्या दिवसातील सण असल्याची ओळख आताच्या पिढ्यांना राहणार का, हा प्रश्नही आहे!

महाराष्ट्राच्या दृष्टीने हा मोठा बदल आहे. केवळ हवामानाच्या दृष्टीनेच नव्हे तर शेती, आरोग्य आणि सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा. याबाबत लोकांची अनेक निरीक्षणे आहेत. त्यातून त्यांनी निष्कर्षसुद्धा काढले आहेत. अगदी 'पूर्वीसारखी थंडी पडतच नाही' इथपासून ते 'हा हवामान बदलाचाच परिणाम आहे' इथपर्यंत. सामान्यत: गारठा कमी झालाय आणि थंडीमध्ये चढउतार होत राहतात, हा सर्वसाधारण अनुभव. प्रदेशानुसार आणि व्यक्तिनुसार त्यात काही बदल होतात, पण हा प्रातिनिधिक अनुभव. अशा अनुभवामागे मागच्या पिढ्यांच्या स्मरणरंजनाचा भाग असतोच. आपला काळ कसा वेगळा होता आणि आता सारे कसे बदलले आहे, हे भासवणेही त्यामागे असते. पण थंडीत बदल झालाय आणि होतोय हे म्हणण्याजोगी आताची परिस्थिती आहे. अशा अनुभवांना हवामानाच्या नोदींचा किंवा तत्सम अभ्यासाच्या निष्कर्षांचा आधार असावा लागतो. याबाबत हवामानाच्या नोंदी काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

भारतीय हवामान विभागाकडे भारतातील प्रमुख ठिकाणांच्या तब्बल दोनशे वर्षांच्या नोंदी उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील नोंदी असलेल्या ठिकाणांची संख्या मोठी आहे. या नोंदींचे विश्लेषण केले तर अनेक गोष्टींवर भाष्य करता येते. हवामान अभ्यासकांनी याबाबत विश्लेषण केले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) येथील अभ्यासकांनी केलेला अभ्यास असे सांगतो की अलीकडच्या काही दशकांमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळते. याचाच अर्थ असा की, किमान तापमान फारसे खाली जात नाही. या संस्थाशी संबंधित ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी यांचा अभ्यासही हेच सांगतो तसेच, थंडी सलग जास्त दिवस कायम राहत नाही. त्यात चढउतार येण्याचे प्रमाण वाढले आहे, याचीही भर पडल्याचे सांगतो.

या बदलांचा संबंध सध्या तरी थेट हवामान बदलाशी लावण्याची घाई करता कामा नये. त्यासाठी दीर्घकालीन नोंदी आणि नेमका कल स्थापित करणे आवश्यक ठरते. मात्र, थंडीबाबत परिस्थिती बदलली आहे, हे निश्चितपणे म्हणता येऊ शकते. हवामान बदलासंबंधी जगभरातील नोंदी व संशोधनावरून असे स्पष्ट झाले आहे की वातावरणातील कार्बन वायूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांचे प्रमाण ४०० पीपीएम अर्थात प्रति दशलक्ष एककांपैकी ४०० एककांपेक्षा जास्त झाले आहे.'इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज'(आयपीसीसी) या संघटनेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. हे कार्बन वायू हवेतील उष्णता धरून ठेवण्याचे काम करतात. त्यांचे प्रमाण वाढले की तापमानात वाढ होणार हे निश्चित. दिवसभर सूर्याच्या उष्णतेमुळे तापमानात वाढ होते, रात्रीच्या वेळी तापमान खाली जाते आणि किमान तापमान नोंदवले जाते. प्रत्यक्षात मात्र या वायूंच्या वाढलेल्या प्रमाणामुळे हे तापमान फारसे खाली जायला संधीच मिळत नाही. आपल्याकडे थंडी पडते ती मुख्यत: कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे. मात्र, थंडीचा कडाका न वाढण्यामागे कार्बन वायूंचा काही ना काही प्रभाव असतो, हे निश्चित! हवामान अभ्यासकांचे हे निष्कर्ष म्हणजे, सामान्य माणसाच्या निरीक्षणाला मिळालेली पुष्टीच मानायला हवी.

थंडीच्या वर्तणुकीत झालेले बदल ही केवळ कुतूहलाची बाब उरत नाही, तर त्याचे विविध क्षेत्रांवर फार मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या तसेच, शेतीतील विविध पिकांच्या उत्पादनातील चढउतार असे गंभीर परिणाम होतात. याचा अर्थ, हे बदल अप्रत्यक्षरीत्या भारताची अर्थव्यवस्थाच प्रभावित करतात. आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे तर थंडीचा काळ हा सर्वाधिक आरोग्यदायी समजला जातो. थंडीमध्ये चढउतार झाले तर मात्र संसर्ग आणि साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. तापमानातील तफावतीमुळे रोगप्रतिकार क्षमता कमी होते, परिणामी आरोग्याच्या समस्या वाढीला लागतात. आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगतात की अलीकडच्या काळात संसर्ग व साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्यास, पावसाळ्यातील पाऊसकाळ व कोरडा काळ यातील तापमानातील मोठी तफावत कारणीभूत आहेच. त्याचबरोबर पावसाळा संपल्यानंतर थंडी उशिरा सुरू होणे हेही कारण आहे.

भारतीय शेतीचा तर हवामानाच्या खेळाचा अतिशय जवळचा संबंध. आंब्याला मोहर कधी येणार, कसा येणार, किती झडणार यापासून ते इतर फळपिके तसेच, रब्बी ज्वारी, गहू यांच्या उत्पादनावर थेट परिणाम करते ती थंडीच. माजी कृषी आयुक्त डॉ. कृष्णा लव्हेकर यांचे निरीक्षणही थंडीमध्ये झालेल्या बदलांना पुष्टी देते. या बदलांचा सर्वाधिक परिणाम होतोय तो फळपिकांवर आणि त्यांच्या उत्पादनावर. सरासरी तापमानात १ अंशाने वाढ झाली तर ही परिणाम लक्षणीय असतो. फळबागांप्रमाणेच भाजीपाला तसेच, गहू, ज्वारीलाही त्याचा फटका बसलेला आहे. हे एकमेव कारण नाही, अलीकडच्या काळात पाण्याची टंचाई हे कारण आहेच, पण त्यात भर पडली आहे ती थंडीच्या चढउताराचीसुद्धा. गेल्या आठ-दहा वर्षांतील कल पाहता आपल्याकडील गव्हाचे उत्पादन घटते आहे. यामध्ये तपशीलवार लिहण्याजोगे बरेच आहे. मात्र, यावरून थंडीतील चढउतारामुळे शेतीमध्ये नेमके काय घडते आहे याचा अंदाज येतो.

आता मुद्दा राहतो, तो या बदलांना सामोरे जाण्याचा. विशेषत: शेतीच्या अंगाने या बदलांना आपण सामोरे जात आहोत का? हवामानातील बदलांना पुरून उरेल अशा प्रकारचे बदल करण्याबाबत शासनाकडून काही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, नानाजी देशमुख यांच्या नावाने अशी एक योजनाही सुरू केली आहे. हे स्वागतार्ह पाऊल असले तरी ते केवळ नावापुरते राहून उपयोगाचे नाही. हे विधान करण्यामागे कोणताही पूर्वग्रह नाही, तर अनुभव आहे. याचे उदाहरण म्हणजे आपल्या कृषी विद्यापीठांच्या शिक्षणात किंवा कृषिविषयक संशोधनात हवामान बदलांना मध्यवर्ती स्थानच नाही. या क्षेत्राचे भवितव्य ज्या हवामानावर सर्वाधिक अवलंबून असते, तेच क्षेत्र हवामानाला सामोरे जात नसेल तर दुसरे काय म्हणायचे? हे बदल छुप्या स्वरूपाचे असल्याने किंवा हळूहळू विळखा घालत असल्याने त्यांना अधिक गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा हे बदल भविष्यात आपल्याला कुठे नेतील, याबाबत सध्या तरी काही सांगता येणार नाही.

माणसाच्या आतापर्यंतच्या विकासाचा विचार केला तर त्याने सर्वाधिक झगडा दिला आहे तो हवामानाशीच. मग तो बर्फाळ प्रदेश असो, अति पावसाचा, वाळवंटी प्रदेश असेल. चक्रीवादळे, गारपीट यासारख्या आपत्ती असतील, नाहीतर ढगाळ हवामानामुळे शेतीवर वाढणारी कीड आणि पसरणारी रोगराई... ही हवामानाची आव्हाने पार करूनच माणसाने प्रगती साधली आहे, तो इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आताचे थंडीतील बदलाचे आव्हान फार मोठे आहे अशातला भाग नाही. त्यासाठी त्याला तसाच प्रतिसाद द्यावा लागेल हे मात्र निश्चित!

(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि 'भवताल'चे संपादक आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज