अ‍ॅपशहर

गुंडगिरीचे कृत्य

शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण सर्वथा निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा गुंडगिरीला कोणत्याही पातळीवरून समर्थन मिळता कामा नये. एखाद्याकडून रागाच्या भरात आततायीपणा घडतो, परंतु नंतर चुकीची जाणीव किंवा पश्चात्ताप होतो.

Maharashtra Times 25 Mar 2017, 12:00 am
शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण सर्वथा निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा गुंडगिरीला कोणत्याही पातळीवरून समर्थन मिळता कामा नये. एखाद्याकडून रागाच्या भरात आततायीपणा घडतो, परंतु नंतर चुकीची जाणीव किंवा पश्चात्ताप होतो. रवींद्र गायकवाड यांच्याबाबत तसेही काही घडलेले दिसत नाही. उलट, आपण केलेल्या मारहाणीचा त्यांना अभिमान वाटत असून त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर त्यासंदर्भात बढाया मारल्या आहेत. मारहाणीचे वृत्त समजल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना माहिती देताना त्यांनी, अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्याला आपण कशी पंचवीसवेळा सँडल्स मारले, हे साभिनय सांगितले. अरेरावी सहन करायला मी काही भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा खासदार आहे, हे सांगायलाही ते विसरलेले नाहीत. झाल्या प्रकारामुळे देशभर शिवसेनेची बदनामी झाली आहे, परंतु त्याबद्दल शिवसेना नेतृत्वाला खेद वाटतो, की खासदाराने विमानात शिवसेना स्टाईलचे दर्शन घडवल्याबद्दल अभिमान वाटतो, हे नेमके समजू शकलेले नाही. वादावादी झाली म्हणून हातघाईवर येणे कोणत्याही पातळीवर क्षम्य किंवा समर्थनीय ठरू शकत नाही. खासदारांसारख्या लोकप्रतिनिधीला तर ते अजिबात शोभत नाही. असे वर्तन केवळ व्यक्तीची नव्हे तर त्या पदाची अप्रतिष्ठा करण्यासारखे असते. रवींद्र गायकवाड यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही, ही यातली दुर्दैवाची गोष्ट आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena mp ravindra gaikwad banned from flying top indian
गुंडगिरीचे कृत्य


गायकवाड यांचे वर्तन एखाद्या गल्लीतल्या गुंडाला साजेसे असले तरी ते आधी प्राध्यापकाची नोकरी करीत होते. संबंधित कर्मचारी वाद घालू लागल्यावर त्यांनीही आपण शिक्षक असल्याचे त्याला सांगितले होते. म्हणजे विमानात हटून बसले असताना आणि संबंधित कर्मचाऱ्याशी संवाद साधताना आपण शिक्षक आहोत, याची त्यांना जाणीव होती. परंतु, काही क्षणातच त्यांचा हा शिक्षकाचा मुखवटा गळून पडला आणि त्यांच्यातला गुंड जागा झाला. या घटनेची राष्ट्रीय पातळीवर सर्व संबंधित ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली गेली असून तो सार्वत्रिक चर्चेचा विषय बनला आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेपासून वृत्तपत्रांतील व्यंगचित्रांच्या कोपऱ्यांपर्यंत सगळ्या ठिकाणी त्याचीच चर्चा सुरू आहे, यावरून घटनेचे गांभीर्य लक्षात यावयास हवे. परंतु, शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाने त्याची पुरेशा गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून येते. घटनेनंतर एअर इंडियाने पोलिसांत तक्रार दिली आहे आणि रवींद्र गायकवाड यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. खाजगी विमान सेवा, एअर इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन एअर लाईन्सने (एफआयए) गायकवाड यांना कोणत्याही विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे. तात्काळ प्रभावाने ही बंदी लागू करण्यात आली असल्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत त्यांना कोणत्याही विमानाने प्रवास करता येणार नाही. कारवाई योग्य असली तरी घडलेल्या घटनेसंदर्भात एअर इंडियाकडून मात्र कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. खासदार गायकवाड जी तक्रार करीत होते, त्या तक्रारीसंदर्भातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे एअर इंडियाने तातडीने स्पष्ट करायला हवे होते, परंतु तसे घडलेले नाही. एअर इंडियाकडूनही सेवेत काही गोंधळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही खासदार रवींद्र गायकवाड यांची कृती गुंडगिरीचीच आहे, हे स्पष्टपणे म्हणावी लागेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज