अ‍ॅपशहर

विक्रमी यशाचा आनंद

महाराष्ट्रभर आज दहावीच्या विक्रमी निकालांचीच चर्चा चालू आहे. यंदा तब्बल १९३ विद्यार्थ्यांना मिळालेले १०० टक्के गुण हे यंदाच्या निकालांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.

Maharashtra Times 15 Jun 2017, 4:28 am
महाराष्ट्रभर आज दहावीच्या विक्रमी निकालांचीच चर्चा चालू आहे. यंदा तब्बल १९३ विद्यार्थ्यांना मिळालेले १०० टक्के गुण हे यंदाच्या निकालांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. राज्यातील सर्व विभागांमधून दहावीची परीक्षा देणाऱ्या १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधील १४ लाख विद्यार्थी परीक्षेत उत्तीण झाले, ही आनंदाची बाब आहे. पण यंदा संपूर्ण राज्यात ४८ हजार विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांचा टप्पा पार केला आहे. एकट्या मुंबईत हा आकडा दहा हजारांच्या पुढे आहे. गेल्या वर्षी खेळांसोबतच, कला आणि चित्रकला या इतर विषयांचे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे यंदा तब्बल १९३ विद्यार्थी शंभर नंबरी ठरले आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेले हे गुण कौतुकास्पद जरी असले तरी शिक्षण मंडळाच्या मूल्यांकन पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ssc results in maharashtra
विक्रमी यशाचा आनंद


कलेतील गुणांचा लाभ तब्बल ८१ हजार विद्यार्थ्यांना झाला तर क्रीडागुणांचा फायदा झालेले विद्यार्थी तीन हजारांहून अधिक आहे. या अधिकच्या गुणांमुळे ज्या मुलांना हे अतिरिक्त गुण मिळाले नाहीत ते नाराज होणे स्वाभाविक आहे. दुसरे म्हणजे, गुणपत्रिकेवरचे १०० टक्के गुण हे या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अतीच वाढवणार नाहीत ना? तसेच, कला आणि क्रीडा हे महत्त्वाचे असले तरी या विषयांची गुणपद्धती निर्दोष आहे का? कलेतील गुण घेऊन विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांचा नेमका काय फायदा होईल? असे अनेक प्रश्न आहेत. दुसरीकडे निकालांचा आनंद साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या टेन्शनने घेरले आहे. आपल्याला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळण्याची खात्री आज ८८ टक्के मिळवणाऱ्यांनाही नाही. ही टक्क्यांची वाढती चुरस नेमकी कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? सोबतच सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे, मेरिट लिस्ट नवनवे विक्रम करणार, यात शंका नाही.

एकट्या मुंबईत तीन लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध जागा केवळ दोन लाख ९२ हजार आहेत. त्यातही सगळीकडे विद्यार्थ्यांचा ओढा हा लोकप्रिय कॉलेजांकडे असल्याने प्रवेशांचा गोंधळ यंदाही टळणारा नाही. यंदा ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेक बदल झाले आहेत. पण हे बदल टक्क्यांच्या या स्पर्धेला आणि विद्यार्थी-पालकांच्या अपेक्षांना उतरतात का, हे कळेलच. त्यातच, कलचाचणीचा प्रयोगही सरकारने केला आहे. तरीही कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांच्या पलीकडेही अनेक शाखांमध्ये उत्तम संधी आहेत, हे विद्यार्थ्यांना पटवून देणाऱ्या सक्षम यंत्रणेची गरज आहेच. केवळ लोकप्रिय शाखांच्या मागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर पर्यायांची अचूक माहिती दिल्यास प्रवेशासाठी लागणारी चुरस योग्य मार्गाला लावता येईल. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची घटती संख्या हादेखील एक चिंतेचा विषय या निकालांनी पुन्हा एकदा समोर आला. गेल्या पाच वर्षांत मराठी माध्यमाचे विद्यार्थी झपाट्याने कमी होत आहेत. या समस्येकडे केवळ सरकार नव्हे तर समाजानेही पाहण्याची गरज आहे. दहावीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणाऱ्या मुलांचे अभिनंदन आणि त्यांना पुढच्या अर्थपूर्ण करिअरसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज