अ‍ॅपशहर

Exit Poll: काँग्रेसची पेन्शन, भाजपला टेन्शन; हिमाचलमध्ये कमळ कोमेजण्याचा अंदाज; पाहा आकडे

himachal pradesh assembly election exit poll: हिमाचल प्रदेशात यंदाही सत्ताबदलाची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस सत्तेत परतताना दिसत आहे. तर भाजपचा निसटता पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताबदलाची परंपरा यंदाही कायम राहील असं दिसत आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 7:49 pm
शिमला: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. आकडेवारी पाहता भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत पाहायला मिळत आहे. या लढतीत काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत आहे. आज तक-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ४२ टक्के, काँग्रेसला ४४ टक्के आणि आपला २ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. २०१७ मध्ये भाजपला ४८.७९ टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला ४१.६ टक्के मतदान झालं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम himachal exit poll


हिमाचल प्रदेशची जनता भाजप आणि काँग्रेसला आलटून पालटून सत्ता देते. त्यामुळे दर पाच वर्षांनी हिमाचलमधील कारभारी बदलतात. हा ट्रेंड बदलण्यासाठी, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र तरीही एक्झिट पोलमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा पुढे जाताना दिसत आहे. आज तक-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशात भाजपला २४ ते ३४ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ३० ते ४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण ६८ जागा आहेत. बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता असते.
केजरीवालांचा भाजपाला दणका; दिल्ली पालिकेतील सत्ता होणार खालसा; एक्सिट पोलचे आकडे आले
हिमाचल प्रदेशात २००३ मध्ये काँग्रेस सरकार आलं. २००७ मध्ये भाजपनं सत्ता मिळवली. २०१२ मध्ये मतदारांनी काँग्रेसला कौल दिला. त्यावेळी भाजपला ३८.४७ टक्के मतदान झालं. तर काँग्रेसला ४२.८१ मतं मिळाली होती. हिमाचल प्रदेशात ४ ते ८ टक्के व्होट शेअरच्या अंतरानं सरकार सत्तेत येतं. यंदा भाजपला २९, तर काँग्रेसला ३५ जागा मिळू शकतात.

राज्यात भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान होतं. मात्र काँग्रेस नेतृत्त्वानं निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नाही. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं. प्रियांका गांधींनी केवळ चार सभा घेतल्या. मात्र तरीही राज्यात काँग्रेसला चांगलं यश मिळताना दिसत आहे. जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचं वचन काँग्रेसनं दिलं. त्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.
Gujarat Exit Poll: गुजरातमध्ये पुन्हा भाजप सत्तेत, १२७ चा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता, एक्झिट पोलचा अंदाज
हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी ७५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ डिसेंबरला जाहीर होतील. हिमाचल प्रदेशातील सत्ताबदलाची परंपरा आहे. काँग्रेसनं भाजपला पराभूत केल्यास ही परंपरा कायम राहील.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख