अ‍ॅपशहर

कलर्स मराठीवर नवीन मालिका 'बायको अशी हव्वी', पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार मालिका

कलर्स मराठीवर 'बायको अशी हव्वी' ही नवीन मालिका सुरू होत आहे. पुरुषसत्ताक पद्धती असलेल्या राजेशिर्के यांच्या घरात मोकळ्या वातावरणात वाढलेल्या आणि ते संस्कार झालेल्या जान्हवी सून म्हणून आल्यानंतर तिचा प्रवास कसा असेल, हे उलगडून दाखवणारी ही मालिका आहे. या मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक असल्याचे प्रोमोवरून वाटते आहे. ही मालिका सोमवार, १७ मे पासून प्रसारित होणार आहे.

Lipi 15 May 2021, 6:25 pm
मुंबई : लग्न होऊन मुलगी संसाराचे सुंदर स्वप्न घेऊन सासरी येते, साखर पाण्यात जशी सहज विरघळावी तशी संसारात मिसळून ती गोडवा आणते. ती हे सगळे निरपेक्षपणे पार पाडत असते. परंतु त्या बदल्यात तिच्या वाट्याला काय येते? सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्‍याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल. याच धाग्याला घेऊन कलर्स मराठी घेऊन येत आहे नवीकोरी मालिका ‘बायको अशी हव्वी.’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम colors marathi launches new marathi serial bayko ashi havvi
कलर्स मराठीवर नवीन मालिका 'बायको अशी हव्वी', पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार मालिका


‘बायको अशी हव्वी’ या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन-दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे. या मालिकेचे कथानक थोडक्यात असे आहे की भय्यासाहेब राजेशिर्के हे खूप मोठं प्रस्थ मानले जाते. त्यांचा मुलगा विभास ज्याच्या खांद्यावर घराची, व्यवसायाची जबाबदारी आहे. बाहेरून बघता राजेशिर्के एक आदर्श कुटुंब आहे. परंतु राजेशिर्के यांच्या घरामध्ये पुरुषसत्ताक संस्कृती आहे.

View this post on Instagram A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

घरामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून पुरुषांचीच सत्ता चालत आली आहे. बायकांनी घराचा उबंरठा ओलांडायचा नाही, चूल आणि मूलं हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे, अशा विचारसरणी या घरात आहे. घरातील स्त्रियांच्या म्हणण्याला काडीचे ही महत्त्व दिले जात नाही. घरातल्या बायकांची होणारी घुसमट कुणाला दिसत नाही आणि ऐकूही येत नाही. बायका देखील हे सारे निमूटपणे सहन करत आहेत.

अशा या घरामध्ये स्त्री- पुरुष असा भेदभाव न मानणा-या घरातील, आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडते? विभास आणि जान्हवीचे लग्न कोणत्या परिस्थितीत होते ? यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे ? संसाराबद्दल या दोघांचीही मते वेगळी आहेत. त्यांची मने जुळतील ? हा प्रवास पाहणे रंजक असणार आहे.

View this post on Instagram A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

या मालिकेचे लेखक, दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, 'शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो. तसेच आधुनिकतेचा, समंजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्‍य पुरुषांचा स्त्रि‍यांकडे बघण्‍याचा जुनाट दृष्टीकोन आजही तसाच असल्याचे जाणवते. लग्‍न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्‍हणजे स्‍वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी असेच असते. खरे तर या गोष्टी नवरा आणि बायको दोघांनी मिळून करायच्या असतात, याकडे सोयीने दुर्लक्ष केले जाते. अजूनही बाईची कर्तव्‍य आणि पुरुषाची कर्तव्‍य अशी लेबले लावूनच बायकांकडे पाहिले जाते. या मुखवट्याचे आणि मुखवट्या आड घुसमटणा-या स्त्रि‍यांची, आणि ते मुखवटे फाडून खऱ्या सहजीवनाचे चित्र उभे करणाऱ्या नायिकेची ही गोष्‍ट आहे'.

स्त्री शिवाय कुटुंब नाही, संसार नाही… पण, तरीही तिला तितकंसं महत्त्व कुटुंबात मिळत नाही आणि याचा अनुभव जान्हवीला राजेशिर्केंच्या घरी येणार आहे... जान्हवी तिच्या गोड स्वभावाने कसे त्यांचे मतपरिवर्तन करेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे... तेंव्हा नक्की बघा ‘बायको अशी हव्वी’ १७ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता आपल्या कलर्स मराठीवर.

महत्वाचे लेख