अ‍ॅपशहर

विक्रम गोखले नेमक्या कोणत्या आजाराने ग्रस्त होते? विविध अवयव झाले होते निकामी

Marathi Actor Vikram Gokhale Passed Away : गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तसंच गोखले यांच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केल्या जात होत्या.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 4:52 pm
पुणे : मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज निधन झालं. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र विविध अवयव निकामी झाल्याने त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद देणं थांबवलं. परिणामी त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज दुपारी गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vikram gokhale death reason disease
विक्रम गोखले यांचे निधन


विक्रम गोखले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच त्यांच्या पोटात पाणी साचलं (जलोदर) आणि नंतर यकृतही निकामी झाले. गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तसंच त्यांच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र दिवसागणिक एक-एक अवयव निकामी होत गेल्याने गोखले यांचं शरीर उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं.

विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार; कुठे आणि किती वाजता घेता येणार अंत्यदर्शन?

दरम्यान, विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी नुकतंच इ-टाइम्ससोबत बोलताना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. विक्रम गोखले यांना हृदय आणि किडनीचाही विकार झाला होता. अशातच त्यांच्या प्रकृतीविषयी दोन ते तीन दिवसांपासून विविध अफवाही पसरत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून दोन दिवसांनी त्यांना कदाचित व्हेंटिलेटरचीही आवश्यकता भासणार नाही, अशी आशा डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र काल सायंकाळपासून गोखले यांचा आजार आणखीनच बळावला आणि आज दुपारी त्यांनी प्राण सोडले.

नटाच्या कोणत्याही इमोशनला... नाना पाटेकरांसोबत विक्रम गोखलेंचा Video होतोय व्हायरल

दरम्यान, भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शनही केलं आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहिली जात असून सिनेश्रृष्टीवर शोककळा पसरली आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख