अ‍ॅपशहर

५ वर्षांच्या जिजाला तोंडपाठ आहे पसायदान, आदिनाथ कोठारेने सांगितलं या मागचं गुपीत

Adinath Kothare Pasaydan: प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेने त्याच्या चाहत्यांसाठी एक नवीन व्हिडिओ आणला आहे. अभंग रिपोस्टसोबत त्याने नव्या स्वरुपात पसायदान आणलं आहे. यात त्याची मुलगी जिजा कोठारेही आहे.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स 28 Nov 2022, 11:44 am
अवनी परांजपे, पोदार कॉलेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Adinath- Jijah


नवनवीन भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. त्याच्या अभिनय कौशल्यानं त्यानं एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनयासह मनोरंजनविश्वात तो इतरही प्रयोग करत असतो. नुकतंच त्यानं त्याच्या युट्यूब चॅनलवर अनोख्या पद्धतीनं 'पसायदान' सादर केलं आहे. या त्याच्या सांगीतिक प्रवासात जिजा ही त्याची मुलगीसुद्धा दिसणार आहे.

'अभंग रिपोस्ट' यांच्या सहाय्यानं पसायदान ही संत ज्ञानेश्वरांची काव्यरचना वेगळी चाल लावून त्यानं प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. याबद्दल आदिनाथनं सांगितलं, 'मी जिजाला ती अगदी बाळ असल्यापासून पसायदान गाऊन झोपवायचो. ती आता पाच वर्षांची आहे; पण तिला संपूर्ण पसायदान पाठ आहे. त्यामुळे पसायदान आमच्या दोघांसाठी खूप खास आणि जवळची गोष्ट आहे. म्हणून त्यावर आधारित काहीतरी करायचं हे मी आधीच ठरवलं होतं आणि त्यातूनच नव्या प्रयोगाविषयी सुचलं.'

View this post on Instagram A post shared by Abhanga Repost Official (@abhanga_repost)

आदिनाथ पुढे म्हणाला की, 'अनेक पालक त्यांच्या मुलांना, पुढच्या पिढीला चांगली शिकवण देताहेत. अशा पालकांना पसायदानाच्या व्हिडिओमधून आम्ही विनम्र अभिवादन करू इच्छितो.' यात अभंग रिपोस्ट या बँडनं पसायदान नवीन चालीत गायलं आहे. अभंग रिपोस्ट या बँडसह आदिनाथचा परिचय झाल्यावर त्यानं ही कल्पना त्यांना ऐकवल्यावर त्यांनादेखील ती खूप आवडली आणि ते हे करायला तयार झाल्याचं त्यानं सांगितलं.

विक्रम गोखलेंच्या आठवणीत शशांक केतकर भावुक, म्हणाला- कौतुक करणारे आणि...

'पसायदान ही प्रार्थना स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी स्वच्छंदी मनानं काहीतरी मागायला शिकवते. हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करतोय', अशा भावना आदिनाथनं व्यक्त केल्या. या व्हिडीओत आदिनाथ आणि जिजाबरोबर अभंग रिपोस्ट बँड एका समुद्रकिनारी दिसणार आहेत. या त्यांच्या सांगीतिक प्रयोगाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय, असंही आदिनाथनं सांगितलं.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख