अ‍ॅपशहर

मैत्री असावी तर अशी! उर्मिलाबद्दल काय म्हणतायत तिच्या सेलिब्रिटी बेस्ट फ्रेंड्स

मनोरंजनविश्वात काम करताना अनेक जण एकमेकांचे घट्ट मित्र होतात. पण या मैत्रीची काही ना काहीतरी गोष्ट असते. सुरुवात कशी झाली, ती कशी खुलली, मैत्रीचा प्रवास असं सगळं मागे वळून पाहताना डोळ्यांसमोर येतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2022, 1:24 pm
मुंबई: 'फ्रेंड्सशिप डे'च्या निमित्तानं अभिनेत्री उर्मिला कानेटकर- कोठारे हिच्या खास मैत्रिणींनी तिच्याविषय खास भावना शेअर केल्यात. फुलवा खामकर, क्रांती रेडकर या उर्मिलाच्या बेस्टफ्रेंड्स आहेत. अनेकदा तिनं त्यांच्या मैत्रिबद्दलही खास गोष्टी शेअर केल्यात. पण उर्मिलाच्या या खास मैत्रिणी तिच्याविषयी काय म्हणतात ते पाहुया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम urmila kothare and her friends


काय म्हणतेय फुलवा...?
माझ्यात आणि उर्मिलामध्ये वयाचं बरंच अंतर आहे. आमची ओळख आधी होती; पण मैत्रीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 'एकापेक्षा एक' या कार्यक्रमाच्या मंचावर. तिथे मी तिची कोरिओग्राफर होते. तेव्हापासून एकमेकींकडे येणं-जाणं वाढलं. त्यानंतर आम्ही एका चित्रपटासाठी एकत्र कामही केलं. तेव्हा मैत्री अधिकच घट्ट झाली. आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत. म्हणूनच आमचं छान जुळत गेलं. तिच्या लग्नातला संगीत सोहळा मी बसवला होता. माझी मुलगी आणि उर्मिला यांच्यातही छान मैत्री आहे. आता आमचं नातं मैत्रीपुरतं मर्यादित न राहता ते बहिणींसारखं झालं आहे, असं फुलवा म्हणतेय.
मोठा आळस अन् गोरा पिंक… ओळखता का या नावाच्या मराठी सेलेब्सना? स्पेशल आहे मैत्रीचं नातं
उर्मिलासाठी क्रांतीचं खास पत्र
प्रिय उर्मिला,
जवळपास १२-१३ वर्षं आपण एकमेकींना ओळखतो. तू अतिशय संवेदनशील मुलगी आहेस. तू काही जणांना शिष्ट वाटतेस. पण, मला माहीत आहे, की तुझ्या वर्तुळातल्या माणसांची तू किती काळजी घेतेस ते. मी फक्त एखादी इच्छा बोलून दाखवायचा अवकाश, की तू काहीही करून माझी इच्छा पूर्ण करतेस. आपण एकमेकींना निर्णय घेण्यात कायमच मदत करतो. त्यामुळे तू माझा खूप मोठा आधार आहेस. माझ्या एक वर्ष आधी तू आई झालीस. तुझ्या आई होण्याच्या अनुभवाचा मला चांगलाच फायदा झाला. मी आई झाले, तेव्हा आईला लागणारी प्रत्येक गोष्ट तू मला बारीकसारीक विचार करुन दिलीस. तेव्हा मी खरंच नि:शब्द झाले होते. तुझ्यातली हुशार कलाकार मला खूप आवडते. दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय हे ओळखून तुझ्या अभिनयातून तू ते देतेस. मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा यात तुला कोणती भूमिका देता येईल, याचा विचार करते. तुल‍ा मी ती स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी आतुर असते. कारण तू समोरच्याचं खूप छान ऐकून घेतेस. तडकाफडकी काही न बोलता शांतपणे तुझं मत मांडतेस. त्यामुळे तू एक आदर्श मैत्रीण आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

महत्वाचे लेख