अ‍ॅपशहर

पडदा पडला! विक्रम गोखले यांचं निधन, २० दिवसांची झुंज अखेर संपली

Vikram Gokhale- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 3:43 pm
पुणे- मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vikram Gokhale


आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला 'गोदावरी' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

दरम्यान, अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली . विक्रम यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. 'बॅरिस्टर' नाटकाने विक्रम यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. जवळपास ८ वर्ष त्यांनी हे नाटक केलं. परखड व्यक्तिमत्त्वासाठी गोखले विशेष ओळखले जायचे.

नाकारले पुरस्कार

विक्रम गोखले यांचा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी शासकीय पुरस्कारांनाही नकार दिला. एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं होतं की, 'पुरस्कार सोहळे हे फक्त फॅशन झाली असून पैसे खिशात घेऊन पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत. अशा मांदियाळीत मला बसण्यात स्वारस्य नाही. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही. त्याचं कामच बोलतं.'
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज