अ‍ॅपशहर

रंगकर्मी आंदोलन- विजय पाटकर, मेघा घाडगेसहीत अनेक कलाकारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारला तडकाफडकी लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला होता. यात सगळ्यात मोठा फटका बसला तो मनोरंजन विश्वाला. सरकारला कलावंतांचा आक्रोश आणि त्यांची अवस्था कळावी यासाठी रंगकर्मी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2021, 4:48 pm
मुंबई- करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिड वर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रंगकर्मी आंदोलन

अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादर येथील स्व. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी हे आंदोलन केले गेले.


अनेक रंगकर्मीनी आपल्या कलांचे सादरीकरण यावेळी केले. ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या यावेळी मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शीतल माने या रंगकर्मीना यावेळी भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत भोईवाडा पोलीस स्टेशन बाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला आहे.

सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इतर लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील १ हजाराहून अधिक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज