अ‍ॅपशहर

ऐन सुट्टीत बुकींग घसरलंय

सुट्टीच्या काळात नाटकं गर्दी खेचण्याची आशा असतानाच प्रेक्षक मात्र नाटकांपासून ‘सुरक्षित अंतर’ ठेवून आहेत. काही ठराविक नाटकांचा अपवाद वगळता, प्रेक्षक इतर आकर्षणांमध्येच ‘मग्न’ असल्याचं चित्र दिसून येतंय…

हर्षल मळेकर | Maharashtra Times 11 May 2017, 2:30 am
सुट्टीच्या काळात नाटकं गर्दी खेचण्याची आशा असतानाच प्रेक्षक मात्र नाटकांपासून ‘सुरक्षित अंतर’ ठेवून आहेत. काही ठराविक नाटकांचा अपवाद वगळता, प्रेक्षक इतर आकर्षणांमध्येच ‘मग्न’ असल्याचं चित्र दिसून येतंय…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम low booking for marathi natak
ऐन सुट्टीत बुकींग घसरलंय


सुट्टीच्या काळात नाटकांना चांगल्यापैकी बुकींग मिळतं हा समज यंदापुरता तरी खोटा पडला आहे. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या सुमारे पंचवीसएक नाटकांपैकी अवघी पाच-सात नाटकं सोडली, तर इतरांना मात्र खूप कमी बुकींग मिळताना दिसतंय. वाढलेला उकाडा, ‘बाहुबली’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा, बाहेरगावी जाणारे प्रेक्षक या कारणांमुळे नाटकांचा बुकींग प्लॅन मोकळा राहत असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘कोडमंत्र’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘के दिल अभी…’, ‘गोष्ट तशी…’ यासारखी काही ठराविक नाटकं सोडली तर इतरांना मात्र बुकींग मिळत नाहीय. विशेष म्हणजे सुट्टीचा काळ लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात ‘सुरक्षित अंतर ठेवा’, ‘क्वीनमेकर’, ‘षडयंत्र’, ‘स्वप्नपंख’ ही नवीकोरी नाटकं रंगभूमीवर दाखल झाली. यापैकी बहुतांश नाटकं दर्जेदार असूनही, प्रेक्षक त्यांच्यापासून ‘सुरक्षित अंतर’ राखून का आहेत असा प्रश्न नाट्यनिर्मात्यांना पडला आहे.

सुट्ट्यांमधल्या वीकेंड्सना लोक बाहेर फिरायला जातात. नाटक काय, नंतर पाहता येईल असा विचार लोक करताना दिसतात. एखादं सुपरहिट नाटक असेल तर ठिक, अन्यथा शनिवार-रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशीही नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल त्याबाबत निर्माते साशंक आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार या दिवसांत तर प्रयोग लावण्याचं धाडस कुणी करत नाही. ‘बाहुबली’सारख्या सुपरडुपरहिट सिनेमाचा थोड्या प्रमाणात फटका बसल्याचं काही निर्माते मान्य करत आहेत.
एकीकडे नवी नाटकं जोर धरत नसताना, काही जुनी नाटकं मात्र आजही चांगलं बुकींग घेताना दिसतात. यामागचं कारण सांगताना व्यवस्थापक गोट्या सावंत म्हणाले, की ‘रंगभूमीवर ही परिस्थिती नेहमीच बघायला मिळते. जी चांगली नाटकं आहेत, अशी मोजकी नाटकं कायम गर्दी खेचतात. पण ज्या नाटकांमध्ये दम नाही, ती नाटकं प्रेक्षक स्वीकारणार नाहीत’, असं ते म्हणतात.

उकाड्याचा फटका
‘काही ठराविक नाटकं वगळली, तर इतर नाटकांना मात्र बुकिंग कमी आहे. यंदा कडक उन्हाळ्याचा परिणामही जाणवतोय’, असं नाट्यनिर्माते दिनू पेडणेकर यांनी सांगितलं. वाढत्या उकाड्यामुळे मुंबई-पुण्याबाहेरही नाटकांचे प्रयोग होत नाहीत. या काळात मुंबईबाहेरच्या काही संस्था नाटकांचे प्रयोग घेतात. पण त्यांच्याकडूनही यंदा मागणी खूप कमी असल्याचं निर्माते श्रीकांत तटकरे यांनी सांगितलं.

बुकींग नसण्याची कारणं
कडक उन्हाळा
बाहेरगावी जाणारे लोक
बाहुबलीसारखा ब्लॉकबस्टर सिनेमा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज