अ‍ॅपशहर

तिहेरी ‘इनिंग’ जोरात

कल्पेशराज कुबलमराठी, गुजराती, हिंदी अशा एकूण तीन भाषांमध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं सध्या जोरात सुरू आहेत...

Maharashtra Times 29 Jun 2018, 9:12 am
कल्पेशराज कुबल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hum-do-hamare-woh


मराठी, गुजराती, हिंदी अशा एकूण तीन भाषांमध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं सध्या जोरात सुरू आहेत. प्रसाद खांडेकर असं या गुणी दिग्दर्शकाचं नाव. तो दिग्दर्शित करत असलेलं आणखी एक हिंदी नाटक जुलैमध्ये रंगभूमीवर येत असून त्याचं नाव आहे 'ब्लाइंड डेट'. प्रसादला अनेक कॉमेडी शोजमध्ये काम करतानाही प्रेक्षकांनी पाहिलं आहे. दिग्दर्शनाबरोबरच त्याची अभिनयाची इनिंगही जोरात सुरू आहे.

अभिनेता पॅडी कांबळे, सुशील इनामदार यांच्याबरोबर प्रसाद सध्या 'दिल तो बच्चा है जी' हे मराठी नाटक करतोय. नाटकाचं दिग्दर्शन त्याचंच आहे, शिवाय यात तो कामही करतोय. ७५हून अधिक प्रयोगांचा पल्ला गाठलेलं हे नाटक रसिकांना खदखदून हसवतंय. 'क्राईम पेट्रोल'फेम अनुप सोनी, स्मिता बन्सल यांच्यासोबत तो हिंदीत हम 'दो हमारे वो' हे नाटक करतोय. संजय झा यांनी या नाटकाचं लेखन केलंय. प्रसाद स्वतः त्यात काम देखील करतोय. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला.

हिंदी आणि मराठी नाटकांबरोबरच प्रणव त्रिपाठीलिखित 'वाईफ इज ऑलवेज राईट' या प्रसादनं दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचे प्रयोगही सुरू आहे. यापूर्वी देखील प्रसादनं हिंदीत दिग्दर्शत केलेलं 'रिश्तों का लाईव्ह टेलिकास्ट' हे नाटक कमालीचं गाजलं होतं. यात दिवंगत अभिनेत्री रिमा, अंजन श्रीवास्तव, प्रार्थना बेहरे, पियुष रानडे यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या भूमिका होत्या. 'पडद्याआड', 'कानांची घडी तोंडावर बोट', 'मेरा पिया घर आया', 'शोधा अकबर', 'श्री शिवसमर्थ', 'पापा जाग जायेगा' ही प्रसादची मराठी नाटकंही यापूर्वी हिट ठरली आहेत.

नवं हिंदी नाटक

'ब्लाइंड डेट' हे त्याचं आगामी हिंदी नाटक येत्या जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटकाचा विषय गुलदस्त्यात ठेवण्यात आला असून, प्रसिद्ध लेखक रमण कुमार यांनी त्याचं लेखन केलं आहे.

भाषेचं बंधन वाटत नाही

विविध भाषांमध्ये नाटक दिग्दर्शित करत असताना भाषेचं बंधन कधी वाटलं नाही. अभिनय सगळीकडे सारखाच असतो. मला केवळ नटांना नाटकांनुरूप त्या भावविश्वात जाण्याचा मार्ग दाखवायचा असतो. तिन्ही रंगभूमीवरील प्रेक्षक काही प्रमाणात वेगवेगळा आहे. हिंदी, मराठी, गुजराती अशा तिन्ही भाषांमध्ये एकाच वेळी काम करताना मजा येते.

- प्रसाद खांडेकर, दिग्दर्शक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज