अ‍ॅपशहर

'पाझर' ठरली सवाई

वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धा गाजवलेल्या एकांकिका, मुंबईतला नाट्यवेडा प्रेक्षक आणि २५ जानेवारीची रात्र... हे समीकरण आहे चतुरंग आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेचं. यंदाचं सवाईचं तिसावं वर्ष होतं. त्रिदशकपूर्तीच्या निमित्तानं दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

Maharashtra Times 28 Jan 2017, 12:32 am
वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धा गाजवलेल्या एकांकिका, मुंबईतला नाट्यवेडा प्रेक्षक आणि २५ जानेवारीची रात्र... हे समीकरण आहे चतुरंग आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेचं. यंदाचं सवाईचं तिसावं वर्ष होतं. त्रिदशकपूर्तीच्या निमित्तानं दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर नाटककार शेखर ताम्हाणे, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी आणि अभिनेता सुशील इनामदार यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. उत्तरोत्तर रंगात जाणाऱ्या या स्पर्धेचं निकाल नेमका काय लागणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर बाजी मारली ती नाट्यवाडा, औरंगाबादच्या 'पाझर' या एकांकिकेने. द्वितीय क्रमांक आणि प्रेक्षक पसंती पटकावली ती अनुभूती, बदलापूरच्या 'इन सर्च ऑफ' या एकांकिकेने. रात्रभर जागून एकांकिका बघितल्या असल्या तरी पहाटे त्याच उत्साहात विजेत्यांनी जल्लोष साजरा केला. सात एकांकिका, त्याचे वेगवेगळे विषय, सादरीकरणातलं वैविध्य, तांत्रिक गोष्टींचा केलेला मोजकाच उपयोग ही यावर्षीच्या सवाईची वैशिष्ट्यं म्हणता येतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sawai one act play competetion
'पाझर' ठरली सवाई


शो मस्ट गो ऑन
ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजची 'असणं नसणं' ही एकांकिका सुरु असताना, ब्लॅक आऊटमध्ये दिवा ठेवताना त्यावरची काच पडली आणि फुटली. स्टेजवर एका भागात सगळ्या काचा पडल्या होत्या. योग्य समयसुचकता ठेवून एकांकिकेत मुख्य भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याने झाडू घेऊन दृश्यामध्येच त्या काचा झाडल्या. त्याच्या या तत्परतेला सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

लेखनाची कार्यशाळा
हल्ली लेखकांची संख्या आणि लिखाणाचा दर्जा लक्षात घेता, सवाईतर्फे येत्या वर्षात नाट्य आणि मालिका लेखनाची कार्यशाळा घेतली जाणार आहे. चार ते पाच दिवसांची निवासी कार्यशाळा दोन-दोन महिन्यांच्या अंतराने वर्षातून साधारण पाच ते सहा वेळा घेतली जाईल. शिवाय एक किंवा दोन वर्षाचा कोर्स डिझाइन करण्याचा विचारही सुरु असल्याचं सवाईचे आयोजक निमकर यांनी सांगितलं. निर्माते शशांक सोळंकी आणि या क्षेत्रातले काही दिग्गज मिळून हा अभ्यासक्रम डिझाइन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मिळाली संधी
आयएनटी या वर्षातल्या पहिल्या एकांकिका स्पर्धेपासून गाजणारी एकांकिका म्हणजे सिडनहॅम कॉलेजची 'श्यामची आई'. या एकांकिकेला वर्षभरात खूप बक्षिसं आणि लोकप्रियता मिळाली. ही एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा निर्णय 'सुयोग' या नाट्यसंस्थेने घेतला आहे. लवकरच एकांकिकेचं रूपांतर व्यावसायिक नाटकात होणार असल्याचं सुयोगचा निर्माता संदेश भट याने सांगितलं. अभिनेता आदिनाथ कोठारे याने या एकांकिकेचा लेखक स्वप्निल जाधव याच्याबरोबर भविष्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

खूप आनंदी!

'सवाईला आपली एकांकिका सादर व्हावी यासाठी आम्ही गेलं वर्षभर मेहनत घेतं होतो. सवाईच्या रंगमंचावर सादरीकरण करायला मिळणं हेच आमच्यासाठी भाग्याचं होतं. यंदाचं माझं स्पर्धेसाठी पहिलंच लेखन-दिग्दर्शन होतं आणि त्या एकांकिकेला सवाईचा मान मिळाल्याने अधिक आनंदी आहे'.

- प्रवीण पाटेकर, लेखक, दिग्दर्शक-'पाझर'

आव्हानात्मक भूमिका

'सिनेमातील 'ट्रिक सीन' शोधकर्ता जॉर्ज मेलीएस विषयी मला कुतूहल होतं. इतिहासातील या व्यक्तिमत्वाला साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. सवाई अभिनेत्याचा मान मिळाल्यावर जबाबदारी अधिक वाढली. केलेल्या मेहनतीच चीज झाल्यासारखं वाटतयं'.

- गौरव बर्वे, सवाई अभिनेता

इच्छा पूर्ण झाली!

यंदा पहिल्यांदाच सिडनेहॅम कॉलेजची एकांकिका सवाईच्या अंतिम फेरीत होती. सवाईच्या रंगमंचावर सादरीकरण करावं असं स्वप्न होतं. यंदाचं माझं कॉलेजचं शेवटच वर्ष आहे, त्यात सवाई अभिनेत्रीचं बक्षीस हातात आल्यामुळे पुढे अजून छान काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.'

मृणाली तांबडकर,सवाई अभिनेत्री

कामाला मिळाली दाद

मी आणि माझा मित्र गौरव यांनी ही एकांकिका लिहीली. एकांकिका लिहिताना तिचा अवकाश मला दिसत होता आणि म्हणूनच मी दिग्दर्शन केलं. माझ्या या कामाला सवाईच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा मान मिळाल्याने खूप आनंद होतोय'.

- यश रूईकर, सवाई दिग्दर्शक

मेहनत करण्याची जिद्द

'गेल्या वर्षी देखील माझ्या 'दृष्टी' या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळालं होतं. यंदाही 'इन सर्च ऑफ' प्रेक्षकपसंतीसह द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. पुढच्या वर्षी अधिक मेहनत करण्याची जिद्द सवाईने दिली आहे'.

- संजय जमखंडी, सवाई लेखक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज