अ‍ॅपशहर

पुन्हा 'टूर' निघणार!

मराठी मनोरंजन सृष्टीला एकापेक्षा एक गुणी कलाकार देण्यात 'टूर टूर' नाटकाचं मोठं योगदान आहे. पुरषोत्तम बेर्डे यांचं लेखन दिग्दर्शन असलेल्या या नाट्यकृतीनं रंगभूमीवर नव्या चेहऱ्यांना त्यावेळी संधी दिली होती.

Maharashtra Times 3 May 2018, 10:19 am
कल्पेशराज कुबल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tur-tur


मराठी मनोरंजन सृष्टीला एकापेक्षा एक गुणी कलाकार देण्यात 'टूर टूर' नाटकाचं मोठं योगदान आहे. पुरषोत्तम बेर्डे यांचं लेखन दिग्दर्शन असलेल्या या नाट्यकृतीनं रंगभूमीवर नव्या चेहऱ्यांना त्यावेळी संधी दिली होती. चित्रा पालेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रदीप पटवर्धन यांसारखे अनेक चेहरे 'टूरटूर'च्या निमितानं चमकले. असंच काहीसं आता पुन्हा होणार आहे. नव्या दमाच्या तरुण कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी देत ही 'टूर टूर'ची स्वारी पुन्हा निघणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 'अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स'च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून 'टूर टूर' या नाटकाची पुन:र्निर्मिती केली होती. साहजिकच पुरुषोत्तम बेर्डे यांनीच नाटकाचं दिग्दर्शन केलेलं. 'टूरटूर'चे मुंबई विद्यापीठ कॅम्पसमध्ये हाऊसफुल्ल प्रयोग गेल्या वर्षी रंगलं. अनेक कलाकार मंडळी देखील या प्रयोगांना उपस्थित होते. नाटक इतकं चपखल बसलं होतं की, प्रेक्षकांनी नाटकातील विद्यार्थी कलाकारांचं भरभरुन कौतुक करत हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर यावं, अशी इच्छा व्यक्त केली. आता 'जिगीषा', 'प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन' आणि 'अष्टविनायक' या नाट्यनिर्मिती संस्था 'टूरटूर' हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणत आहेत. येत्या १८ मे रोजी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आहे. नव्यानं 'टूरटूर' सादर करताना नाटकात काही काळानुरूप बदल करण्यात आले आहेत. तसंच काही पात्र देखील नव्यानं सामाविष्ट करण्यात आल्याचं पुरुषोत्तम बेर्डे सांगतात. नाटकात चित्रा पालेकर यांची भूमिका प्रज्ञा चवंडे, विजय कदम यांची भूमिका प्रथमेश चेहुलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भूमिका प्रथमेश जाधव साकारणार आहेत.

भारत एकवटला!

सहितेनुसार नाटकातील पात्र ही विविध प्रातांतील आहेत. त्यांच्या तोंडी भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा आहेत. विशेष म्हणजे प्रत्यक्षातसुद्धा नाटकातील कलाकार मंडळी ही भारतातील कानाकोपऱ्यातून 'टूरटूर'च्या निमित्तानं एकवटली आहेत. यात अलक्ष्येंद्र प्रभाकर (नवी दिल्ली), उपलक्ष कोतवाल (जम्मु काश्मीर), वासुदेव मदने (जळगाव), प्रथमेश जाधव (नाशिक), प्रथमेश चेहुलकर (मुंबई), अखिल तिवारी (लखनऊ), प्रज्ञा चवंडे (रत्नागिरी), सुमित सासणे (कोल्हापूर), शुभम जीते (पुणे), सतीष कुमार (बिहार), भाऊ सोनावणे (औरंगाबाद), प्रविण पांडे (मध्यप्रदेश), अकिल तिवारी (लखनऊ), समीर ताभणे (नागपूर), प्रवीण मडके (बीड), विनोद मौर्य (चंदीगड), देवेन पटेल (मध्यप्रदेश), प्राजक्ता दशपुत्रे (जळगाव), तीर्था टिकम (मुंबई), रुपश्री कुळकर्णी (नाशिक), अरुणिमा नाथ (आसाम), आरती यादव (मध्यप्रदेश), स्वप्रिया शर्मा (दिल्ली) आदींचा समावेश आहे. त्यामुळे आता मराठी व्यावसायिक रंगभूमीवर संपूर्ण भारत अवतरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज