अ‍ॅपशहर

निर्माता आदित्य चोप्रा यांना दणका

यशराज फिल्म्स्च्या ‘फॅन’ या चित्रपटात ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखविले नसल्याने राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्माते आदित्य चोप्रा यांना दणका दिला आहे. अर्जदाराला मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रु. व याचिका खर्चापोटी पाच हजार रु. देण्याचे आदेश आयोगाने निर्माता, यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा यांना दिले.

Maharashtra Times 15 Oct 2017, 2:32 am
‘फॅन’च्या प्रोमोमधील गाणे चित्रपटात न दाखवल्याने ग्राहक आयोगाकडून भरपाईचे आदेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम film producer aditya chopra punished for chopping song
निर्माता आदित्य चोप्रा यांना दणका


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

यशराज फिल्म्स्च्या ‘फॅन’ या चित्रपटात ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखविले नसल्याने राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्माते आदित्य चोप्रा यांना दणका दिला आहे. अर्जदाराला मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रु. व याचिका खर्चापोटी पाच हजार रु. देण्याचे आदेश आयोगाने निर्माता, यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा यांना दिले.

शिक्षिका असलेल्या अफरीन फातिमा झैदी यांनी हे अपिल केले होते. सेन्सॉर बोर्ड, दिग्दर्शक मनीष शर्मा, अभिनेता शाहरूख खान आणि पीव्हीआर सिनेमा चित्रपटगृह यांच्याविरुद्धचे अपिल पीठासीन अधिकारी एस. एम. शेंबोळे, सदस्य के. बी. गवळी व इतर सदस्यांनी याआधी फेटाळले होते. आदित्य चोप्रा यांच्याविरुद्धचे अपिल स्वीकारले होते. मात्र प्रेक्षक आणि प्रतिवादी यांच्यात ग्राहक आणि सेवा देणारे असे नाते स्थापित होत नसल्याचे सांगत औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने झैदी यांचा अर्ज फेटाळला होता. त्याला झैदी यांनी राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

अफरीन यांनी ‘फॅन’ चित्रपटाचा पहिल्याच दिवशी पहिला शो पाहिला. चित्रपटाच्या प्रोमो व ट्रेलरमध्ये ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखविले जात होते, मात्र चित्रपटगृहात ते दाखवले नाही. ‘जबरा फॅन’ या गाण्यासाठीच त्या आपली दोन मुले, सासू-सासरे, बहीण-भाऊ यांना सोबत घेऊन १५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात गेल्या होत्या. दीडशे रु.च्या सात तिकिटांसाठी एक हजार ५० रुपये, पाचशे रुपये रिक्षाभाडे, मध्यंतरात मुलांना नाष्टा, शीतपेयांवर एक हजार खर्च केले. पण, चित्रपटात गाणे नसल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी तक्रारदारास हिणविल्याने त्या मानसिकदृष्ट्या खचल्या. मुले नाराज होऊन जेवली नसल्याने त्यांची अॅसिडिटी वाढली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागून उपचारावर एक हजार रु. खर्च करावा लागला. गाणे न दाखवून प्रतिवादींनी फसवणूक केली आहे, त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून ६० हजार ५५० रु. प्रतिवादींनी द्यावेत, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली होती. ही विनंती मंचाने अंशतः मंजूर केली. तक्रारकर्त्याची बाजू झिशन झैदी यांनी मांडली. त्यांना एस. एन. देशमुख, सय्यद मोईन, जी. डी. पवार यांनी साह्य केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज