जळगाव टाइम्स टीम matajalgaon@gmail.com वैभव मांगले जितका उत्तम अभिनेता तर आहेच, शिवाय त्याला संगीताचीही उत्तम जाण आहे. त्याबरोबरच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू नुकताच समोर आलाय. वैभव एक उत्तम चित्रकारही आहे. त्यानं काढलेली ही चित्रं नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळाली. याबद्दल वैभव म्हणाला, की 'शाळेत असताना चित्रकला हा विषय होता. पण, त्यानंतर चित्रकलेशी विशेष संपर्क आला नाही. गेल्या एक-दोन महिन्यांपासून मला असं वाटलं की आपण चित्रं काढायला हवीत. सुरुवातीला साधी चित्रं काढायला लागलो. मग हळूहळू युट्यूबवर किंवा कुठेतरी पाहत चित्रं काढायला लागलो. त्यानंतर चित्रकलेत माझं मन रमलं. मधल्या काही दिवसांमध्ये माझ्या हातात थोडा वेळ होता. आता माझी दिवसातून दोन चित्रं काढून होतात. मोबाइल फोनपासून लांब राहतो. पण, चित्रकलेत, रंगांमध्ये मी रमतो. रंगांमध्ये राहणं खूप छान आणि विलोभनीय आहे. रंगांच्या छटा जेव्हा कागदांवर उमटतात तेव्हा खूप सुंदर वाटतं. चित्र पूर्ण होईपर्यंत माझ्या मनाची तगमग सुरूच असते. चित्रकलेकडे इतर देशात जितकं गांभीर्यानं पाहिलं जातं तेवढं
आपल्या देशामध्ये पाहिलं जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.'