अ‍ॅपशहर

अशी झाली लव्हस्टोरी

प्रेम करणं म्हणजेच जोडीदाराला आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन देण्यासारखं आहे. प्रेमविवाह केलेल्या काही कलाकार मंडळींनी त्यांचे प्रपोज करण्याचे किस्से मुंटासोबत शेअर केले.

Maharashtra Times 14 Feb 2018, 8:56 am
प्रेम करणं म्हणजेच जोडीदाराला आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन देण्यासारखं आहे. प्रेमविवाह केलेल्या काही कलाकार मंडळींनी त्यांचे प्रपोज करण्याचे किस्से मुंटासोबत शेअर केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhijeet-khadkekar


आयुष्यभरासाठी देतो वचन

माझी आई आणि अभिजित मिळून माझ्यासाठी स्थळ बघत होते. पहिलंच स्थळ बघायला येणार होतं. त्याच्या आदल्या रात्री अभि थोडा अस्वस्थ होता. त्याने रात्री उशीरा फोन करुन सांगितलं की, 'मी तुला आयुष्यभरासाठी वचन देतो. तू फक्त माझ्याशी लग्न कर'. मला थोडा वेळ काय झालं ते कळेनाच. खरं तर तोच माझ्या प्रेमात होता. पुढे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सुखदा खांडकेकर, अभिनेत्री

शब्दांविना कळले सारे

मी आणि उर्मिला त्यावेळी 'शुभमंगल सावधान' हा चित्रपट करत होतो. शूटिंग व्यवस्थित पूर्ण झालं आणि शेवटचा दिवस उजाडला. त्यादिवशी मी उर्मिलाला बाहेर घेऊन गेलो. लग्नाबाबत काहीच बोलणं झालं नाही. त्यानंतर आम्ही अनेकदा भेटत गेलो. त्या भेटींमधून एकमेकांना समजून घेत गेलो आणि असाच एका दिवशी लग्नाचा निर्णय घेतला.

आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक-अभिनेता

थेट लग्नाचीच बात

आम्ही मित्र-मैत्रीणी म्हणून व्हॉट्सअॅपवर खूप बोलायचो. त्यावेळी तो पंधरा दिवसांसाठी शूटला गेला. तेव्हा आम्ही दोघांनीही एकमेकांना खूप मिस केलं. दरम्यान व्हॅलेंटाइन आला आणि आम्ही एका पार्टीही होती. त्यावेळेस 'तू मला विचारलंस तरच मी पार्टीला येणार', असं मी त्याला सांगितलं. तेव्हा त्याने थेट मला लग्नासाठीच विचारलं आणि मी हो म्हटलं.

मयूरी वाघ, अभिनेत्री

फिल्मसिटीत प्रपोज

एके दिवशी अचानक शंतनू मला म्हणाला, 'प्रिया, चल आपल्याला फिल्मसिटीमध्ये जायचं आहे'. शंतनूच्या मनात फिल्ससिटीचं स्थान खूप वेगळं आहे. त्याचं हे प्रेम मला माहीत असल्यामुळे मी त्याच्यासोबत गेले. तिथं एका ठिकाणी त्यानं गाडी थांबवली. काय घडतंय ते मला थोडा वेळ कळेनाच. थोड्या वेळानं त्यानं गाडीतून केक काढला, माझ्या बोटात अंगठी घातली आणि लग्नासाठी विचारलं. तो क्षण मी कधीच विसरु शकत नाही.

प्रिया मराठे, अभिनेत्री

संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज