अ‍ॅपशहर

नावं ठेवण्याची घाई

मराठीतल्या ग्लॅमरला भुलून अनेक निर्माते सिनेमासाठी पैसा ओतू लागलेत. गेल्या सहा महिन्यांत चित्रपट महामंडळाच्या मुंबई शाखेकडे तब्बल १८० सिनेमांच्या शीर्षकांची नोंदणी झाली असून, त्यापैकी कित्येक चित्रविचित्र नावं वाचून भुवया उंचावतात.

Maharashtra Times 29 Jun 2016, 12:40 am
Soumitra.pote@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi cinema names
नावं ठेवण्याची घाई


मराठीतल्या ग्लॅमरला भुलून अनेक निर्माते सिनेमासाठी पैसा ओतू लागलेत. गेल्या सहा महिन्यांत चित्रपट महामंडळाच्या मुंबई शाखेकडे तब्बल १८० सिनेमांच्या शीर्षकांची नोंदणी झाली असून, त्यापैकी कित्येक चित्रविचित्र नावं वाचून भुवया उंचावतात.

गेल्या सहा महिन्यांत मराठीत प्रदर्शित झालेल्या सिनेमांची संख्या ५३ आहे. पण त्याहीपेक्षा गमतीदार आकडा आहे तो सिनेमाचं शीर्षक नोंदणी करणाऱ्यांचा. गेल्या सहा महिन्यांमध्ये अ.भा.चित्रपट महामंडळाच्या एकट्या मुंबई शाखेत सिनेमांची तब्बल १८० पेक्षा जास्त नावांची नोंदणी झाली आहे. यापैकी मोजके सिनेमे प्रदर्शित होऊन गेले आहेत. तर काहींची नावं वाचल्यानंतर सिनेमाचा विषय आणि त्याचा आशयही नेमका काय असेल याचा अंदाज सूज्ञ प्रेक्षकांना येतो. मराठी चित्रपट बॉक्सऑफिसवर अपेक्षित यश मिळवत नसला तरी सिनेमा बनवणाऱ्यांची संख्या मात्र वाढतेय. म्हणूनच चित्रपट महामंडळाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांत मुंबईत १७५, कोल्हापूर शाखेत ५० आणि पुणे शाखेत जवळपास ७५ नावांची नोंदणी झाली आहे. ही नावं नोंदवताना निर्मात्याला एक हजार रुपये भरावे लागतात. याचा थेट फायदा महामंडळाला झाला असून, सहा महिन्यांतल्या नोंदणीवरून मंडळाच्या तिजोरीत तीन लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झालाय. मुंबई शाखेचे व्यवस्थापक विशाल पवार म्हणाले, ‘दररोज निर्माते चित्रपटाच्या नाव नोंदणीसाठी येतातच असं नाही. पण मुंबई शाखेत सरासरी दहा सिनेमांच्या नावाची नोंदणी होते असं म्हणता येईल. हे नाव नोंदवलं आम्ही त्या नावाला लगेच ‘ना हरकत’ देत नाही. इम्पा आणि आमच्या दोन शाखा यांच्याकडे असं नाव आलं नसल्याची खातरजमा करून घेतली जाते. त्यानंतर त्या नावाला ‘ओके’ दिला जातो. हे नाव नोंदवताना महामंडळाकडे एक हजार रुपये जमा करावे लागतात.’

यमक आणि सिक्वेलही

गेल्या काही महिन्यांत खूप वेगवेगळ्या प्रकारची नावं सिनेमांना देण्याचा ट्रेंड होता. उदाहरणार्थ, ‘ख्वाडा’, ‘उर्फी’, ‘बरड’, ‘फुंतरु’, ‘वायझेड’, ‘हाफ तिकीट’ अशा काही नावांचा उल्लेख करता येईल. या नव्या यादीतही अशी काही नावं आहेत. ‘पिप्सी’, ‘व्हाइट अम्ब्रेला’, ‘लॉस्ट अँड फाउंड’, ‘फोटो कॉपी’, ‘लॉलीपॉप’, ‘टीटीएमएम’ अशा काही नावांवरून सिनेमाचा विषय कळत नाही. त्याचवेळी नावातून सिनेमाचा प्रेक्षकवर्ग नेमका स्पष्ट करणारी अनेक नावांची नोंदणी झाली आहे. त्यातही नावात यमक साधण्यात आल्याचं दिसतं. ती नावं अशी, ‘वऱ्हाडी बाणा साऊथचा दिवाणा’, ‘आमचा पक्ष पोरींवर लक्ष’, ‘रांटी बंटी’, ‘नवरा देशी बायको परदेशी’, ‘आपली यारी लयभारी’. तर हिंदीमिश्रीत मराठीतल्या नावांमध्ये ‘झुमका पडला रे’, ‘कल्टी सपनों से’, ‘बोले इंडिया जयभीम’ अशी नावं आहेत. ‘अगडबम २’ आणि ‘पोस्टर गर्ल २’ आगामी दोन सिनेमांच्या सिक्वेलची नावंही रजिस्टर करून ठेवण्यात आली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज