अ‍ॅपशहर

पुरस्कारांसाठी काम नाही : उषा जाधव

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेल्या ‘माई घाट ः क्राइम नं. १०३/२००५’ या मराठी चित्रपटाचं ‘इफ्फी’त कौतुक झालं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2019, 9:00 am
Prasad.Pawar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3

Tweet ः @PrasadPawarMT
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेल्या ‘माई घाट ः क्राइम नं. १०३/२००५’ या मराठी चित्रपटाचं ‘इफ्फी’त कौतुक झालं. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. लवकरच ती एका स्पॅनिश चित्रपटातही दिसणार आहे. त्या निमित्त झालेल्या गप्पा.

यंदा गोवा इथं झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थातच ‘इफ्फी’ या चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या मराठी चित्रपटांची चर्चा रंगली. जगभरातल्या ७६ देशांमधल्या २०० चित्रपटांतून निवडलेल्या १५ उत्कृष्ट चित्रपटांतल्या अभिनेत्रींमधून उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाल्यानं हा पुरस्कार अभिमानास्पद असल्याचं उषानं सांगितलं.

तू राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहेसच. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभिनयाचं कौतुक होतंय, काय सांगशील?

- खरं तर कोणत्या शब्दांत हा आनंद व्यक्त करावा तेच कळत नाही. आई-बाबा सोबत असल्यानं आनंद द्विगुणित झाला. पुरस्कारांनी प्रोत्साहन मिळतं आणि योग्य दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे, याची खात्रीही पटते. मात्र, पुरस्कार मिळावा म्हणून कधीही मी चित्रपट केला नाही वा भूमिकेकडे पाहिलं नाही.

सत्यघटनेवर आधारित चित्रपटांतल्या भूमिकांची लगेचच तुलना होते. ‘माई घाट...’साठी काही विशेष तयारी करावी लागली?


- इथं संबंधित व्यक्ती आणि तिचं जगणं, तिचा संघर्ष हा जितका महत्त्वाचा तितकाच दिग्दर्शकाचा दृष्टिकोनही मी जाणून घेते. त्यानंतर ती भूमिका प्रत्येक प्रसंगात कशी व्यक्त होत असेल याचा माझा अभ्यास करून मी चित्रीकरणाला जाते. ते शब्दांत सांगणं कठीण आहे. केरळमधल्या प्रभावती अम्मा या मातेनं पोलिस कोठडीत चुकीच्या पद्धतीने मृत पावलेल्या आपल्या मुलावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी १३ वर्षे दिलेल्या लढ्याची ही सत्य घटना आहे. त्या मातेचं झिजणं जेव्हा मी पाहिलं तेव्हाच कुठेतरी आतून या भूमिकेची तयारी झाली.

काही चित्रपट हे महोत्सवांसाठी होतात असं बोललं जातं, कलाकारांचा उल्लेखही फेस्टिव्हलच्या चित्रपटांचे नायक-नायिका असा होतो. तुला काय वाटतं?

- अजून माझ्यासमोर तरी कुणी असं म्हटलेलं नाही. मात्र, असं बोललं जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं उत्तम. चित्रपट ग्लोबल होत असताना या म्हणण्याला अर्थ नाही. मी कधीही आपल्याविषयी काय बोललं जातंय, या विचारात पडण्यापेक्षा शांतपणे माझं काम करण्यावर भर देते. कामावर लक्ष केंद्रीत करणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.

तू यापूर्वी टीव्हीवरही अनंत महादेवन यांच्यासोबत काम केलं आहेस. प्रदीर्घ अनुभव असलेला अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडून काय शिकलीस?

- अभिनेता म्हणून उत्तम आहेत, तितकेच ते दिग्दर्शक म्हणूनही स्पष्ट आहेत. आपल्याला कोणत्या फ्रेममध्ये काय हवंय, हे त्यांना पक्क माहीत असतं. त्यांच्यासोबत चित्रपट करणं ही प्रक्रियाच मला छान वाटते.

ट्रॅव्हल एजन्सीतलं काम आणि आता पुरस्कार विजेती अभिनेत्री या प्रवासबद्दल काय सांगशील?

- कोल्हापूरहून पुण्याला आले, ते ट्रॅव्हल एजन्सीतल्या जॉबसाठी. मात्र, अभिनयाचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. मग मुंबई गाठली आणि संघर्ष सुरू झाला. पालकांच्या आशिर्वादानं मी माझी स्वप्न पूर्ण करू शकले. स्वप्नींशी प्रामाणिक राहिलं की ती साकारणं सोपं होतं.

चौकट

कौतुक आवडतंच; पण ताण घेत नाही

अभिनेत्री उषा जाधवला अनेकदा स्मिता पाटील यांच्यासारखं काम करतेस, अशी तिच्या अभिनयाची पावती मिळते. ती म्हणते, ‘असं कौतुक झालेलं कुणाला नाही आवडणार. त्या ग्रेटच होत्या. मात्र, या कौतुकाचा ताण मी घेत नाही. इंटरेस्टिंग भूमिका हवी हा निकष ठेवत मी कलाकृतींची निवड करते.’
ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षकांनी माझी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड केली. जॉन यांच्या पत्नी कॅरोल लिटीलटोन यांनीही अभिनयाचं कौतुक केलं. माझे दिग्दर्शक अनंत महादेवन, तरुण निर्माती मोहिनी गुप्ता आणि टीम यांना हा पुरस्कार समर्पित करते.
उषा जाधव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज