मुंबई टाइम्स टीम
काही वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या 'सडक'चा सिक्वेल, 'सडक २' लवकरच येतोय. अभिनेत्री आलिया भट यात पहिल्यांदाच वडिल महेश भट यांच्यासोबत काम करतेय. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा मेकअप न करता या सिनेमात ती भूमिका साकारते आहे. सिनेमाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरणात आलिया अगदी २० ते २५ मिनिटात तयार होऊन कॅमेऱ्यासमोर यायची म्हणे. आपली भूमिका अधिकाधिक वास्तववादी वाटावी म्हणून तिनं हा निर्णय घेतल्याचं समजतं.
एकामागोमाग एक हिट सिनेमे देत इंडस्ट्रीतली एक यशस्वी अभिनेत्री अशी ओळख आलियानं आपल्या कामातून निर्माण केली आहे. तिनं आजवर पूजा भट आणि महेश भट यांच्यासोबत मात्र काम केलं नव्हतं. 'सडक २'च्या निमित्तानं ती त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतेय. त्यामुळे त्यांच्या होम प्रोडक्शनमधला हा महत्त्वाचा सिनेमा ठरणार आहे. आलियासोबत आदित्य रॉय-कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तसंच 'सडक २'मधल्या संजय दत्तच्या भूमिकेविषयीही कमालीची उत्सुकता आहे. संजू बाबासाठी या चित्रपटात एक खास गाणं आहे. तो या गाण्यावर धमाल नाचला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्याचं चित्रीकरण होत असताना पूजा भट तिथे थांबली होती. गाण्याच्या चित्रीकरणासाठी ती काही सूचनाही देत होती. संजू बाबाचं हे गाणं त्याच्या चाहत्यांना खूश करणारं आहे. मकरंद देशपांडे आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.