अ‍ॅपशहर

तेहतीस वेळा हवेमध्ये

मराठीत 'दहावी फ', 'अस्तु', 'कासव' यासारखे उत्तमोत्तम चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस बऱ्याचदा सेटवरच साजरा झालाय. या निमित्ताने तेहतिसाव्या वाढदिवसाची आठवण त्यांनी मुंटासोबत शेअर केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 31 May 2018, 10:51 am
मराठीत 'दहावी फ', 'अस्तु', 'कासव' यासारखे उत्तमोत्तम चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस बऱ्याचदा सेटवरच साजरा झालाय. या निमित्ताने तेहतिसाव्या वाढदिवसाची आठवण त्यांनी मुंटासोबत शेअर केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sunil-sukthankar


अनेकदा असं झालंय की चित्रपटांचं शूटिंग शेड्यूल आखलं गेलंय आणि त्यात माझा वाढदिवस आला आहे. त्यामुळे सेटवरच माझा वाढदिवस साजरा झाला आहे. शूटिंगमध्ये सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होण्यासारखा आनंद नाही. त्यातल्या माझ्या दोन आठवणी विशेष सांगण्यासारख्या आहेत. मला आठवतंय, 'दहावी फ' या चित्रपटाच्या वेळी म्हणजे १९९९ मध्ये सारसबागेत आमचं एका गाण्याचं शूट होणार होतं. चित्रपटाच्या शूटिंगचं शेड्यूल आधीच आखलेलं असल्यामुळे तेव्हा ३१ मे, म्हणजे वाढदिवस मध्ये येतोय हे माझ्या लक्षात आलं नाही. त्या दिवशी आम्ही शूटसाठी आलो. माझा ३३ वा वाढदिवस असल्यामुळे तेव्हा सेटवरच्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. नंतर मला ३३ वेळा हवेत उडवायचं ठरवलं. मी म्हटलं, 'अरे हे कसं शक्य आहे?' पण त्यांनी अक्षरश: ३३ वेळा मला हवेत उडवलं. मला हिरवी मिरची आवडते. त्यामुळे माझ्या एका महिला सहकाऱ्यानं पिशवी भरुन हिरव्या मिरच्या भेट दिल्या होत्या.

त्यानंतर सात वर्षांनंतरची एक आठवण आहे. 'नितळ' या चित्रपटाचं शूटिंग पुण्यात सुरू होतं. तेव्हा आम्ही एका बंगल्यामध्ये एका गाण्याचं शूट करणार होतो. त्या दृश्यामध्ये पूर्ण कुटुंब दिसणार होतं. तेव्हा विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रवींद्र मंकणी, विजय तेंडुलकर ही दिग्गज मंडळी उपस्थित होती. माझ्या सहाय्यक दिग्दर्शकांनी मिळून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक भलंमोठं २ फुटांचं ग्रीटिंग कार्ड तयार केलं. त्यावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सर्वांनी मिळून मला ते कार्ड दिलं. आजही मी ते कार्ड जपून ठेवलं आहे.

शब्दांकन- हर्षल मळेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज