अ‍ॅपशहर

हास्याची गोळी देणारा ‘डॉक्टर’

दुसरा संजय दत्त अशीच आज डॉ. संकेत भोसलेची ओळख बनली आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तो करत असलेली संजू बाबाची नक्कल बघून सगळे थक्क होतात. हास्याची गोळी देणारा हा मराठमोळा ‘डॉक्टर’ लवकरच मराठी शोमध्ये दिसणार आहे. यानिमित्त त्यानं मटाशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

मृण्मयी नातू | Maharashtra Times 15 May 2017, 2:43 am
दुसरा संजय दत्त अशीच आज डॉ. संकेत भोसलेची ओळख बनली आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तो करत असलेली संजू बाबाची नक्कल बघून सगळे थक्क होतात. हास्याची गोळी देणारा हा मराठमोळा ‘डॉक्टर’ लवकरच मराठी शोमध्ये दिसणार आहे. यानिमित्त त्यानं मटाशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr sanket bhosle interview
हास्याची गोळी देणारा ‘डॉक्टर’


‘स्क्रीन पत्ती’, ‘बाबा की चौकी’, ‘वेटिंग लाऊंज’ हे डॉक्टर संकेत भोसलेचे व्हिडिओज युट्यूबवर एकदम हिट आहेत. त्याचा कॉमिक सेन्स जबरदस्त आहे. संजय दत्त, सलमान खान, फरहान अख्तर, यो यो हनी सिंग या बॉलिवूडकरांच्या नकला एकदम उत्तम करतो. त्यातही संजू बाबाची नक्कल करताना खूप मजा येत असल्याचं तो सांगतो. मूळचा पुण्याचा असलेला हा हास्यकलाकार गेली सात वर्ष इंडस्ट्रीत आहे. अनेक मिमिक्री शोजमध्ये त्यानं बाजी मारली आहे. मात्र खऱ्या अर्थानं ‘लाफ इंडिया लाफ’पासून हास्यकलाकार म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात झाली. आता मिर्ची पुरस्कार, कपिल शर्मा शोनंतर त्याच्या करिअरला नवीन वळण मिळालं आहे.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच संकेत कलाकारांच्या नकला करत आलाय. अर्थात अभिनय हे त्याचं पॅशन असून पेशानं मात्र तो दंतवैद्य आहे. गेल्या आठवड्यात आगामी ‘भूमी’ चित्रपटाच्या रॅपअप पार्टीला संजय दत्तनं संकेतला बोलावलं होतं. तिथं त्यांनं त्याचं काम आवडत असल्याचं सगळ्यांना सांगत या कलाकाराचं तोंड भरुन कौतुक केलं. ‘नक्कल केल्यानं संजू सर कधीच चिडले नाहीत. 'बेटा है तू मेरा' असं म्हणत त्यांनी मला जवळ घेतलं. माझ्यासाठी तो अक्षरशः अविस्मरणीय क्षण होता. संजू सर हा खूप खिलाडूवृत्तीचा माणूस आहे. माझ्यासाठी तो कायम रॉकस्टार असेल' या शब्दांत तो आनंद व्यक्त करतो.

रणबीरनं बघितले माझे व्हिडिओज
‘संजय दत्त बायोपिक’मधील त्याच्या भूमिकेला रणबीर कपूर न्याय देईल असा संकेतला विश्वास आहे. भूमिकेत शिरण्यासाठी रणबीरनं संकेतचे व्हिडियोज बघितल्याचं तो सांगतो. त्याच्या मते, ‘रणबीर अल्पावधीतच संजू सरांची हुबेहूब नक्कल करायला शिकला आहे’. लवकरच होणाऱ्या स्टार परिवार पुरस्काराचं सूत्रसंचालन संकेत करणार असून त्यात त्याचे काही गॅग्सही असल्याचं समजतं.

प्रथमच मराठी

लवकरच संकेत ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. यानिमित्तानं तो प्रथमच मराठी मंचावर दिसणार असल्यानं तो स्वतः त्यासाठी खूप उत्सुक आहे. आगामी एका एपिसोडमध्ये सुदेश भोसले, सुगंधा मिश्रा आणि संकेत असं त्रिकुट थुकरटवाडीमध्ये खळखळून हसवताना दिसणार आहे.

जस्ट फ्रेंड्स

यावर्षात संकेत आणि कॉमेडी क्वीन सुगंधा मिश्रा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र त्या केवळ अफवा असल्याचं डॉक्टर सांगतो. 'ऑन स्क्रीन ती माझी गर्लफ्रेंड असली तरी ऑफ स्क्रीन आमच्यात फक्त मैत्री आहे.' वरूण धवन-आलिया भट्ट यांनी कपिलच्या शोमध्ये घेण्यासाठी शिफारस केल्याचं समजतं. मिर्ची पुरस्कार सोहोळ्यात संकेतचं कॉमेडी टायमिंग बघितल्यावर वरूण-आलिया त्याच्यावर फिदा झाले होते म्हणे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज