अ‍ॅपशहर

अशोक मामांच्या भेटीनं सगळेच हरकले, 'भाग्य दिले तू मला' च्या कलाकारांना सुखद धक्का

Ashok Saraf with Vivek Sangle & Tanvi Mundle: चतुरस्र ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भेटायला कोणाला आवडणार नाही! त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटत असतं. यात कलाकार तरी कसे मागे राहतील!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2022, 11:05 am
मुंबई: चाहतेच नव्हे तर कलाकारही अशोक मामांना भेटण्यास, त्यांच्याबरोबर काम करण्यास इच्छुक असतात. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या टीमला त्यांच्या भेटीचा सुखद धक्का मिळाला. अशोक मामा या मालिकेच्या सेटवर गेले होते. त्या टीमशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi actors with ashok saraf



या भेटीविषयी मालिकेतला राजवर्धन म्हणजे अभिनेता विवेक सांगळे म्हणाला, 'ज्यांना लहानपणापासून फक्त टीव्हीवर पाहिलं होतं, त्यांना भेटण्याचं फक्त स्वप्न पाहिलं होतं अशा अशोक सराफ यांना प्रत्यक्ष भेटता आलं याचा प्रचंड आनंद आहे. मी त्यांचा चाहता आहे. त्यांचे सिनेमे मी असंख्य वेळा पाहिले आहेत. त्यांच्यासारखी संवादफेक करण्याचा मी अनेकदा प्रयत्न करतो. एखाद्या दिग्गज व्यक्तीला भेटल्यावर थोडंसं दडपण येतं; पण यावेळी ते जाणवलं नाही. इतका आपलेपणा होता त्या भेटीत.'

View this post on Instagram A post shared by Vivek Ramesh Sangle (@viveksangle06)


विवेकसह मालिकेतल्या कावेरीचं म्हणजे अभिनेत्री तन्वी मुंडलेचंही मामांनी कौतुक केलं. त्याविषयी विवेक म्हणाला, 'ते आमच्या दोघांच्या कामाचं कौतुक करत होते. खरं तर आपलं कौतुक ऐकायला कोणाला आवडत नाही? पण यावेळी त्या कौतुकाकडे विशेष लक्ष नव्हतं. त्यांचं बोलणं फक्त ऐकत राहावं असं वाटत होतं. त्यांच्याबरोबर सिनेमा किंवा नाटकात काम करायला मला आवडेल अशी इच्छा मी त्यांना सांगितली. त्यांना भेटण्याचं स्वप्न आता पूर्ण झालंय. आता त्यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न कधी पूर्ण होतंय ते बघू या.' अशोक सराफ 'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या सेटवर सहज गेले होते. तिथल्या कलाकार-तंत्रज्ञांसाठी मात्र ती 'ग्रेट भेट' ठरली.

महत्वाचे लेख