मुंबई टाइम्स टीम
मराठी सिनेसृष्टीतली प्रेक्षकांची लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट एका वेब सीरिजमध्ये एकत्र येतेय. खऱ्या आयुष्याप्रमाणेच वेब सीरिजमध्येही हे जोडपं नवरा-बायको म्हणूनच दिसणार आहे. 'आणि काय हवं?' असं या वेब सीरिजचं नाव आहे. वेबचं व्यासपीठ प्रियासाठी नवीन नसलं, तरी उमेश मात्र पहिल्यांदाच वेबवर झळकणार आहे. 'वेबवर प्रिया मला सीनिअर आहे. त्यामुळे इथे काम करताना एक सहकलाकार म्हणून तिनं माझी चांगलीच शाळा घेतली', असं उमेश गमतीत म्हणतो.
उमेश आणि प्रिया ही जोडी साधारण सहा वर्षांपूर्वी 'टाइमप्लीज' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर त्यांनी एकत्र काम केलं नव्हतं. या दोघांनी एकत्र काम करावं अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त होत होती. प्रिया यापूर्वी 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. त्यातल्या तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर आता उमेश पहिल्यांदा वेबवर येत असून, ही जोडी एकत्र दिसणार आहे. वेब सीरिज म्हटली की बोल्ड दृश्यं, मारामारी हे समोर येत असलं, तरी ही वेब सीरिज मात्र तशी नसल्याचं उमेश सांगतो. 'एका आनंदी नवदाम्पत्याची गोष्ट 'आणि काय हवं?'मध्ये पाहायला मिळेल. नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक घटना यात आहे. दिग्दर्शक वरूण नार्वेकरच्या 'मुरांबा' सिनेमाचा मी फॅन आहे. मला त्याच्यासोबत काम करायचं होतं. तो योग या निमित्तानं जुळून आला', असं उमेश म्हणाला.