अ‍ॅपशहर

एक वेळ मानधन मिळालं नाही तरी चालेल; पण...हे माझ्यासाठी त्रासदायक असतं, असं का म्हणाली सोनाली?

Dharavi Bank Web Series: सिनेमा असो किंवा रंगभूमी; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या दमदार अभिनय कौशल्याचं दर्शन घडवलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धारावी बँक' वेब सीरिजमधील तिच्या कामाचं कौतुक होतंय. नवी ओळख आणि प्रेक्षक मिळवून देणाऱ्या ओटीटी माध्यमाबाबत तिनं 'मुंटा'शी संवाद साधला.

Authored byकल्पेशराज कुबल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2022, 6:44 pm
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonali kulkarni
० 'धारावी बँक' ही वेब सीरिज निवडण्यामागचं कारण काय?
- एकमेव कारण म्हणजे दिग्दर्शक समित कक्कड. समित दिग्दर्शक नसता तर तो उत्तम वकील किंवा मानसोपचारतज्ज्ञ झाला असता. त्याच्याकडे कमालीची 'कन्व्हिन्सिंग पॉवर' आहे. तसंच या कथानकातील माझी व्यक्तिरेखा मुख्यमंत्री जान्हवी सुर्वे; ही माझ्या खऱ्या आयुष्याच्या विरुद्ध आहे. माझी कलाकार म्हणून असलेली प्रतिमा काहीशी निरुपद्रवी आहे. मी कोणाला त्रास देत नाही; मिळून मिसळून मला काम करायला आवडतं. पण, कथानकात माझी भूमिका ही प्रचंड महत्त्वाकांक्षी असून समोरच्या व्यक्तीकडून काम करून घेण्याची तिच्याकडे अधिकारवाणी आहे. व्यक्तिरेखेतील हा बाज मला अधिक भावला.

० ओटीटीचा (ओव्हर द टॉप) आवाका दिवसेंदिवस वाढतोय; या माध्यमानं मनोरंजनसृष्टीला काय दिलं असं तुला वाटतं?
- ओटीटी या माध्यमानं सर्वांना काम दिलं. कारण, एक काळ असा होता की, मला किंवा अनेक कलाकारांना उपेक्षित वाटायचं. सिनेमे तर त्यांनाच मिळतात ज्यांना हिरो-हिरोईनचा चेहरा आहे. ओटीटीनं कलाकारांच्या आणि निर्मात्यांच्या या विचारसरणीला छेद दिला. ओटीटीनं विचारलं तुम्हाला काम करायचंय? आमच्याकडे भूमिका आहे. तुमच्यासाठी ही भूमिका लिहिली आहे. सर्व रंगाच्या, आकाराच्या, वयाच्या कलाकारांना उल्लेखनीय काम मिळालं. कलाकारांबरोबर पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञ मंडळींनादेखील या माध्यमानं काम दिलं. 'मनोरंजन हे महाग नाहीय; तर ते सर्वांसाठी, घरच्या घरीदेखील उपलब्ध आहे.' हे ओटीटीनं प्रामुख्यानं सांगितलं.

० ओटीटीनं तुला काय दिलं?
- गेल्या वर्षी मी 'विसल ब्लोअर' ही सीरिज केली. आता माझी 'धारावी बँक' ही दुसरी सीरिज प्रदर्शित झाली. सध्या माझ्या हातात ६-७ सीरिज आहेत. तसंच तीन हिंदी आणि तीन मराठी सिनेमांचंही काम सुरू आहे. सतत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची भूक असते; तशीच माझीही आहे. नवीन क्षेत्र, माध्यम, कलाकृती मला नेहमीच आकर्षित करतात. ओटीटी माध्यमात काम करताना जाणवलंय की, ओटीटीनं मला नवा प्रेक्षकवर्ग मिळवून दिलाय. ताजा आणि नव्या दमाचा प्रेक्षक ओटीटीनं दिला आहे.

० नवीन नाटक कधी करणार?
- सध्या जे हातात आहे; त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करतेय. 'व्हाइट लिली आणि नाइट रायडर' या माझ्या नाटकाचा अमेरिका दौरा येत्या दिवसांत ठरला आहे. त्यामुळे त्या प्रयोगांना मला वेळ द्यायचाय. नव्या नाटकाच्या संहिता; वाचण्याचा मोह मी टाळला आहे. कारण, मी नाटक वाचलं आणि ते मला आवडलं तर मी नकार देऊ शकणार नाही. एक वेळ मानधन मिळालं नाही तरी चालेल; पण नाटकाला नकार देणं माझ्यासाठी त्रासदायक असतं. २०२३मध्ये नवं नाटक करता येईल.

० आज 'अभिनेत्री सोनाली कुलकर्णी' स्वतःला कुठे बघते? आगामी काळात ती दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार का?- अनेकदा मला दिग्दर्शनाकडे वळावं असं वाटतं. कॉलेजच्या दिवसांमध्ये मी जेव्हा एकांकिका बसवायचे; तेव्हाचा माझ्यातला दिग्दर्शक आजही डोकावतो. पण, प्रत्येक कलाकार दिग्दर्शक झाला तर चांगल्या दिग्दर्शकांनी काय करायचं? तसंच जे चांगले कलाकार आहेत, ज्यांना दिग्दर्शनाची जाण आहे; ते दिग्दर्शनाकडे वळले तर ते अभिनेता-अभिनेत्री म्हणून कमी पडू शकतात. त्यामुळे पुढील काही वर्षं तरी मी स्वतःला अभिनेत्री म्हणून बघते. त्यानंतर कदाचित मी दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येईन.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज