मी पण सचिन

स्वप्नील जोशी,प्रियदर्शन जाधव,अभिजित खांडकेकर,कल्याणी मुळे,अविनाश नारकर,सुहिता थत्ते,मृणाल जाधव,अनुजा साठे-गोखले
Drama2 Hrs 17 Min
क्रिटिक रेटिंग3.0/5वाचकांचे रेटिंग3.5/5
जयदीप पाठकजी | महाराष्ट्र टाइम्स 1 Feb 2019, 6:38 pm
डोळ्यात देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाच्या ग्रामीण भागातील मुलाची प्रातिनिधिक गोष्ट ‘मी पण सचिन’ हा सिनेमा सांगतो. ही गोष्ट सांगताना तो आशयाशी प्रामाणिक राहतोही. मात्र, ‘मेलोड्रामा’ आणि भाबड्या आशावादाचा हट्ट काहीसा सोडला असता तर तो अधिक रंजक आणि नेमका झाला असता. अर्थात तरीही प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात ‘मी पण सचिन’ यशस्वी ठरतो. खेळावर आधारित असलेल्या अनेक सिनेमांची ‘मी पण सचिन’ पाहताना आठवण येत राहते. काही दृश्यांची पुनरावृत्तीही होते. क्रीडाप्रेमावर आधारित असलेल्या सिनेमांचा मराठीतील एक ‘प्रयोग’ म्हणून या सिनेमाकडे पाहायला हवे.

सिनेमाची गोष्ट ही भोरमधील सचिन पाटील (स्वप्नील जोशी) याच्याभोवती फिरते. क्रिकेट खेळासाठी आवश्यक असलेले अंगभूत कौशल्य असूनही सचिन क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठी मजल मारू शकत नाही. अगदी ऐन उमेदीच्या काळातच राजा देशमुख (अभिजित खांडकेकर) त्याचे पाय ओढतो. अनेक प्रयत्न करूनही अंतर्गत राजकारणाचा बळी गेलेल्या सचिनचे फेलोशिपवर ब्रिटनला जायचे आणि लॉर्डसवर खेळण्याचे स्वप्नही अधुरेच राहते. सचिनची आई सातत्याने त्याच्या क्रिकेट खेळण्याला विरोध करीत असल्यामुळे सचिन क्रिकेटचे वेड सोडून देतो आणि पारंपरिक शेतीचा व्यवसाय स्वीकारतो. पुढे सचिनचे लग्न होते आणि त्याला एक मुलगी आणि एक मुलगा होतो. आपले अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलानेही क्रिकेट खेळावे, अशी त्याची अपेक्षा असते. मात्र, त्याच्या मुलापेक्षा मुलीला क्रिकेटमध्ये जास्त रस असतो. मुलीची ही गोडी पाहून तो तिला क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे ठरवतो. अर्थात या प्रवासातही त्याला अनेक अडचणी येतात, संकटे येतात. मात्र, तो या सर्वाला पुरून उरतो. या संघर्षाचा प्रवास म्हणजे ‘मी पण सचिन’ हा सिनेमा.

सिनेमाचे मांडणीच्या दृष्टीकोनातून सरळसरळ दोन भाग पडतात. एका टप्प्यात सचिनचं क्रीडाप्रेम आणि त्याच्या संघर्षाचा भाग येतो. तर दुसऱ्या टप्प्यात त्याच्या मुलांच्या संघर्षाची गोष्ट येते. गावाकडं क्रिकेटचे सामने आणि एकूणच तिथल्या वातावरणाची गोष्ट अतिशय वरवरची दाखवली जाते. एखाद्या क्रिक्रेटपटूचा गाव ते शहर असा झालेला प्रवास अधिक टोकदारपणे आणि वास्तवाच्या पातळीवर दाखवण्यात सिनेमा कमी पडतो. हे सारं मांडताना तो ‘फिल्मी’ होतोच; पण उगाच भाबड्या आशावादाचं दर्शनही घडवतो. हिरो विरुद्ध व्हिलन अशी चौकट जमवण्यासाठी काही गोष्टी घुसडल्या जातात. मांडणीच्या पातळीवर ही काहीशी गल्लत होते. मात्र, कौटुंबिक पातळीवर सचिनला जे काही सोसावं लागतं; त्याचं चित्रण एकदम अस्सल झालं आहे. प्रेम, मैत्री, वैर अशा नात्यांच्या विविध छटा सिनेमा दाखवतो. कौटुंबिक मनोरंजनासोबतच आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक संदेश देण्याचा दिग्दर्शक प्रयत्न करतो. क्रिकेट सामन्याचे चित्रण आणि त्यातील उत्कंठता दाखवताना ‘लगान’ची आठवण येते. बाकी काही गोष्टी नायकाचा संघर्ष दाखवताना जमवून आणल्याचेही जाणवते. स्वप्नील जोशी त्याच्या रूपेरी पडद्यावरील चौकटीच्या बाहेर येणारी भूमिका साकारतो. ग्रामीण बाज असलेली ही भूमिका तो पूर्ण ताकदीने साकारतो. प्रियदर्शन जाधवने त्याच्या मित्राची केलेली भूमिका काही ठिकाणी ‘लाउड’ वाटते. मात्र, तरीही लक्षात राहते. अभिजित खांडकेकरने रंगवलेला खलनायक लक्षवेधी आहे. अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते, मृणाल जाधव आपापल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय देतात. सिनेमात गाणी आहेत. मात्र, ती फारशी प्रभावी वाटत नाहीत. थोडक्यात काय तर मी पण सचिन हा एक क्रिकेटवेडाची आणि ‘क्रिकेट’वेड्याची गोष्ट सांगतो. मध्यंतरानंतर तो काही काळ रेंगाळतो; पण नंतर पुन्हा ‘ट्रॅक’वर येतो. श्रेयश जाधव दिग्दर्शनात बऱ्यापैकी कामगिरी करतात. स्वप्नील जोशीच्या चाहत्यांनी एक वेगळ्या रूपातील स्वप्नील जोशी पाहण्यासाठी ‘मी पण सचिन’ पाहावा.

निर्माते : नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे
लेखन : श्रेयश पी. जाधव, अजिता काळे, राजेश कोलन
दिग्दर्शक : श्रेयश पी. जाधव
संकलन : आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतिवाले
कलाकार : स्वप्नील जोशी, प्रियदर्शन जाधव, अभिजित खांडकेकर, नुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते, मृणाल जाधव
दर्जा : तीन स्टार

पुढचा रिव्ह्यू

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज