ऊंचाई

अमिताभ बच्चन,अनुपम खेर,बोमन इराणी,डॅनी,परिणीती चोप्रा,नीना गुप्ता,नसिफा अली सोधी
क्रिटिक रेटिंग3.5/5वाचकांचे रेटिंग4/5
Authored byजयदीप पाठकजी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2022, 12:52 pm
‘राजश्री प्रॉडक्शन’च्या सिनेमांचा ठरावीक असा ‘पॅटर्न’ असतो. वेगवेगळ्या काळात साधे, सोपे आणि हलकेफुलके विषय घेऊन सिनेमे काढणं, ही या ‘प्रॉडक्शन हाउस’ची ओळख. रौप्य, सुवर्ण महोत्सवी चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे सूरजकुमार बडजात्या मोठ्या कालावधीनंतर ‘ऊंचाई’ ही आजच्या काळाशी सुसंगत गोष्ट घेऊन आले आहेत. काळ बदलला, तसा ‘राजश्री’चा सिनेमाही ‘लग्नाच्या व्हिडिओ कॅसेट’मधून बाहेर पडला, असं म्हणायला नक्की वाव आहे. कौटुंबिक आणि भावनाप्रधान सिनेमांचे सोहळे साजरे करणारे बडजात्या इथेही ‘राजश्री स्टाइल’ गोष्ट मांडतात. ‘मास’चा विचार करून फारच शिताफीने ‘मेलोड्रामा’ रंगवतात. प्रमुख कलाकारांच्या तगड्या परफॉर्ममन्समुळे ही गोष्ट ‘वन टाइम वॉच’ होते. मागचा-पुढचा विचार न करता आलेला क्षण भरभरून जगायचं हे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ तत्त्वज्ञान ‘ऊंचाई’ ज्येष्ठांच्या नजरेतून मांडतो.

सिनेमाची गोष्ट आहे चार घनिष्ठ मित्रांची. अमित श्रीवास्तव (अमिताभ बच्चन), ओम शर्मा (अनुपम खेर), जावेद सिद्दीकी (बोमन इराणी) आणि भूपेन (डॅनी डेंग्जोपा) हे ते चार मित्र. आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्येही ‘फूल टु एन्जॉय’ करणारी आणि उत्तम आर्थिक स्थितीतील ही चौकडी. (म्हणजे बडजात्यांचा सिनेमा हा असा चकचकीत स्वरूपाचा असतोच.) यापैकी भूपेन आयुष्यातून अचानक ‘एक्झिट’ घेतो. चौघांनी एकत्र मिळून ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’वर जाण्याचं भूपेननं पाहिलेलं स्वप्न अपूर्ण राहतं. भूपेनच्या माघारी त्याच्या अस्थींचं विसर्जन ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’वरच करण्याचं अमित ठरवतो आणि एकच कल्लोळ होतो. ओम, जावेद वयाचं आणि एकूणच प्रकृतीचं कारण पुढे करून सुरुवातीला विरोध करतात; मात्र नंतर मित्राच्या प्रेमापोटी हे शिवधनुष्य उचलण्याचं ठरवतात. अमित, ओम आणि जावेद यांचा ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’पर्यंतचा प्रवास म्हणजे ‘ऊंचाई’ सिनेमा.

चार मित्रांच्या एका गिर्यारोहण मोहीमेपुरती ही गोष्ट नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. प्रत्येक मित्राचा भूतकाळ आहे, त्याच्या कुटुंबातील लोकांशी उडणारे खटके आहेत. ज्येष्ठ नागरिकाचं आयुष्य घालवत असताना दोन पिढ्यांत होणारा संवादही आहे अन् विसंवादही आहे. हा सारा अतिशय भावनिक आणि गुंतागुंतीचा मामला लेखक अभिषेक दीक्षित अतिशय संवेदनशीलपणे रंगवतात. अनेक वेळा ‘टिपिकल फिल्मी’ मांडणीही पाहायला मिळते. बडजात्यांच्या सिनेमात असणारे ‘योगायोग’ इथंही डोकावत राहतात, शेवटाकडं जाताना प्रेक्षक समाधानी वृत्तीनं चित्रपटगृहाबाहेर पडावेत, याची खबरदारीही घेतली जाते.

वयाची सत्तरी ओलांडलेले कोणते मित्र असे ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ला कोणताही विचार न करता, फार सराव न करता जातात, असे तार्किक प्रश्न आपल्याला पडतात. अर्थात, ते तसे पडू न देण्यातच प्रेक्षक म्हणून आपलं शहाणपण असतं. इथं अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्नच नाही. त्याला दाखवायचे आहेत ते फक्त आणि फक्त परस्परांतील नातेसंबंध, त्यातील उणिवा, मित्रांचं भरभरून जगणं, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलेल्यांचा स्वत:शीच सुरू असलेला संवाद, काय चुकलं, काय बरोबर या जमाखर्चाचे मांडलेले हिशेब. सूरजकुमार बडजात्या या सगळ्याच्या फार खोलात शिरत नसले; तरीही ते ही गोष्ट प्रत्येक टप्प्यावर जास्तीत जास्त भावनाप्रधान कशी होईल, याची दक्षता घेतात. कौटुंबिक, ‘मेलोड्रामा’ हाताळण्यातला त्यांचा अनुभव आपल्याला वारंवार जाणवत राहतो. सिनेमाची सर्वांत जमेची बाजू म्हणजे प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय. अमिताभ-अनुपम-बोमन यांची पडद्यावर रंगलेली ‘केमिस्ट्री’ नक्कीच बघण्याजोगी. या तिघांचाही अभिनय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव अनेक प्रसंगामध्ये दिसतो. परिणिती चोप्रा छोट्याशा भूमिकेत लक्षात राहते. नीना गुप्ता, सारिका, नसिफा अली सोधी यांच्या भूमिकाही प्रसंगानुरूप. गाणी आणि संगीत हा ‘राजश्री’च्या सिनेमांचा प्राण. इथंही इर्शाद कामिल यांची गाणी आणि अमित त्रिवेदीचं संगीत आशयाचा नूर पकडणारं. जुन्या ‘मेलडी’चा काळ आता सरला आहे, हेच अमित त्रिवेदी सांगू इच्छितो.

थोडक्यात काय, तर ‘ऊंचाई’ हा ‘सेकंड इनिंग’च्या प्रेक्षकांचा सिनेमा आहे. सध्याच्या काळात या वर्गासाठी, त्यांच्या भावविश्वाशी निगडित असणारं असं काही फारसं दाखवलं जात नाही. (इथंही ते काहीसं ‘गुडी गुडी’ आहेच.) ‘ऊंचाई’ ती कमतरता भरून काढण्याचं काम करतो. एक टिपिकल कौटुंबिक, भावनाप्रधान ‘डिश’ सूरज बडजात्यांनी आपल्यापुढे आणली आहे. ‘राजश्री प्रॉडक्शन’चे सिनेमे पाहण्याची सवय असणाऱ्यांनी, असे ‘मेलोड्रामा पॅटर्न’च्या सिनेमाची सवय असलेल्यांनी या ‘उत्तुंग’ भावनाप्रधान सिनेमाच्या वाट्याला नक्की जावं.


निर्माता : सूरजकुमार बडजात्या, महावीर जैन, नताशा ओसवाल

लेखन : अभिषेक दीक्षित

दिग्दर्शक : सूरजकुमार बडजात्या

गीते : इर्शाद कामिल

संगीत : अमित त्रिवेदी

संकलक : श्वेता मॅथ्यू

कलाकार : अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता, नसिफा अली सोधी

दर्जा : साडेतीन स्टार

पुढचा रिव्ह्यू

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज