झिपऱ्या

चिन्मय कांबळी,प्रथमेश परब,सक्षम कुलकर्णी,अमृता सुभाष,प्रवीण तरडे,अमन अत्तार,हंसराज जगताप,देवांश देशमुख,विमल म्हात्रे,दीपक करंजीकर
Drama2 Hrs 15 Min
क्रिटिक रेटिंग3.0/5वाचकांचे रेटिंग3.5/5
मुकुंद कुळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2018, 6:55 am
'झिपऱ्या'बद्दल उत्सुकता होती, कारण तो अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या' नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. अरुण साधू यांच्या प्रत्येक साहित्यकृतीचं मोठेपण, त्यांच्या पत्रकार असण्यात होतं. कारण 'सिंहासन'-'मुंबई दिनांक' ते 'मुखवटा'-'झिपऱ्या'पर्यंतची त्यांची प्रत्येक साहित्यकृती म्हणजे त्यांच्यातल्या पत्रकाराने केलेलं वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण होतं. एखादा रिपोर्ताज असतो, तसं त्यांचं लिखाण असायचं. साहजिकच त्यांच्या कादंबऱ्या वाचताना वाचक त्या कथानकात गुंतून जायचा, नव्हे त्या कथानकाचा एक भाग व्हायचा. 'झिपऱ्या' वाचतानाचा अनुभवही यापेक्षा वेगळा नाही. झिपऱ्या वाचता वाचता, वाचक झिपऱ्या आणि तो ज्या अधोविश्वात राहतो, त्याचा एक अपरिहार्य भागच बनून जातो,… काहीसा तसाच, पण अपूर्ण अनुभव झिपऱ्या हा सिनेमा देतो. कादंबरी जशीच्या तशी किंवा पूर्णत्वाने चित्रपटात अवतरत नाही. कादंबरी आणि चित्रपटाची तुलना करण्याचा हेतू नाही, परंतु सिनेमाचं नाव 'झिपऱ्या' असलं, तरी सिनेमा होतो अस्लमचा. कारण झिपऱ्यापेक्षाही सिनेमात अस्लमचं पात्र अधिक जोरकसपणे उतरलं आहे… आणि सिनेमाची सुरुवात व शेवट पाहताही अस्लमच झिपऱ्यापेक्षा भाव खाऊन जातो. वास्तविक पिंगळ्याभायचा (नचिकेत पूर्णपात्रे) अपघाती मृत्यू झाल्यावर, त्याच्या या मृत्यूला कळतनकळत कारणीभूत ठरलेला झिपऱ्याच (चिन्मय कांबळी) त्याच्या बूटपॉलिश टोळीचा नायक होतो.… झिपऱ्या किंवा त्याची टोळी वाईट नसते. उलट कष्टाचे पैसे मिळवण्याकडेच त्यांचा कायम कल असतो. परंतु ते ज्या अधोविश्वाचा भाग असतात, ते अधोविश्वच असं असतं की इच्छा असो वा नसो, त्याचा भाग असणारा प्रत्येकजण बकाली नि गुन्हेगारीच्या फेऱ्यात गुरफटला जातो.… यात त्यांच्या आयुष्याचं लक्तर होण्याचीच शक्यता अधिक असते, जे अस्लमच्या (प्रथमेश परब) आयुष्याचं होतं. झिपऱ्याचं आयुष्य मात्र मार्गी लागतं, ते त्याच्या आयुष्यात आलेल्या कीर्तने मास्तरांमुळे (दीपक करंजीकर ). कीर्तने मास्तर झिपऱ्या आणि त्याच्या टोळीला शिकवायचा विडा उचलतात. त्यांचा बूटपॉलिशचा धंदा चालत नाही म्हणून, त्यांना इतर व्यवसाय करायला पैसाही देतात. कीर्तने मास्तरांच्या या चांगुलपणामुळे झिपऱ्याचे इतर दोस्त काही शिकतात की नाही माहीत नाही (कारण ते सिनेमात दाखवलेलं नाही), पण झिपऱ्या बहुधा शिकत असावा, असं सिनेमातलं शेवटं दृश्य पाहून वाटतं.… पण झिपऱ्याच्या आयुष्यातला परिवर्तनाचा हा महत्त्वाचा भाग सिनेमात येत नाही.झोपडपट्टी आणि रेल्वेस्टेशन परिसरातलं अधोविश्व सिनेमात चांगलं अधोरेखित झालेलं आहे. झिपऱ्या आणि नाऱ्याच्या (सक्षम कुलकर्णी ) कुटुंबकथेतूनही ते नेमकं येतं. सिनेमाला दिलेली गती आणि एकूण ट्रीटमेंटमुळे या अधोविश्वाला खरेपणाही येतो. परंतु तरीही कथानकाच्या बांधणीला नेमकं टोक न आल्यामुळे सिनेमा चुकीच्या नोटवर संपल्यासारखं वाटत राहतं. किंबहुना त्या शेवटामुळेच कथेचा नायक झिपऱ्यापेक्षा अस्लम होऊन जातो. संपूर्ण चित्रपटात झिपऱ्याचा कस लागेल किंवा झिपऱ्याचा प्रभाव जाणवेल, असं एकही दृश्य नाही. त्यामुळे प्रमुख नायक म्हणून सिनेमात झिपऱ्याचा प्रभाव पडत नाही. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी चांगली कामं केलीत. झिपऱ्या आणि त्याचा कंपूही उत्तम. पण भाव खाऊन जातो प्रथमेश परबचा अस्लम आणि अमृता सुभाषची लिली. झिपऱ्याच्या बहिणीच्या भूमिकेत अमृता सुभाष यांनी खूपच उत्तम कामगिरी केलीय. सक्षम कुलकर्णीचा नाऱ्याही मस्त... फक्त त्याला अजून किती काळ लहान मुलांच्या भूमिकांत कोंबणार हा प्रश्न आहे! खरंतर साधू यांची झिपऱ्या कादंबरी उत्तम आहे. कादंबरीला न्याय देण्याचा बरा प्रयत्न सिनेमात केलेला आहे. मात्र पटकथेच्या पातळीवर कांदबरीतला आशय सिनेमात नेमकेपणाने पकडला गेलेला नाही. त्यामुळे वास्तववादी चित्रीकरण असतानाही, सिनेमा कथेच्या मांडणीत कमी पडतो.

पुढचा रिव्ह्यू

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज