अ‍ॅपशहर

चायनीज सोयाचिलीचा तडका

सोयाचिली हा डोंबिवलीच्या खाद्यसंस्कृतीतला घटक बनला आहे. केवळ कॉलेज तरुणच नाही, तर सर्व वर्गांतील लोक या डिशचा आस्वाद घेण्यासाठी डोंबिवलीत येतात.

Maharashtra Times 28 May 2016, 12:55 am
डोंबिवली शहर ओळखलं जातं, ते इथल्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांसाठी. ठाकूरचा वडापाव, मुनमुनची मिसळ, कुलकर्णींचं पियुष, याची चव चाखली नसणारा डोंबिवलीकर सहज शोधून सापडणार नाही. या अस्सल मराठी पदार्थांबरोबरच चायनीज पदार्थही आता हळूहळू डोंबिवलीमध्ये रुळत आहेत. याची सुरुवात करण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे, तो मॉडेल कॉलेजजवळील सोयाचिली सेंटरचा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम soya chili
चायनीज सोयाचिलीचा तडका


साधारण सहा वर्षांपूर्वी डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या परिसरातील विद्यार्थ्यांना खाण्यासाठी एखादा वेगळा पदार्थ द्यावा, या हेतूने श्री गणेश चायनीज आणि सोयाचिली सेंटर सुरू करण्यात आले. तेव्हापासून हळूहळू सोयाचिली हा डोंबिवलीच्या खाद्यसंस्कृतीतला घटक बनला आहे. केवळ कॉलेज तरुणच नाही, तर सर्व वर्गांतील लोक या डिशचा आस्वाद घेण्यासाठी येतात. डोंबिवली बाहेरूनही वाशी, भिवंडी, मुरबाड, पनवेल येथूनही खास या सोयाचिली सेंटरचे नाव ऐकून लोक गर्दी करत आहेत.

डोंबिवलीतील पहिलं सोयाचिली सेंटर होण्याचा मान या दुकानाला असून त्यानंतर ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोयचिली ही डिश प्रसिद्ध होताना दिसत आहे. तरीही डोंबिवलीच्या काकूंच्या सोयाचिलीची चव आणि वेगळेपणा आजही टिकून राहिलेला आहे. सध्या तरुणाईमध्ये चायनीज भेळ, मंच्युरिअन यांसारख्या पदार्थांची क्रेझ दिसून येते. सोयाचिली हासुद्धा त्यातलाच एक पदार्थ. उघड्यावर पदार्थ खाताना आपण दहावेळा विचार करतो. पण येथील सोयाचिली तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. अगदी कुठलाही पदार्थ घरी बनवताना ज्या प्रकारे काळजी घेतली जाते, तशीच सोयाचिली सेंटरमध्ये काळजी घेतली जाते. त्याचबरोबर सोयाचिली खाल्ल्याने कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही, यासाठी कुठल्याची घातक पदार्थांचा वापर त्यामध्ये केला जात नाही. म्हणूनच सोयाचिली खाण्यासाठी येथे नेहमीच दर्दींची गर्दी जमलेली असते. कुठलाही अपाय नसल्यामुळे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला ही सोयाचिली खाता येणे शक्य आहे.

शेजवान सॉस, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आलं-लसूण आणि सोयाबिन यांचं एकत्रित मिश्रण करून सोयाचिली तयार केली जाते आणि कोबी आणि नुडल्सबरोबर ती सर्व्ह केली जाते. सोयाचिलीबरोबरच येथील मंचुरिअन, सूप यांसारखे पदार्थही सुपर हिट आहेत.

सकाळी ९.३० वाजल्यापासूनच सोयाचिली खाण्यासाठी इथे लोक गर्दी करतात. दिवसाला साधारणपणे ५०० लोक तरी या सोयाचिलीचा आस्वाद घेतात. दिवसातून कुठल्याही वेळेला गेलं, तरीही येथे गरमागरम सोयाचिलीचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळतो. विशेषतः पेंढारकर कॉलेज, मॉडेल कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या रोजच्या वेळापत्रकामध्ये या सोयाचिलीला स्थान आहे. रोजच्या रोज कॉलेजच्या ब्रेकमध्ये येणारे नेहमीचे विद्यार्थीही असल्याचे येथील कर्मचारी सांगतात. सुट्टीच्या दिवसातही अनेकजण कॉलेज नसताना खास सोयाचिलीसाठी येतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज