अ‍ॅपशहर

करबुडव्या 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा

जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी असलेल्या 'गुगल'च्या येथील मुख्यालयावर छापा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. १०६ अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Maharashtra Times 25 May 2016, 1:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पॅरिस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम googles paris hq raided in tax probe
करबुडव्या 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा


जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी असलेल्या 'गुगल'च्या येथील मुख्यालयावर छापा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. १०६ अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

फ्रान्समधील दैनिक 'ली पॅरिसियन'ने दिलेल्या वृत्तानुसार पहाटे पाच वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी गुगल कार्यालयात १०० पेक्षा अधिक पोलीस आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. या कारवाईत गुगल कार्यालयाची झडती घेताना अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फ्रान्स पोलीस तसेच अर्थ मंत्रालयाने गुगलच्या प्रतिनिधींना काही लेखी प्रश्न विचारले होते त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

गुगल आयर्लंड लिमिटेड कंपनीने आर्थिक शिस्त पाळलेली नाही. गुगलसह अन्य आयटी कंपन्यांची सदोष करव्यवस्था संपूर्ण युरोपमध्ये चौकशीच्या फेऱ्यात आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि अन्य काही देशांचा या कंपन्यांवर आक्षेप आहे. आमच्या देशात या कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमावतात आणि कर देताना मात्र अन्य देशांच्या कररचनेचा आधार घेतात. त्यामुळे मोठा आर्थिक फटका झेलावा लागतो, असे या देशांचे म्हणणे आहे. फ्रान्स अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार गुगलकडे करापोटी १०६ अब्ज रुपयांची थकबाकी आहे. ब्रिटनमध्ये गुगलने जानेवारीतच करापोटी १८ कोटी ९७ लाख डॉलर चुकते करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये यूरोपीय संघाने तंबी देत बड्या कंपन्यांना कराबाबत अधिक स्पष्टता ठेवण्यासाठी भाग पाडले जाईल, असा पवित्रा घेतला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने गुगलला कारवाईचा दणका दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत गुगलने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज