अ‍ॅपशहर

जवानाच्या मृतदेहाची पुन्हा विटंबना

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मंगळवारी तीन जवान शहीद झाले. यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली.

Maharashtra Times 23 Nov 2016, 11:00 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 soldiers killed in jammu and kashmir body of one soldier mutilated
जवानाच्या मृतदेहाची पुन्हा विटंबना


पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मंगळवारी तीन जवान शहीद झाले. यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. तीनच आठवड्यांपूर्वी शिपाई मनदीप सिंग यांच्या मृतदेहाची याच परिसरात विटंबना झाली होती. दरम्यान, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या घटना चालूच असून मंगळवारी दुपारपासून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात मच्छिल विभागात चार ठिकाणी नियंत्रण रेषेपलीकडून जोरदार गोळीबार व तोफांचा मारा सुरू होता.

दोन दहशतवादी ठार

उत्तर काश्मीरच्या बंदिपुरा येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. बंदिपुरातील हाजिन या गावात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तपासमोहीम हाती घेतली. यादरम्यान झालेल्या अचानक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या दहशतवाद्यांकडून दोन अत्याधुनिक बंदुका तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जम्मूच्या आर. एस. पुरा क्षेत्रात भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या एका पाकिस्तानी व्यक्तीलाही मंगळवारी ठार मारण्यात आले.

२००० च्या नोटा जप्त

चलनात नव्याने आलेल्या दोन हजार रुपयांच्या दोन नोटा या दहशतवाद्यांकडे सापडल्या. या नोटा पोलिसांकडे सोपवण्यात आल्या असून त्यांचा स्रोत पोलिस शोधून काढतील, असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. या दहशतवाद्यांनी कुठून घुसखोरी केली, याचाही शोध घेतला जात असल्याचे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज